नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सायप्रसच्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांच्यासमवेत लिमासोल येथे सायप्रस आणि भारतातील व्यावसायिक प्रतिनिधींसोबत गोलमेज चर्चा केली. सहभागींमध्ये बँकिंग, वित्तीय संस्था, उत्पादन, संरक्षण, लॉजिस्टिक्स, सागरी, नौवहन, तंत्रज्ञान, नवोन्मेष, डिजिटल तंत्रज्ञान, एआय, आयटी सेवा, पर्यटन आणि गतिशीलता अशा विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींचा समावेश होता.
वित्तीय सेवा क्षेत्रात व्यावसायिक सहभागाच्या क्षमतेवर भर देत, दोन्ही नेत्यांनी एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंज गिफ्ट सिटी, गुजरात आणि सायप्रस स्टॉक एक्सचेंज यांच्यातील सामंजस्य कराराचे स्वागत केले. एनआयपीएल (एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड) आणि युरोबँक सायप्रस यांनी दोन्ही देशांमधील सीमापार पेमेंटसाठी युपीआय सुरू करण्यास सहमती दर्शविली. पंतप्रधानांनी भारत-ग्रीस-सायप्रस (आयजीसी) व्यापार आणि गुंतवणूक परिषदेचेही स्वागत केले. संयुक्त मंचाद्वारे लॉजिस्टिक्स, अक्षय ऊर्जा, नागरी विमान वाहतूक आणि डिजिटल सेवा यासारख्या क्षेत्रात त्रिपक्षीय सहकार्याला बळकटी मिळणार आहे.
सायप्रस पुढील वर्षी युरोपीय परिषदेचे अध्यक्षपद भुषविणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी भारत-ईयू धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. त्यांनी वर्षाच्या अखेरीस भारत-ईयू मुक्त व्यापार करार पूर्ण होण्याची आशा व्यक्त केली, ज्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि आर्थिक सहकार्याला चालना मिळेल.