मुंबई: मुंबईच्या कांदिवलीतील सीब्रुक नावाच्या सोसायटीत राहणाऱ्या गुजराती मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीच्या अल्पवयीन मुलाने ५७ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने सोसायटीच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवार दि. २ जुलै संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गुजराती टीव्ही मालिकेतील अभिनेत्री तिच्या कुटुंबासह कांदिवली पश्चिमधील सीब्रुक नावाच्या सोसायटीत राहते, बुधवारी संध्याकाळी तिने तिच्या मुलाला ट्यूशनला जाण्यास सांगितले, परंतु मुलाला ट्यूशनला जाण्याची इच्छा नव्हती. याच गोष्टीवरून आई आणि मुलामध्ये वाद झाला. वादातून संतप्त झालेल्या मुलाने टोकाचे पाउल उचलत राहत्या घराच्या ५७ व्या मजल्यावरील गॅलरीतून उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
अभिनेत्रीचा हा एकुलता एक मुलगा होता आणि मुलाच्या अशा कृतीने संपूर्ण परिवाराला मानसिक धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी त्यांच्या प्राथमिक तपासात या घटनेची अपघाती मृत्यू नोंद केली आहे.