पाळीव प्राण्यांसाठींचे विमा संरक्षण

    20-Jun-2025
Total Views | 11
 
Insurance for pets
 
माणसांना जसे आयुर्विम्याचे, आरोग्य विम्याचे संरक्षण असते, तसेच संरक्षण पाळीव प्राण्यांसाठीही उपलब्ध आहे. विशेषतः कुत्रा पाळण्याची बर्‍याच लोकांना आवड असते. परदेशी कुत्रे विकत घ्यायला बरेच पैसे मोजावे लागतात आणि त्यांच्या पालनपोषणावरही फार मोठा खर्च होतो. तसेच या पाळीव प्राण्यांना होणारे आजार, त्यावरील उपचारही महागडे आहेत. त्यामुळे पाळीव प्राण्यांसाठी विमा घेणेही तितकेच गरजेचे झाले आहे. याविषयी मार्गदर्शन करणारा आजचा लेख...
 
एका उपलब्ध आकडेवारीनुसार, सध्या देशात सुमारे तीन कोटी पाळीव प्राणी आहेत. यात मुख्यतः विविध प्रकारच्या कुत्र्यांचा समावेश आहे. कुत्रा, मांजर यांच्या काही प्रकारांत केस गळण्याचे प्रमाण खूप जास्त असते. अशा पाळीव प्राण्यांची दैनंदिन निगा राखावी लागते, नाहीतर घरातील व्यक्तींना विशेषतः लहान मुलांना मांजराच्या केसांपासून दम्यासारखे विकार जडू शकतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी पाळीव प्राण्यांचीही फार काळजी घ्यावी लागते. कुत्रा किंवा मांजर घरामध्ये पाळल्यावर त्यांना योग्य तो आहार देऊन त्यांचे संगोपन करणे, त्यांच्या मलमूत्र विसर्जनाबाबत योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे असते. तसेच त्यांचे वेळोवेळी लसीकरण, त्यांना होणारे किरकोळ आजार, मोठे आजार यांबाबत त्यांना पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून औषधपाणी करावे लागते. त्यांना अपघात झाला, तर योग्य ते उपचार वेळप्रसंगी शस्त्रक्रियाही करावी लागते. यासाठी हजारो रुपये खर्च येऊ शकतो. यात शस्त्रक्रिया, पशुवैद्यकाचे शुल्क हे मोठे खर्च असतात आणि दिवसेंदिवस हे खर्च वाढतच चालले आहेत. या वाढत चाललेल्या खर्चांवर काही प्रमाणात मात करण्यासाठी पाळीव प्राण्याच्या विमा सुरक्षेचे कवच घेणे योग्य.
 
प्राण्यांसाठीच्या विम्याला त्यांच्या प्रकारांनुसार वेगवेगळी नावे आहेत. ‘कॅनिन-इन्शुरन्स’ म्हणजे कुत्र्यांसाठीचा विमा, जगभरात कुत्र्यांसाठी हा सर्वांत लोकप्रिय विमा प्रकार आहे. याला ‘डॉग इन्शुरन्स’ असेही म्हटले जाते. ‘फेलिव इन्शुरन्स’ म्हणजे पाळीव मांजरांसाठी घेण्यात येणारा विमा. विशेष म्हणजे, यात मांजर पळून जाण्याच्या शक्यतेचा विमा घेता येतो. याला ‘कॅट इन्शुरन्स’ असेही म्हणतात. पाळीव प्राण्यांचा विमा हा एक खास प्रकारचा विमा असून, सर्वसाधारणपणे यामध्ये पाळीव प्राण्यांवर करावे लागणारे एकंदर वैद्यकीय उपचार आणि स्वास्थ्य यांच्या खर्चांची तरतूद करता येते. तसेच पाळीव प्राण्यांचे एकंदर स्वास्थ्य राखण्यासाठी ठराविक मुदतीमध्ये करावी लागणारी तपासणी, विविध आजार आणि त्यावरील औषधे, तातडीने करावे लागणारे उपचार, लसीकरण आणि संलग्न औषधोपचार अपपान झाल्यावर करावे लागणारे उपचार, प्रतिबंधात्मक चाचण्या यांचा समावेश असतो. लॅब्राडोर जातीच्या कुत्र्यासाठी वार्षिक 400 ते 500 रुपये विम्याचा प्रीमियम भरून 50 हजार रुपयांपर्यंतचा विमा घेता येतो. विमा प्रीमियमची रक्कम ही पाळीव प्राण्याचा प्रकार, वय तसेच कोणकोणते विमा संरक्षण हवे व किती किमतीचे संरक्षण हवे, त्यानुसार ठरते. केवळ अपघात आणि त्यामुळे होणारी हानी व यासाठी करावे लागणारे उपचार, प्राणी हरविण्याची शक्यता यासाठीचाही विमा मिळतो. एखाद्याकडे एकापेक्षा जास्त पाळीव प्राणी असतील, तर त्या सर्वांसाठी मिळून एक विमा घेता येतो व या पॉलिसीच्या प्रीमियममध्ये सवलत मिळते. काही विमा पॉलिसींमध्ये पाळीव प्राण्यांवर केलेल्या उपचारांच्या तसेच इतर कारणांच्या खर्चातील दहा ते 20 टक्के रक्कम ‘को-पेमेंट’ म्हणून विमा घेणार्‍याला द्यावी लागते. काही खासगी विमा कंपन्यांच्या विमा योजनांमध्ये पाळीव प्राण्यांच्या विम्यात कुत्रा एखाद्या व्यक्तीला चावला, त्याने हल्ला केला, तर द्यावी लागणारी संभाव्य नुकसान भरपाई, पाळीव प्राण्यांना परगावी घेऊन जायचे असेल, तर प्रवासातील विमा संरक्षण, कुत्र्यांच्या विविध प्रकारच्या स्पर्धांचे द्यावे लागणारे शुल्क अशा गोष्टीसुद्धा अंतर्भूत केल्या जातात. पण, यासाठी अधिक प्रीमियम भरावा लागतो.
 
विमा उतरविताना संबंधित व्यक्तीने विमा कंपनीकडून विम्यातील फायदे, अटी-शर्ती, कोणत्या बाबींचे संरक्षण मिळत नाही, यांची पूर्ण माहिती घ्यावी. विविध विमा कंपन्यांच्या पॉलिसींचा तुलनात्मक अभ्यास करावा आणि नंतर कोणती पॉलिसी उतरवावी, याचा निर्णय घ्यावा. पाळीव प्राण्यांचा विमा घेण्याची प्रक्रिया सुलभ आणि सुटसुटीत आहे. ही पॉलिसी ऑनलाईन विमा कंपनीच्या संकेतस्थळावरूनही घेता येता. विमा पॉलिसी घेताना खाली नमूद केलेली कागदपत्रे सादर करावी लागतात.
 
1) कंपनीचा या विम्याचा फॉर्म बिनचूक आणि संपूर्ण भरून सादर करणे
2) पाळीव प्राण्यांचे पाच बाजूंनी घेतलेले फोटो (पुढून, मागून, उजव्या बाजूने, डाव्या बाजूने व वरून) सादर करावे लागतात. हे फोटो त्याच दिवसाचे आहेत, याचा पुरावा म्हणून त्या फोटोमध्ये त्याच दिवसाचे वर्तमानपत्र आणि त्यावरील तारीख स्पष्टपणे दिसेल, असे प्राण्यासोबत धरणे आवश्यक असते.
3) विमा घेणार्‍या व्यक्तीने पाळीव प्राण्याचे सर्व लसीकरण झाले आहे, याचे पुरावे सादर करावे लागतात.
4) पाळीव प्राणी चार वर्षांपेक्षा जास्त वयाचा असेल, तर तो वयस्कर मानला जातो आणि अशा विमा पॉलिसीमध्ये 90 दिवसांचा ‘कुलिंग पिरियड’ असतो. तो रद्द करायचा असेल, तर त्या प्राण्याची ‘बायोकेमिस्ट्री’ आणि शरीरातील रक्तवहन यांच्या चाचणीचे पुरावे सादर करावे लागतात.
5) विम्याची देय रक्कम ही प्राण्याच्या ‘पेडीग्री’प्रमाणे ठरविलेली असते. त्यापेक्षा जास्त रकमेचा विमा उतरवायचा असेल, तर ‘केनेल क्लब ऑफ इंडिया’चे प्रमाणपत्र घ्यावे लागते. प्राण्याच्या खरेदीच्या किमतीचा पुरावा देणेही आवश्यक असते. पाळीव प्राण्याला काही रोग अगोदरच असतील, तर त्याबद्दल माहिती देणेही गरजेचे असते. हल्ली कुत्र्यांमध्ये मधुमेह असण्याचे प्रमाण वाढले आहे. पाळीव प्राणी हा कुटुंबाचा एक घटक असतो. कुटंबातील इतर सदस्यांप्रमाणे त्याच्या खाण्यापिण्याची देखभालीची योग्य ती खबरदारी घेणे निकडीचे असते आणि त्याच्या आरोग्य, उपचार, दुखापतींवरील उपाय, औषधपाणी यांचा वाढता खर्च सुसह्य करण्यासाठी विमा संरक्षण असेल, तर ते आर्थिक व व्यावहारिकदृष्ट्या योग्य ठरू शकते.
 
संरक्षण कशाला नाही?
 
या विम्यात काही बाबींना संरक्षण मिळत नाही. वेगवेगळ्या कंपन्यांच्या विमा पॉलिसींमधील अटी आणि शर्तीनुसार यात बदल होतो.
 
1) पाळीव प्राण्याच्या मालकाकडून देखभालीत हेळसांड झाली, दुर्लक्ष झाले तर यातून उद्भवणारे आजार, होणारी दुखापत, एकंदर तब्यतेतील बिघाड यांसाठी करावे लागणारे उपचार यांचा दावा संमत होत नाही.
2) पाळीव प्राणी दंगे, युद्धजन्य परिस्थितीत दुर्दैवाने हरवला किंवा दुखापत झाली, तर याचा दावाही संमत केला जात नाही.
3) पाळीव प्राण्याला ‘हिपेटायटिस’, ‘लेप्टोस्पॉयरोसिस’ या रोगांच्या प्रतिबंधक लसी दिल्या नसतील आणि असे रोग झाल्यास यासाठी केलेला दावा संमत केला जाणार नाही.
4) विमा पॉलिसीच्या ‘कूलिंग पिरियड’मध्ये उपचार करावे लागल्यास यासाठीचा दावा संमत केला जात नाही.
5) पाळीव प्राण्यास एखाद्या शर्यतीत भाग घेतल्याने संभाव्य दुखापत व त्यासाठी केलेले उपचार यांच्या खर्चाचा संमत केला जाणार नाही. विमा पॉलिसीत कशाला संरक्षण मिळत नाही, हे विमा कंपनीकडून व्यवस्थितपणे समजून घ्यावे, नाहीतर नंतर पश्चाताप करायची वेळ येऊ शकेल. पाश्चिमात्य देशांच्या आपण बर्‍याच कॉपी केल्या; त्यांपैकी पाळीव प्राण्यांचा विमा उतरविणे ही एक कॉपी. असली थेरं आम्हाला परवडणार नाहीत, या मताचेही बरेच भारतीय आहेत!
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121