पायाभूत सुविधा आणि परिवहन क्षेत्रात भारत जागतिक दर्जाच्या सुविधा उभारण्यावर भर देत आहे. भारतात आता रेल्वेचे जाळे मजबूत होत असताना, जपानी परिवहन व्यवस्थेतील सर्वांत वेगवान म्हणून गणल्या जाणार्या बुलेट ट्रेन प्रकल्पांच्या कामांनी गती घेतली आहे. या सर्व बाबींमध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपला महाराष्ट्र भारतात पायाभूत सुविधा उभारणीत अग्रणी आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतातील पहिली हायस्पीड बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद अशी आगामी काही वर्षांतच धावणार आहे. त्याविषयी सविस्तर...
कल्पना करा की, मुंबई ते अहमदाबाद हे जवळपास 500 किमीचे अंतर वायुवेगाने धावणार्या एका ट्रेनने हे केवळ अडीच ते तीन तासांत कापता येणार आहे. हे काही वर्षांपूर्वी कोणी तुम्हाला सांगितले असते, तर कदाचित त्यावर विश्वास ठेवला नसता. मात्र, लवकरच ही कल्पना सत्यात उतरणार आहे. कारण, मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 508 किमीच्या हायस्पीड रेल्वे कॉरिडोअरचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. हा भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. जो महाराष्ट्रातील मुंबई येथून सुरू होऊन गुजरात राज्यातील अहमदाबादला जोडतो. यांपैकी 348 किमी गुजरात राज्यात, चार किमी दादरा नगर हवेली आणि 156 किमी मार्ग महाराष्ट्रात आहे.
महाराष्ट्रातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बी.के.सी) परिसरातून सुरू होणारी 320 किमी/ताशी वेगाने धावणारी ही हाय-स्पीड ट्रेन आंतरशहर प्रवासासह आंतरराज्यीय प्रवासातही परिवर्तन घडवून आणेल. बोईसर, भरूच आणि अंकलेश्वर या औद्योगिक शहरांना आणि वाढवण बंदराला एक हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. यामुळे मुंबई आणि अहमदाबादच्या अर्थचक्राला अधिक गतिमानता प्राप्त होईल.
बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी...
हा प्रकल्प ‘नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनएचएसआरसीएल)च्या माध्यमातून उभारण्यात येत आहे. रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि गुजरात सरकार अशा दोन राज्य सरकारांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या समभाग-सहभागासह संयुक्त क्षेत्रात कंपनीला ’स्पेशल पर्पज व्हेईकल’ मॉडेल स्वीकारण्यात आले. या प्रकल्पाची अंदाजित किंमत कर वगळून 1 लाख, 8 हजार कोटी रुपये (17 अब्ज डॉलर्स) आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 81 टक्के निधी जपान सरकार ’जायका’च्या माध्यमातून देणार आहे. ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’च्या इक्विटी स्ट्रक्चरनुसार, 50 टक्के भारत सरकार, रेल्वे मंत्रालयामार्फत आणि प्रत्येकी 25 टक्के महाराष्ट्र सरकार आणि गुजरात सरकारकडे आहे.
अभियांत्रिकी अविष्कार
या प्रकल्पासाठी 100 टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. या प्रकल्पाची सुमारे 90 टक्के संरचना ही उन्नत (एलिव्हेटेड) आहे. प्रकल्पाचा उन्नत मार्ग हा प्रामुख्याने ‘फुल स्पॅन लॉन्चिंग मेथड’ वापरून उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ही अनोखी बांधकाम पद्धत देशात प्रथमच वापरली जात आहे. हे तंत्र वापरणार्या आणि त्यावर प्रभुत्व मिळवणार्या जगातील मोजक्या देशांपैकी भारत एक आहे. या मार्गात 28 स्टील पुलांचे नियोजन आहे. हे पूल राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग, सिंचन, कालवे, नदी आणि रेल्वे मार्गांवर असतील. याशिवाय, संरेखनाचा भाग म्हणून मार्गात येणार्या विविध नद्यांवर 25 पूल बांधले जात आहेत, त्यांपैकी 21 पूल गुजरात राज्यात आणि चार पूल महाराष्ट्र राज्यात आहेत. एकूण मार्गात आठ डोंगरी किंवा पर्वतीय बोगद्यांचा समावेश असेल. यातील सात बोगदे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात आहेत, तर एक बोगदा गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात आहे. या प्रकल्पासाठी जपानी ‘शिंकानसेन ट्रॅक’ तंत्रज्ञानावर आधारित गिट्टीरहित ट्रॅकची जे-स्लॅब ट्रॅक सिस्टम वापरली जात आहे. भारतात पहिल्यांदाच जे-स्लॅब गिट्टीरहित ट्रॅक सिस्टमचा वापर केला जात आहे.
महाराष्ट्रात भारतातील पहिला समुद्राखालील रेल्वे बोगदा
एकूण 21 किमी लांबीचा भूमिगत बोगदा या मार्गिकेच्या संरेखनात आहे. या 21 किमी बोगद्यापैकी शिळफाटा आणि घणसोली दरम्यान पाच किमी ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड’ वापरून बोगदा बांधला जात आहे, तर उर्वरित 16 किमी टनेल बोरिंग मशीन वापरून बांधला जाईल. या बोगद्यात ठाणे खाडीखाली सात किमी लांबीचा समुद्राखालील भागदेखील समाविष्ट आहे. 16 किमी लांबीच्या टीबीएमसाठी 13.6 मीटर व्यासाचे कटर हेड हे भारतातील कोणत्याही रेल्वे प्रकल्पासाठी वापरले जाणारे सर्वांत मोठे कटर हेड आहे.
महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या कामाच्या प्रगतीचा आलेख
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बीकेसी ते शिळफाटा यांदरम्यान बांधण्यात येणार्या 21 किमी लांबीच्या बोगदा बांधकामात ‘एनएसआरसीएल’ने पहिल्या टप्प्यात 2.7 किमी लांबीचा बोगदा बांधून पूर्ण केला आहे. शिळफाटा बाजूने सुमारे 1.62 किमी उत्खनन करण्यात आले आहे आणि ‘एनएटीएम’ विभागात एकूण प्रगती अंदाजे 4.3 किमी आहे. महाराष्ट्र बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ठाणे, विरार आणि बोईसर या तीन उन्नत स्थानकांचे काम वेगाने सुरू आहे. विरार आणि बोईसर स्थानकांसाठी पहिला स्लॅब नुकताच टाकण्यात आला आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी ‘पिअर फाऊंडेशन’ आणि खांबांचे काम प्रगतिपथावर आहे. आतापर्यंत सुमारे 44 किमी खांबांची उभारणी झाली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसरात नुकताच पूर्ण स्पॅन बॉक्स गर्डर लॉन्चिंगद्वारे व्हायाडक्ट बांधकामाचे काम सुरू झाले आहे. पालघर जिल्ह्यात सात पर्वतीय बोगद्यांच्या खोदकामाचे काम प्रगतिपथावर आहे. वैतरणा, उल्हास आणि जगणी नदीवरील पुलांचे बांधकाम सुरू झाले आहे.
कधी धावणार पहिली ट्रेन?
हा प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज होता. मात्र, आता 2028 पर्यंत गुजरातमध्ये त्याचा एक भाग कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, तर 2030 पर्यंत मुंबईला जोडणारा संपूर्ण मार्ग पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प प्रगतिपथावर आहे आणि गुजरातमध्ये नदी पूल आणि व्हायाडक्ट्स पूर्ण करण्यासह महत्त्वपूर्ण टप्पे गाठले जात आहेत. मात्र, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मार्चमध्ये प्रकल्प आढावा दौर्यादरम्यान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात परवानगी नाकारल्यामुळे महाराष्ट्रात झालेल्या विलंबावर प्रकाश टाकला होता. प्रकल्पाला विलंब होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रातील भूसंपादन, ज्यामुळे प्रकल्प दोन वर्षे मागे पडला. या विलंबामुळे अडीच वर्षांचे नुकसान भरून काढण्यासाठी वेगाने काम सुरू आहे.
उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक पाऊल
बुलेट ट्रेन प्रकल्प, बांधकाम आणि ऑपरेशनदरम्यान रोजगार निर्माण करून आर्थिक विकासाला चालना देत आहे, तसेच परकीय गुंतवणूकही आकर्षित करत आहे. या प्रकल्पामुळे स्थानकांच्या सभोवतालच्या भागांचा विकास होईल. गतिशीलता आणि कनेक्टिव्हिटी सुधारून बुलेट ट्रेन दोन राज्यांमधील प्रवासाचा वेळ कमी करेल. यातून व्यावसायिक सहकार्यास चालना मिळेल.
जलद आणि नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील
बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत, महाराष्ट्रात 21 किमी लांबीच्या बोगद्याचे बांधकाम सुरू आहे. या बोगद्यात आम्ही ‘एनएटीएम’ तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेल्या 2.7 किमी लांबीच्या बोगद्याचा ‘ब्रेक थ्रू’ यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. याच पद्धतीने एकूण पाच किमी लांबीचा बोगदा बांधला जाणार आहे. आम्ही हे काम नियोजित वेळेपूर्वी आणि उच्च दर्जाने पूर्ण केले आहे, ही आनंदाची बाब आहे. आम्ही 21 किमीपैकी 2.7 किमी बांधकाम पूर्ण केले आहे. यानंतर, बोगद्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरू होईल, त्यानंतर ‘आरसी ट्रॅक बेड’ तयार करण्यात येतील आणि त्यावर रूळ बसवण्याचे काम त्वरित सुरू होईल. मान्सूननंतर लगेचच, महाराष्ट्र विभागात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम जलद गतीने व्हावे आणि नियोजित वेळेनुसार पूर्ण व्हावे, असा आमचा प्रयत्न असेल.
- विवेक कुमार गुप्ता, व्यवस्थापकीय संचालक, एनएचएसआरसीएल