‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’च्या आकडेवारीनुसार, ‘एसआयपी’द्वारे भारतातील म्युच्युअल फंडची गुंतवणूक 27 हजार 269 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जून महिन्यात ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणार्या गुंतवणुकीने उच्चांक गाठला आहे. ‘एसआयपी’च्या एकूण खात्यांची संख्या 9.06 कोटींवरुन वाढून 9.19 कोटी इतकी झाली आहे. यानिमित्ताने म्युच्युअल फंड क्षेत्रातील भारतीय अर्थभरारीचा आढावा घेणारा हा लेख...
म्युच्युअल फंडाची कल्पना सर्वप्रथम अमेरिका व युरोपमध्ये 18व्या शतकाच्या उत्तरार्धात उदयास आली. हॉलंडमध्ये 1774 मध्ये ‘इव्हर्सन ट्रस्ट’ हा पहिला म्युच्युअल फंड सुरू करण्यात आला. यामुळे लहान गुंतवणूकदारांना एकत्रित येऊन मोठ्या गुंतवणुकीत सहभाग घेता आला. पुढे 1924 मध्ये अमेरिकेत ‘मॅसॅच्युमेट्स इन्व्हेस्टर्स ट्रस्ट’ या म्युच्युअल फंडाने या गुंतवणूक पद्धतीला आधुनिक स्वरुप दिले. म्युच्युअल फंडाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून त्याचा विविध प्रकारच्या मालमत्तांमध्ये ज्यात शेअर, कर्जरोखे, सरकारी रोखे, सोने आदि विविध वित्तीय पर्यायांत गुंतवणूक करणे यामुळे जोखीम कमी होते, गुंतवणुकीत विस्तृतता येते आणि गुंतवणूकदारांना अधिक परतावा मिळतो.
भारतात प्रवेश
1963 ते 1987 हा भारतातील म्युच्युअल फंडांचा प्रारंभिक काळ होता. ‘युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया’ (युटीआय) या कंपनीने भारतात म्युच्युअल फंडाची सुरुवात 1963 मध्ये केली. ही ‘युटीआय’ भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली होती, ती भारतीय गुंतवणूकदारांसाठी पहिलीच सुरक्षित आणि परतावा देणारी गुंतवणूक योजना होती. यामध्ये ‘युनिट स्कीम 1964’ अत्यंत यशस्वी ठरली. नंतर या कंपनीत काही समस्या निर्माण झाल्या व यातून ‘युटीआय’चे खासगीकरण झाले. 1987 पासून ‘एसबीआय म्युच्युएल फंड’, ‘कॅनरा म्युच्युअल फंड’ आणि इतर सार्वजनिक बँकांनी म्युच्युअल फंड क्षेत्रात प्रवेश केला. यामुळे म्युच्युअल फंड बाजाराची व्याप्ती वाढली. 1989 मध्ये ‘एलआयसी’ने या क्षेत्रात प्रवेश केला. 1993 मध्ये भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाचे नियमन करण्यासाठी ‘सेबी’ने नियमावली आणली. यामुळे गुंतवणूकदारांना सुरक्षिततेची खात्री मिळाली आणि खासगी कंपन्या या क्षेत्रात उतरल्या. ‘कोठारी पायोनियर म्युच्युअल फंड’ हा खासगी क्षेत्रातील पहिला म्युच्युअल फंड 1993 हा नंतर ‘फ्रँकलिन टेम्पल्टन’ या म्युच्युअल फंडात सामील झाला. 1993 मध्ये सुमारे 47 हजार कोटी रुपयांचे मालमत्ता व्यवस्थापन हे सारे म्युच्युअल फंड करत होते. यानंतर ‘एचडीएफसी म्युच्युअल फंड’, ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड’, ‘आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड’ यांनी या क्षेत्रात उडी घेतली. त्यानंतर 2009च्या जागतिक आर्थिक घडामोडी मंदीमुळे जगातील शेअर बाजार कोसळले, अनेक गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले आणि यातून म्युच्युअल फंड बाजारसुद्धा वाचला नाही. लोकांचा म्युच्युअल फंडावरील विश्वास उडाला.
म्युच्युअल फंड गुंतवणुकीत 2010 नंतरच्या डिजिटल युगाने क्रांती झाली. तेव्हा जी या योजनांत जोरदार गुंतवणूक सुरू झाली, ती अजून कायम आहे. भारतीयांची फार मोठ्या प्रमाणावरील गुंतवणूक सध्या म्युच्युअल फंडात आहे. ‘एसआयपी’ (सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेन्ट प्लान)सारख्या गुंतवणुकीच्या पर्यायामुळे जनता यात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित झाली व हे आकर्षण अजूनही कायम आहे. गुंतवणूकदार मोबाईल अॅप, वेबपोर्टल आणि ब्रोकर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सहजपणे गुंतवणूक करू लागले. अनेक वेगवेगळ्या आकर्षक योजना गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी उपलब्ध झाल्या. अनभिज्ञ, वेळ न देऊ शकणार्या सर्वसामान्य गुंतवणूदारांसाठी शेअर बाजार नसतात, त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय असतो. त्यामुळे सर्वसामान्य कमी जोखीम अपेक्षित असलेल्या वयस्क व अन्य लोकांसाठी हा पर्याय उत्तम असल्याने त्यातली गुंतवणूक वाढू लागली. याचा चांगला परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला.
जे. एम लार्ज अॅण्ड मिडकॅप फंड
दरम्यान गुंतवणूकदारांना वाढ आणि स्थिरता मिळावी, म्हणून ‘जेएम लार्ज अॅण्ड मिडकॅप फंड’ सध्या गुंतवणुकीसाठी खुला आहे. ही ‘लार्ज कॅप’ आणि ‘मिडकॅप’ या दोन्ही समभागांमध्ये गुंतवणूक करणारी ‘ओपन एंडेड’ इक्विटी योजना आहे. ही योजना येत्या 18 जुलैपर्यंत गुंतवणुकीस खुली आहे. या योजनेत जमा होणारा पैसा चांगल्या व सतत शेअर दर वर जाणार्या कंपन्यांत गुंतवून त्यातून गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त परतावा दिला जाणार आहे. लार्ज कॅप कंपन्यांचा भांडवली खर्च कमी असतो, पण तंत्रज्ञान व बाजारपेठेतील व्याप्ती मोठी असते. अशा कंपन्यांच्या नफ्याची वाढ ही देशाच्या ‘जीडीपी’शी जुळणारी असते. अशा कंपन्यात या योजनेतील रक्कम गुंतविण्यात येणार आहे. हा गुंतवणूकदारांसाठी फार मोठा दिलासा आहे, तर या योजनेतील पैसा उत्पादन, संरक्षण, क्विक सर्व्हिस रेस्टॉरण्टस् अशा मिडकॅप कंपन्यांत गुंतविण्यात येणार आहे.भारतीय भांडवली बाजार हा सध्या मोठ्या अस्थिरतेच्या काळातून जात आहे. त्यामुळे लार्जकॅप व मिडकॅपमध्ये योग्य प्रमाणात केलेली गुंतवूणकच चांगला परतावा देऊ शकते.
भारतीय म्युच्युअल फंड क्षेत्रात गेल्या काही वर्षांत फिनटेक स्टार्टअपने मोठी क्रांती घडवून आणली आहे. या स्टार्टअपने गुंतवणूकदारांसाठी नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित सेवा पुरविल्या आहेत. या स्टार्टअपने म्युच्युअल फंड खरेदी आणि विक्रीसाठी एक सोपी आणि कमी खर्चाची प्रणाली विकसित केली आहे. याशिवाय, ‘ग्रो’ हादेखील एक लोकप्रिय स्टार्टअप असून तो म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी एक सोपे ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’ उपलब्ध करून देते. या ‘ग्रो’च्या प्रणालीत ‘एसआयपी’ सुरू करणे, योजनांची तुलना करणे आणि परतावा तपासणे अत्यंत सोपे आहे. म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे एक आकर्षक साधन असते, तरी त्यांची निवड, खरेदी आणि त्याची प्रगती तपासणी प्रक्रिया सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी जटिल होती. ती सुलभ करण्याचे काम ‘ग्रो’ने केले. कमी आर्थिक ज्ञान असलेल्या लोकांसाठीही ‘ग्रो’ने भारतीयांसाठी म्युच्युअल फंडात गुंतवूणक करणे सोपे केले आहे. ‘पेटीएम मनी’, ‘क्वांटसॅप’, ‘इन्व्हेस्टक्राफ्ट’ हे या क्षेत्रातील अन्य काही स्टार्टअप आहेत. ‘क्वांटसॅप’ ही कृत्रिम बुद्धिमत्ता (अख) आधारित कंपनी असून ती म्युच्युअल फंड आणि शेअर बाजाराच्या व्यवहारांचे विश्लेषण करण्यासाठी ‘अल्गोरिदमिक टे्रडिंग’ची सुविधा पुरविते. म्हणजे एका सांख्यिक प्रणालीने गुंतवूणक निर्गुंतवणुकीचे योग्य फायदेशीर निर्णय घेणे, ज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होतो.
कृत्रिम बुद्धिमत्तेतील सेल्सफोर्स आणि गोदरेज कॅपिटल भागीदारीत
कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा व्यवहारात वाढ होऊ लागली असून गोदरेज कॅपिटलने सेल्सफोर्स या कृत्रिम बुद्धिमत्ता सीआरएम कंपनीसोबत भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारांचा उद्देश गोदरेज कॅपिटलच्या उपकंपन्यांना डिजिटल कर्ज व्यवहारासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आणि भारतातील ग्राहकांना उत्तम सेवा अनुभव मिळवून देणे, हा आहे. हळूहळू भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर पाय पसरत आहे. या भागीदारीची अंमलबजावणी करण्यासाठी ‘डेलाईट इंडिया’ला सहयोगी भागीदार म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. ज्यामुळे ‘सेल्स फोर्स’चे प्रगत तंत्रज्ञान ‘गोदरेज कॅपिटल’च्या कर्ज व्यवहार प्रणालीमध्ये सहज व वेगाने लागू करता येईल. या भागीदारीअंतर्गत ‘गोदरेज कॅपिटल’ आपली ‘लोन ओरिजिनेशन सिस्टम’ एकत्र करून ती ‘सेल्सफोर्स’च्या उच्च दर्जाचा एआय (कृत्रिम बुद्धिमता) आधारित पॉटफॉर्सवरून तिच्या कर्ज देण्याच्या पायाभूत सुविधा वाढविणार आहे. भारतात असंख्य हात नोकरी मागत असताना, या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीमुळे नोकर्या कमी होणार, यामुळे अर्जापासून ते कर्ज वितरणापर्यंत संपूर्ण कर्जप्रक्रिया अधिक स्मार्ट व सोपी होईल. यामुळे कंपनी उत्तम ग्राहक सेवा, जलद कामकाज आणि कमी म्युच्युअल हस्तक्षेपासह कर्जप्रकिया अधिक प्रभावीपणे राबवू शकेल.
- शशांक गुळगुळे
(सूचना : सदर लेखाचा उद्देश हा केवळ माहितीपर आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)