अधारणीय वेगांबद्दल मागील दोन लेखांमधून आपण माहिती वाचत आहोत. त्यातील शौच वेग धारण, मूत्र वेग धारण, वायू (Farting) वेग धारण, शिंकेची संवेदना थांबविणे, भुकेची संवेदना थोपविणे व तहान लागलेली असताना ती संवेदना थोपविणे याने शरीरावर अनिष्ट, अनारोग्यकर परिणाम काय होतात, त्याबद्दल आपण वाचले. यापुढे इतर शारीरिक वेगांबद्दल जाणून घेऊया.
पुढील महत्त्वाचा वेग म्हणजे निद्रा अर्थात झोप. झोप ही काही वेळा अतिप्रमाणात टाळली जाते. आयुर्वेदानुसार माणसाला तेव्हा झोप येते, जेव्हा कार्य (काम) करून शरीर आणि मन थकून जाते आणि अन्य कुठल्याही विषयांमध्ये, आसपासच्या घडामोडींमध्ये लक्ष लागत नाही, तेव्हा त्या व्यक्तीला झोप येते. गाढ झोप तेव्हाच लागते, जेव्हा शरीर आणि मन दोन्हीही थकते. आपण बरेचदा बघतो की, ट्रेनच्या प्रवासात काही मंडळी उभ्या उभ्याच झोपतात. ट्रेन हलत असते, आसपास कलकलाटही असतो, बरेचदा हातात (खांद्यावर) सामान असते, कुठेही शांती, आराम नसतो, तरीही ती व्यक्ती शांत झोपलेली दिसते. याचे कारण की, शरीराबरोबरच मनही थकलेले असते, ताजेतवाने नसते. आसपासच्या परिसरात होणार्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणे अशा वेळेस कठीण होते.
बरेचदा रुग्णांना ‘किती वाजता झोपता?’ असा प्रश्न विचारला की, उत्तर ‘किती वाजता’ऐवजी ‘किती तास’ झोपतो, याचे मिळते. आठ तासांची झोपही पुरेशी आहे, असा बर्याचजणांचा समज असतो. पण, फक्त आठ तास हा निकष आयुर्वेदाने सांगितलेला नाही. ही झोप रात्रीची होणे अपेक्षित आहे. बरेचदा परीक्षार्थी मुलामुलींमध्ये रात्री २ ते ३ वाजेपर्यंत जागून अभ्यास करायची सवय असते आणि त्यानंतर (परीक्षा असल्यास) दोन ते तीन तास व परीक्षा नसल्यास १० ते १२ वाजेपर्यंत झोपायची प्रथा झाली आहे किंवा थोडे वयाने मोठे, कार्यालयात जाणारे कार्यालयामधून आल्यावर रिलॅक्स होण्यासाठी जेवणानंतर ऑनलाईन गेम्स, चित्रपट, क्रीडा, बातम्या इ. मध्यरात्रीपर्यंत बघितले जाते.
या विविध इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समधून निळ्या किरणांचे उत्सर्जन होत असते. याचा अर्थ असा की, जोपर्यंत त्या गॅजेट्सचा प्रकाश डोळ्यांवर पडतो, तोपर्यंत डोळ्यांमार्फत मेंदूपर्यंत अशी संवेदना पोहोचवली जाते की, अजून उजेड आहे, प्रकाश आहे (म्हणजेच, अजून दिवस आहे, रात्र झाली नाही) म्हणून जोपर्यंत हातात व डोळ्यांसमोर गॅजेट असते, बहुतांशी व्यक्तींना झोप लवकर येत नाही. मग मध्यरात्री कधीतरी हातातून गॅजेट पडते आणि तुटक झोप लागते. रात्री गॅजेटवर जे बघितलेले असते, त्याची मनामार्फत मेंदूवर स्मृती निर्माण झालेली असते आणि बरेचदा तोच विषय झोपेत स्वप्नावस्थेत दिसत राहतो. शरीर जरी निपचित पडलेले असेल, तरी मनाला शांती, विश्रांती मिळत नाही. परिणामी, सकाळी उठल्यावरही ताजेतवाने वाटत नाही. गळून गेल्यासारखे वाटते.
या दोन्ही (पहाटे झोपणे आणि गॅजेट बघत मध्यरात्रीनंतर झोपणे) चुकीच्या सवयी आहेत. केवळ आठ तास झोप आरोग्यासाठी हितकर असते, असे नाही, तर ही आठ तासांची झोप कधी घेतली जाते, झोपेचा दर्जा (तुटक झोप, खूप स्वप्ने पडणे की शांत-गाढ झोप) व सकाळी लवकर उठल्यावर कसे वाटते (आळसावल्यासारखे की ताजेतवाने) या सगळ्या बाबी महत्त्वाच्या आहेत. आयुर्वेदाप्रमाणे प्रकृतिनुरूप व वयानुरूप, तसेच ऋतुनुसार झोपेचा कालावधी हा भिन्न भिन्न असतो. उदा. लहान, नवजात बाळ २० ते २२ तास झोपते व वृद्धांमध्ये अंदाजे चार ते पाच तास झोपही पुरेशी असते. उन्हाळ्यात दिवसाही झोप येते. काही आजारांमध्ये किंवा आजारातून बरे वाटल्यावर शारीरिक थकव्यामुळे दिवसभर व्यक्तीला पेंग येत राहते, हे सगळे स्वाभाविक आहे. वात प्रकृतीच्या व्यक्तींची झोप तशी कमी असते आणि तुटक असते, तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये विविध, विस्तृत अशी स्वप्ने अधिक पडतात. कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये झोप अधिक असते, गाढ असते. म्हणजे एकाच वयातील विविध प्रकृतींच्या व्यक्तींमध्येदेखील झोपेचा कालावधी आणि झोपेचा दर्जा वेगवेगळी असते. प्रकृती एकेरी कमी बघायला मिळते. बरेचदा ती Combination मध्ये असते (जसे वात-पित्तज, पित्त-कफज किंवा वात-कफज प्रकृती आणि तिन्ही दोषांची अशी एक सम प्रकृती ही असेल) सम प्रकृतीसुद्धा कमी बघायला मिळते.
झोप ही रात्रीची असावी व पहाटे उठावे. झोपण्यापूर्वी रात्रीचे जेवण दोन तास तरी अंदाजे आधी व्हावे. दिवसा झोप आल्यास जेवणापूर्वी झोपावे. रात्रीचे जागरण झाले म्हणून दिवसा झोपायचे असल्यास, रात्री जेवढे तास जागरण झाले आहे, त्याच्या निम्म्याने उपाशी पोटी झोपावे, असे सर्व शास्त्र नियम आहेत. गरजेपेक्षा जास्त झोपल्यास आळसावणे, सकाळी ताजेतवाने न वाटणे आणि स्थौल्याकडे वाटचाल सुरू होते. कफाचे विविध त्रास (श्वसनाचे त्रास, त्वचाविकार) वारंवार होऊ लागतात. पचनाच्या तक्रारी, मलबद्धतेला त्रास इत्यादीही होऊ शकते. सकाळी उशिरा उठल्यामुळे आम्लपित्ताचा त्रास सुरू होतो, बळावतो. उठल्यावर डोके जड, ताजेतवाने न वाटणे, तोंडाला दुर्गंधी, भरपूर शिंका इ. तक्रारी सुरू होतात.
झोपेच्या चुकीच्या पॅटर्न्सचा परिणाम स्मरणशक्ती आणि आकलनशक्तीवरही होतो. अतिझोपेमुळे स्मृती आणि बुद्धीवरही एक आवरण आल्यासारखे होऊन चटकन आठवणे, लक्षात ठेवणे, समजणे होत नाही (काम विसरणे, अभ्यास लक्षात न राहणे, मन एकाग्र न होणे इ.) होऊ लागते. जशी अति झोप घातक, तशीच कमी झोप हीदेखील घातक. परीक्षार्थी परीक्षेच्या काळामध्ये (महाविद्यालय आणि प्रोफेशनल कोर्सेस, एन्ट्रन्स परीक्षा देणार्यांमध्ये विशेषतः) Night मारतात’ मग कॉफी, सूप प्या, सतत चरत (खात) राहा, अवेळी व्यायाम आणि एनरज् ड्रींक्स पिणे किंवा अपरात्री अंघोळ करणे इ. उपाय अवलंबिले जातात. या सगळ्या कारणांनी विविध रोग होतात. झोप शरीर व मनाला विश्रांती मिळण्याच्या दृष्टीने अतिशय गरजेची आहे. जसे गॅजेट रिचार्ज केले जाते, शरीर आणि मनाला ताजेतवाने करण्यासाठी झोप अत्यंत गरजेची आहे. आरोग्याच्या त्रिसुत्रीमध्ये आहाराइतकेच झोपेलाही आयुर्वेदशास्त्रात महत्त्व आहे.
झोपेकडे दुर्लक्ष केल्यास, झोप आलेली असताना टाळल्यास डोळे जड होतात, आपल्या विचारांवर, बुद्धीवर झापड आल्यासारखे होते, आसपासचे ज्ञान चटकन होत नाही, अति जांभया येत राहतात. अंग जड होणे, आळस येणे इ. होते. वारंवार जर अपुरी झोप झाली किंवा झोप झालेली असूनही न झोपल्यास डोके भणभणणे, चिडचिड वाढणे, कुठल्याही गोष्टीला शारीरिक-मानसिक-वाचिक प्रतिक्रिया चटकन देता न येणे इ. लक्षणे दिसतात. असे वारंवार झाल्याने शरीराची झीज झोपेत भरून काढण्याचे जे कार्य घडते, त्याला बाधा उत्पन्न होते. त्वचा काळवंडणे, सुकणे, चेहर्यावरचे तेज कमी होणे, पित्ताच्या विविध तक्रारी उत्पन्न होणे, दिवसभर पेंग येत राहणे, ज्यांचा रक्तदाब जास्त असतो, तो अधिक वाढतो, हृदयाच्या तक्रारी उद्भवू शकतात, वाढू शकतात. एकंदरीत प्रतिकारशक्तीवरही निद्रा वेग धारणाचा अनिष्ट परिणाम होताना दिसतो. तेव्हा, झोपेची टाळंटाळ न करता, आरोग्यासाठी रात्रीची सहा ते आठ तास (प्रौढांसाठी) सतत, शांत झोप नक्की घ्यावी. (क्रमश:)
वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
९८२०२८६४२९