
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (trump invitation to asim munir) ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानातील दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची पाक सरकारने हकालपट्टी केल्याची चर्चा रंगली होती. युद्धजन्य परिस्थितीत वैयक्तिक अजेंडा राबवल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर ही करवाई केल्याचे तेव्हा सांगण्यात येत होते. मात्र पाक सरकारने त्यांना फिल्डमार्शल पदावर बढती दिल्याचे समोर आले. ज्या असीम मुनीर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी भारताविरोधात जाहीरपणे गरळ ओकली होती, त्यालाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन लष्कर दिनाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने असीम मुनीर यांना दि. १४ जून रोजी साजरा होणाऱ्या अमेरिकन लष्कर दिनाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यानुसार मुनीर लवकरच अमेरिकेला रवाना होतील. अमेरिकेतील पाकिस्तानी दूतावासाने म्हटले आहे की असीम मुनीर १२ जून रोजी अमेरिकेत पोहोचू शकतात. या काळात ते अमेरिकेच्या उच्च लष्करी नेतृत्वासोबत बैठक घेतील. या बैठकीत चीन, दहशतवाद आणि भारतासोबतच्या तणावावर दीर्घ चर्चा होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने जेव्हा ऑपरेशन सिंदूर दरम्यान मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला तेव्हा भारताने स्पष्टपणे म्हटले आहे की जोपर्यंत सीमापार दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत ते पाकिस्तानशी कोणतीही चर्चा करणार नाही. मुनीर यांच्या भेटीवरून पाकिस्तानात राजकीय गोंधळ सुरू असल्याची माहिती आहे.