मुंबई, मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन, तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा मृत्यूही झाला आहे. मुंबई महापालिकेने महिनाभरात याबाबत मोहीम राबवून सर्व कबुतरखाने तात्काळ बंद करावेत. त्याचबरोबर कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांबाबत लोकांमध्ये जनजागृती करावी, असे मुंबई महापालिकेला दिल्याची माहिती निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवार, दि. ३ जुलै रोजी विधान परिषदेत दिली.
मुंबईत ५१ कबुतरखाने असून, त्यातील काही कबुतरखाने हे शंभर ते दीडशे वर्षे जुने आहेत. यातील काही बंद आहेत, तर काही सुरू आहेत. दादरमधील कबुतरखान्याचा पुरातन वास्तू जतन श्रेणीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. मात्र, हे सर्व कबुतरखाने रहिवासी, तसेच मुंबईकरांच्या आरोग्यासाठी धोकादायक बनले आहेत. त्यामुळे दादर कबुतरखानासह मुंबईतील कबुतरखाने बंद करा, अशी मागणी मनीषा कायंदे यांनी प्रश्नोतराच्या तासाला केली. त्यावर मंत्री सामंत यांनी उत्तर दिले.
दरम्यान, आ. चित्रा वाघ यांनीही कबुतरांच्या विष्ठेमुळे त्यांच्या मामीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पालिकेच्या के-पश्चिम विभाग कार्यालयाकडे हा कबुतरखाना बंद करण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, अंधेरीतील भरडावाडी येथील कबुतरखाना बंद झाला नाही. कबुतरांना धान्य टाकण्यास बंदी करा, असे वाघ म्हणाल्या. दादरमधील कबुतरखान्याबद्दल तक्रारी आल्यानंतर मुंबई महापालिकेने तो दोन वर्षे बंद ठेवला होता. सरकारने या कबुतरखान्याच्या आजूबाजूच्या बिल्डिंगची समिती नेमून जो कोणी कबुतरांना खाणेपिणे टाकेल त्याची तसेच परिसरातील रहिवाशांची जनजागृती करण्यावर भर दिला होता. मात्र, बंदी असून त्यांना धान्य टाकले जात होते. त्यामुळे आताही बंदी घातल्यानंतर पर्यटक तसेच रहिवाशांमध्ये पालिकेने जनजागृती करण्यावर भर द्यावा, सामंत म्हणाले.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.