"क्षमापत्र नाही, चित्रपट प्रदर्शित होणार नाही"; कमल हसन यांचा कर्नाटकमध्ये ठाम निर्णय!

    04-Jun-2025   
Total Views |

kamal haasan firm decision in karnataka


बेंगळुरू : "कन्नड भाषा तमिळमधून जन्मली" या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता कमल हसन यांनी मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयात स्पष्ट केलं की, त्यांच्या आगामी थग लाईफ या चित्रपटाचा कर्नाटकमधील प्रदर्शन सध्या स्थगित करण्यात आला असून, त्यांनी कोणतेही क्षमापत्र देण्याची आवश्यकता नाही असं त्यांचं मत आहे. या वक्तव्यानंतर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलं की, "तुम्ही कितीही मोठे कलाकार असलात, तरी जनतेच्या भावना दुखावण्याचा तुम्हाला अधिकार नाही." एका साध्या क्षमापत्रामुळे हा वाद मिटू शकला असता, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली.

हसन यांचे वकील, ज्येष्ठ वकील ध्यान चिनप्पा यांनी न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांच्या खंडपीठासमोर सादर केले की, हसन आणि त्यांच्या राजकमल फिल्म्स इंटरनॅशनल या कंपनीने कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स (KFCC) सोबत चर्चा होईपर्यंत चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

हसन यांनी KFCC ला लिहिलेल्या पत्रात कन्नड भाषा व कर्नाटकी जनतेबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त केलं असून, ते पुरेसं असल्याचं चिनप्पा यांनी सांगितलं. "क्षमापत्र केवळ जिथे द्वेषभावना असेल तिथे गरजेचं असतं, आणि हसन यांच्या वक्तव्यात कोणताही द्वेष नव्हता," असं ते म्हणाले. हा वक्तव्य थग लाईफ च्या ऑडिओ लॉन्चवेळी चेन्नईत २४ मे रोजी दिलं होतं.

न्यायालयाने मात्र या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत म्हटलं की, "तुम्ही सार्वजनिक व्यक्ती आहात, तुमचं एक विधान असंतोष आणि अस्थिरता निर्माण करतं आणि त्यानंतर तुम्हीच राज्य यंत्रणेकडून संरक्षण मागता, हे योग्य नाही." न्यायालयाने हसन यांचं संपूर्ण वक्तव्य ऐकलं आणि विचारलं, "जेव्हा तुम्हाला समजतं की तुमचं विधान लोकांच्या भावना दुखावणारं होतं, तेव्हा तुम्ही एक साधं क्षमापत्र का देत नाही?"

न्यायमूर्ती नागप्रसन्ना यांनी शेक्सपियरच्या "Discretion is the better part of valour" या वचनाचा उल्लेख करत, नम्रता दाखवण्याचा सल्ला दिला. त्यांनी असंही सांगितलं की, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांनीही एकदा असंच विधान केलं होतं, पण नंतर कन्नड लेखकांकडून सूचना मिळाल्यानंतर त्यांनी क्षमापत्र दिलं होतं. "ही माफीनामा नाही. ‘जर मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो’ असं एक वाक्यही इथे नाही," असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

दरम्यान, हसन यांचे वकील म्हणाले की, चित्रपट रोखण्याने जनतेच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा येते. मात्र, न्यायालयाने हे मत फेटाळलं. "तुम्ही प्रसिद्धीचा वापर जबाबदारीपासून दूर राहण्यासाठी करू शकत नाही," असं न्यायालयाने ठणकावून सांगितलं. या प्रकरणाला आता राजकीय वळणही लागलं आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी म्हटलं, "कमल हसन यांनी जर चुका केली असेल, तर त्यांना माफी मागावी लागेल. न्यायालय आवश्यक ती कारवाई करेल."

भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनीही तीव्र शब्दांत टीका करत म्हटलं, "अहंकार माणसाला मोठं करत नाही, माफी मागणं हेच माणसाचं मोठेपण दर्शवतं." याचवेळी हसन यांचे वकील म्हणाले की, २०१८ मध्ये अभिनेता रजनीकांत यांनी काला चित्रपटाच्या आधी कावेरी पाणी वादावर एक वक्तव्य केलं होतं आणि नंतर माफी मागितली होती. याचप्रमाणे इथेही संवेदनशीलतेने कारवाई होणं गरजेचं आहे. न्यायालयाने राज्य सरकार आणि KFCC ला नोटीस बजावली असून पुढील सुनावणी १० जून रोजी होणार आहे.


अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.