विधानसभेत टीम इंडियाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून खेळाडूंचे तोंडभरून कौतुक

    10-Mar-2025
Total Views |
 
Devendra Fadnavis on team india
 
मुंबई :( Devendra Fadnavis on team india ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दमदार विजय मिळवल्याबद्दल सोमवार, १० मार्च रोजी विधानसभेत त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यावेळी त्यांनी भारतीय संघाचे तोंडभरून कौतुकही केले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा भारताने आपले वर्चस्व सिद्ध करत ट्रॉफी जिंकली ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे मनापासून अभिनंदन. रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात संघाने प्रचंड मेहनत केली असून शेवटच्या सामन्यात रोहित शर्मा यांनी आपली नेहमीची स्टाईल बदलून ७६ धावा काढल्या. याच धावा निर्णायक होत्या. हा विजय म्हणजे असंख्य भारतीय क्रिकेटप्रेमींना मिळालेली अविस्मरणीय भेट आहे. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये भारतीय संघात आपल्याला जी सांघिक भावना पहायला मिळाली, ती वाखाणण्यासाठी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याला सातत्याने हुलकावणी देत होती. मागच्या वेळी आपल्या मनात असलेले एक शल्यसुद्धा आपण पूर्ण करू शकलो. लागोपाठ दोन आयसीसी चॅम्पियनशीप जिंकणारा भारत हा एकमेव देश ठरला आहे," असे ते म्हणाले.
 
रोहित शर्मा आणि विराट कोहलीची क्लासी बॅटिंग
 
"सुरुवातीच्या काळात अनेक टीकाकार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल बोलत होते. मात्र, फॉर्म हा तात्पुरता असतो पण क्लास हा पर्मनंट असतो हे त्या दोघांनीही दाखवून दिले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्या क्लासी बॅटिंगमधून अनुभवी पण तरुण खेळाडू असल्याचे दाखवून दिले. वरुण चक्रवर्ती या खेळाडूचे विशेष कौतुक करावेसे वाटते. आपल्या शालेय जीवनात ते क्रिकेट खेळले. त्यानंतर त्यांनी आर्किटेक्ट करून नोकरी केली. त्यामुळे त्यांचे क्रिकेटशी नाते तुटले. परंतू, त्यांच्या रक्तातच क्रिकेट असल्याने ते पुन्हा इकडे वळले आणि आज त्यांच्या फिरकीपुढे सगळेच नेस्तनाबूत झाले. आपण काय आहोत हे त्यांनी यानिमित्ताने दाखवून दिले. वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी महत्वाच्या क्षणी महत्वाच्या विकेट लढत समोरच्या संघांना अडचणीत आणले. काही युवा तर काही अनुभवी असा हा उत्तम संघ होता," अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
 
ते पुढे म्हणाले की, "कपिल देव यांच्या नेतृत्वात १९८३ साली पहिल्यांदा विश्वचषक जिंकलो तो क्षण हा भारतीय क्रिकेटचा वॉटरशेड क्षण होता. त्यानंतर भारतीय क्रिकेटने कधी मागे वळून बघितले नाही. चॅपियन्स ट्रॉफीवर तीनवेळा नाव कोरनारा भारत आता एकमेव देश झाला आहे. या संपूर्ण टीमचे आपण निश्चितपणे स्वागत करू. आज क्रिकेटच्या जगतात भारत हा संपूर्ण विश्वाचे नेतृत्व करतो आहे आणि भारत ही अभेद्य टीम आहे. भारतीय संघाच्या अभिनंदनाचा ठराव हा काही प्रशस्तीपत्राच्या रूपात संघाच्या प्रत्येक खेळाडूला पाठवायला हवा," अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली. त्यानंतर सर्व खेळाडूंना हा ठराव पाठवण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन अध्यक्षांनी दिले.