इस्लामिक स्टेट खुरासान-पाकचे नवे प्यादे

    14-Jun-2025
Total Views | 66
 
understanding situation of insurgencies in Pakistani provinces like Balochistan, Sindh, North West Frontier
 
गेलेे काही आठवडे आपण बलुचिस्तान, सिंध, वायव्य सरहद्द प्रांत इत्यादी पाकिस्तानी प्रांतांमधल्या बंडाळ्यांची स्थिती समजून घेत आहोत. एक बलुचिस्तान सोडला, तर इतर प्रांत स्वबळावर स्वतंत्र होऊ शकतील, अशी स्थिती नाही. इकडे भारताने हाणलेल्या जबर तडाख्याने पाकिस्तान घायाळ झालाय, असे भासते. पण, तिकडे पाकिस्तानी सेना नेतृत्व ‘आयएसके’ला पुढे करून बलुचिस्तानला तर चेपतेच आहे, पण अफगाणिस्तानावरही वरचढ होऊ पाहत आहे. जाणून घेऊया हा सत्तेच्या सारी
 
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकवर जे ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले, त्या संघर्षात आपण यशस्वी मध्यस्थी केली,” असे ट्रम्पतात्या म्हणाले. ते चुकीचे आहे, असे लगेचच उघड झाले. तरी एकंदरीत अमेरिका याप्रकरणी बरीचशी भारताला अनुकूल असल्याचे चित्र दिसत आहे. पण, आता अमेरिकेच्या सैनिकी दिन संचलनासाठी ट्रम्पतात्या, पाकिस्तानी सेनाप्रमुख फील्ड मार्शल मुनीर आलम यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणार आहेत, अशा बातम्या आहेत.
 
अमेरिकन सेनेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल मायकेल कुरीला यांनी सांगितले की, “मार्च 2025 साली महंमद शरीफुल्ला या अत्यंत घातक दहशतवाद्याला अफगाण-पाक सीमेवर अटक केल्यानंतर, मुनीर आलम यांनी सर्वप्रथम मला फोन करून ही बातमी दिली.” दि. 5 मार्च 2025 या दिवशी या दहशतवाद्याला अमेरिकन न्यायालयात पेश करण्यात आले. त्यादिवशी अमेरिकन संसदेच्या संयुक्त सभेसमोर बोलताना राष्ट्राध्यक्षांनी, शरीफुुल्लाच्या अटकेबद्दल पाकिस्तानला जाहीर धन्यवाद दिले होते.
का? शरीफुल्ला एवढा महत्त्वाचा का होता? तर दि. 26 ऑगस्ट 2021 या दिवशी ‘इस्लामिक स्टेट खुरासान’ उर्फ ’आयएसके’ या दहशतवादी संघटनेने, काबूल विमानतळावर जबरदस्त दहशतवादी हल्ला चढवला होता. त्यात 170 नागरिकांसह 13 अमेरिकन सैनिक ठार झाले होते. अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य काढून घ्यायला सुरुवात केल्यानंतर जवळपास शेवटच्या सैन्यपथकांवर हा हल्ला करण्यात आला होता. त्याचा सूत्रधार महंमद शरीफुल्ला होता. त्यामुळे शरीफुल्लाला पाकिस्तानी सैन्याने किंवा गुप्तचरांनी पकडून अमेरिकेच्या हवाली करणे, हे अमेरिकेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. नंतर शरीफुल्लाने आपल्या जबानीत सांगितले की, “दि. 22 मार्च 2024 रोजी रशियाच्या मॉस्को शहरातील क्रॉकस सिटी हॉलवर जो दहशतवादी हल्ला झाला, तोदेखील मीच घडवून आणला होता.” या हल्यात 145 लोक ठार, तर 551 लोक गंभीर जखमी झाले होते.
 
आता तिसरी बातमी पाहा. भारताचे परराष्ट्रमंत्री सुब्रह्मण्यम् जयशंकर हे युरोपीय महासंघाच्या पदाधिकार्‍यांना भेटण्यासाठी बु्रसेल्समध्ये आहेत. भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यादरम्यान मुक्त व्यापारी करार करण्याच्या वाटाघाटी सुरू असताना जयशंकर म्हणाले, “लक्षात घ्या, पाकिस्तान हा असा देश आहे की, ओसामा बिन लादेनसारख्या माणसाला तिथे लपून बसणं सुरक्षित वाटतं. जगाने हे नीट लक्षात ठेवावं की, हा फक्त भारत-पाक संघर्ष नाही. हा दहशतवाद आहे आणि तुम्ही ठाम भूमिका न घेतल्यास तो तुमच्याही मानगुटीवर बसणार आहे.”
 
आता चौथी बातमी पाहा. पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने सर्व परदेशी लोकांना पुन्हा एकदा सक्त सूचना दिली आहे की, त्यांनी ताबडतोब पाकिस्तानच्या भूमीवरून स्वदेशात निघून जावे. ही सूचना मुख्यतः अफगाणी नागरिकांसाठी आहे. दि. 11 सप्टेंबर 2001 या दिवशी ‘अल कायदा’च्या दहशतवाद्यांनी न्यूयॉर्कमधील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’चे दोन मनोरे उद्ध्वस्त केले. अमेरिकेने निर्णय घेतला की, आता इराक आणि अफगाणिस्तान दोघांचाही निकाल लावायचा. त्यानुसार दि. 7 ऑक्टोबर 2001 या दिवसापासून अमेरिकन लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध प्रचंड कारवाई सुरू केली. पहिली धाड अफगाणिस्तानवर पडली. हजारोंच्या संख्येने अफगाण नागरिक पाकिस्तानात पळाले. म्हणजे गेली किमान 20 वर्षे हे लोक पाकिस्तानातच राहत आहेत. कित्येकांचा जन्मच पाकिस्तानात झाला आहे. त्यांनी आपली मूळ मायभूमी कधी पाहिलेलीच नाही. 2001 साली अफगाणिस्तानात उतरलेली अमेरिकन सेना अखेर 2021 साली कायमची परतली पण, या निर्वासित अफगाणांनी आपल्या मूळ देशात परतण्याचा विचार केला नाही. कारण, एकंदरीत त्यांचा निर्वाह पाकिस्तानात बर्‍यापैकी चाललेला होता. त्यांच्यापैकी बहुसंख्य लोक श्रमिक, कष्टकरी म्हणजे ‘ब्लू कॉलर’ व्यवसायांमध्ये होते. पण, मग एकदम असे काय घडले की, पाक प्रशासनाने त्यांच्या हद्दपारीचा हुकुम काढला? नुकताच त्यांना जो सक्त इशारा देण्यात आला आहे, त्यात असेही बजावण्यात आले आहे की, ‘स्वतः होऊन (म्हणजे बर्‍याबोलाने) तुम्ही निघून गेलात, तर तुम्हाला सन्मानाची वागणूक देण्यात येईल.’ या पुढचे अनुच्चारित शब्द असे की, अन्यथा तुमची ससेहोलपट करून तुम्हाला हाकलून देण्यात येईल.
 
आणि आता पाचवी बातमी पाहा. ‘इस्लामिक स्टेट खुरासान’ या दहशतवादी संघटनेने नुकतीच एक चित्रफीत समाजमाध्यमांवर टाकली आहे. ‘आयएसके’चे दहशतवादी अनेक कैद्यांचे गळे कापून त्यांना ठार मारत आहेत, अशी बरीच बिभत्स दृश्ये त्यात दाखवण्यात आली असून ‘बलुच लिबरेशन आर्मी’ आणि ‘बलुच लिबरेशन फ्रंट’ या बलुचिस्तान मुक्तीसाठी आंदोलन करणार्‍या दोन संघटनांना विशेष इशारा देण्यात आला आहे की, ‘याद राखा. तुमची पण अशीच हालत करून टाकू.’
या पाच वेगवेगळ्या बातम्या जर आपण जोडल्या, तर पाकिस्तानचे खरे सत्ताधारी असणारे जे पाकिस्तानी लष्कर त्यांच्या डोक्यात काय शिजते आहे, याचा थोडासा अदमास आपल्याला येऊ शकतो.
 
2001 साली अमेरिकेने इस्लामी दहशतवाद विरोधात जंगी कारवाई सुरू केली. प्रथम तिने अफगाणिस्तान आणि मग इराक यांचा निकाल लावला. त्यानंतर सतत सात ते आठ वर्षे सातत्याने शोध करीत, अखेर दि. 2 मे 2011 या दिवशी ओसामा बिन लादेनला ठार केले. ओसामा कोणत्याही दुर्गम पर्वतात ना जंगलात लपलेला नसून अमेरिकेचा मित्र असलेल्या पाकिस्तानात, अगदी भर वस्तीत, बायकापोरांच्या लेंढरासकट अगदी मजेत राहत होता. अमेरिकेसह सगळ्या जगालाच वाटले की, इस्लामी दहशतवाद संपला. पण, तसे अजिबात झाले नाही. ‘अल कायदा’च्या जागी आता ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया-आयएसआयएस’ ही नवी अधिकच कट्टर संघटना उगवली. पाश्चिमात्य संस्कृतीचा उच्छेद करून जगभर सर्वत्र शरियतच्या कायद्याचे राज्य आणणे, हा त्यांचा उद्देश होता. त्यांनी गोर्‍या युरोपीय आणि अमेरिकन माणसांना जितक्या क्रूरपणे ठार केले, तितक्याच निर्दयपणे आफ्रिकन काळे ख्रिश्चन, इराणी शिया, रशियन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन आणि इस्रायली ज्यू यांनादेखील मारले.
अखेर अमेरिका कंटाळली. तिने प्रथम इराकमधून आणि नंतर म्हणजे 2021 साली अफगाणिस्तानातून आपले सैन्य पूर्णपणे काढून घेतले. इराकची प्रशासकीय स्थिती ठीक आहे पण, अफगाणी प्रशासन आणि सैन्य अमेरिकेची पाठ फिरताक्षणी कोलमडून पडले. संपूर्ण देश तालिबानच्या हातात गेला. तालिबानी लोक कसे भर चौकात आंदोलन करणार्‍या अफगाणी महिलांना डोक्यात गोळ्या घालून ठार मारत आहेत, त्याच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर भरपूर फिरलेल्या आहेत.
 
हे सगळे आहेच. पण, 2001 सालापूर्वीची तालिबान राजवट आणि आताची 2021 नंतरची तालिबानी राजवट यांच्यात नक्कीच फरक आहे. नवी राजवट कट्टरवादी आहेच पण, प्रत्येक ठिकाणी शरियत कायद्याचा आग्रह धरून चालणार नाही. आपल्याला राज्य नीट चालवायचे असेल, तर निदान व्यापार, उद्योग यांच्यात लवचिक व्यवहारी धोरणाने वागावे लागेल, हे नव्या राज्यकर्त्यांना उमगले आहे.
 
नेमके हेच धोरण पाक राज्यकर्त्यांना आवडलेले नाही. म्हणून त्यांनी ‘इस्लामिक स्टेट खुरासान’-’आयएसके’ या मूळ ‘आयएसआयएस’च्या एका गटाला मोठे करायचे ठरवले आहे. तसा हा गट 2015 सालीच स्थापन झालेला आहे. इराणमध्ये जेव्हा ‘ससानियन’ नावाचे प्रबळ साम्राज्य होते, तेव्हा ‘खुरासान’ हा त्यांचा एक मोठा सुभा होता. आजचा जवळपास संपूर्ण अफगाणिस्तान, थोडा इराणचा पूर्व भाग आणि तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकीस्तान यांचे थोडे-थोडे भाग मिळून ‘खुरासान सुभा’ बनत असे. ‘आयएसके’ला आज खुरासान हा स्वतंत्र देश बनवायचा आहे.
 
आता खरे पाहता यात बलुचिस्तान कुठेच येत नाही. पण, ‘आयएसके’ या पाकिस्तानी लष्कराचा आशीर्वाद असल्यामुळे यांच्या गुप्त छावण्या मस्तुंग आणि क्वेट्टा या बलुच प्रदेशात आहेत. ही ठिकाणे अफगाण-पाक सीमेनजीक आहेत. म्हणजे, पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागात दहशतवादी अड्डे चालवायचे आणि अफगाण सीमेतून आत घुसून अफगाणी खेड्यांमध्ये लुटालूट, छापामार, कत्तली करून सुखरूप परत यायचे. थोडक्यात पाकचे अफगाणी तालिबानी सत्ताधार्‍यांना हे एक प्रकारचे आव्हान आहे, ‘शरियतला मुरड घालता काय ? मग भोगा फळं’ आणि आता बलुचिस्तानातली स्वातंत्र्यचळवळ वाढत चालली आहे म्हटल्यावर, पाकने त्यांच्यावरही ‘आयएसके’ला छूः करून सोडले आहे. अमेरिकेला खूश करायला पाकने ‘आयएसके’च्या एका मोठ्या नेत्याला पकडून दिले. अमेरिका खूश! लगेच सेनाप्रमुख मुनीर आलमला समारंभात मिरवायला आमंत्रण मिळणार!
सुब्रह्मण्यम् जयशंकर म्हणतात ते पूर्णपणे सत्य आहे. पाकिस्तान हा देश नसून, दहशतवादी संघटना जन्माला घालणारी एक सैतानी खाण आहे. तुम्ही या दहशतवादाविरुद्ध ठाम भूमिका न घेतल्यास, तो तुमच्याही मानगुटीवर बसणार आहे. म्हणजे भारताच्या कठोर प्रहाराने भयभीत झाल्यासारखे दाखवणारा पाकिस्तान, प्रत्यक्षात बलुचिस्तानला चेपून शिवाय अफगाणिस्तानातल्या तालिबान सरकारलाही वाकुल्या दाखवतो आहे.पाटाचा खेळ...
 
- मल्हार गोखले 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121