"वैष्णवीने मला थोडं जरी सांगितलं असतं तर..."; काय म्हणाले अजितदादा?
23-May-2025
Total Views |
मुंबई : दादा मला इथे असा त्रास होतो आहे असे वैष्णवीने थोडे जरी सांगितले असते तर आपण ताबडतोब पुढची कारवाई केली असती, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. शुक्रवार, २३ मे रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच आज सायंकाळी ते कस्पटे कुटुंबियांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "या प्रकरणाशी माझा दुरान्वयेही संबंध नसताना माझ्या नावाची बदनामी करून मला टार्गेट केले जात आहे. मी पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्तांशी बोललो आहे. त्यांनी दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथके तैनात केली होती. काल मी त्यांना अजून टीम वाढवण्यास सांगितले. तसेच या प्रकरणात सगळी नवीन आणि जुन्या कायद्यांची कलमे लावून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांना सांगितले. काल मी वैष्णवीच्या वडीलांशी बोललो असून आज मी त्यांना भेटायला जाणार आहे."
"या दोघांचे लव्ह मॅरेज झाले होते. पण त्या मुलीने मला जरा जरी सांगितले असते की, दादा मला इथे असा त्रास होतो आहे तर आपण ताबडतोब पुढची कारवाई केली असती. पण तिच्या घरच्यांनी आणि नातेवाईकांनी जी ईच्छा व्यक्त केली त्यात मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्री या नात्याने मीसुद्धा लक्ष घातले आहे. या प्रकरणात हगवणे परिवारातील जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. आम्ही पूर्णपणे कस्पटे कुटुंबाच्या सोबत आहोत," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "माझ्या या घटनेशी काहीही संबंध नाही. तो फक्त पक्षाचा कार्यकर्ता होता. अशा प्रकरणांमध्ये माझे विचार आणि माझी मतं किती स्पष्ट आहे ते सर्वांना माहिती आहे. कुणीही जवळचा असो किंवा लांबचा असो त्याचा विचार आपण करत नाही. कायदाच सर्वश्रेष्ठ असून प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे," असेही ते म्हणाले.
नववधूंना आवाहन!
"ज्या मुली वधू म्हणून नवीन परिवारात जातात त्यांना जरा जरी शंका आली आणि त्यांनी तक्रार केली तर ताबडतोब कारवाई करता येऊ शकते. त्यामुळे इतर मुलींवर अशी वेळ येणार नाही," असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.