मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’चा समारोप; तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीत क्रांती घडवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र देशाच्या ‘ॲग्री बेस्ड स्टार्टअप्स’ क्षेत्रात नेतृत्व करत आहे.” पुणे ‘ॲग्री हॅकेथॉन’चा पारितोषिक वितरण व समारोप समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे शक्य होईल. ॲग्री हॅकेथॉनमधून निर्माण होणाऱ्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे इनक्युबेशन करून त्यांना यशस्वी स्टार्टअप्समध्ये रूपांतरित करणे हे पुढचे पाऊल असेल.
त्यांनी स्पष्ट केले की, AI आधारित सल्ला देणारे ॲप कृषी विभागाने विकसित केले आहे. हॅकेथॉनमध्ये मांडलेले तंत्रज्ञान, जसे की कीटक नियंत्रण, जलसिंचन, पीक फवारणी, AI कंट्रोल रोव्हर्स, ड्रायर्स, आणि काढणीनंतर प्रक्रिया, हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. यासाठी कृषी महाविद्यालयांमध्ये इनक्युबेशनची गरज असून राज्य सरकारने तयार केलेल्या ₹120 कोटींच्या ‘फंड ऑफ फंड्स’चा वापर त्यासाठी केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘क्लीन प्लांट इनिशिएटिव्ह’ चा उल्लेख करत सांगितले की, पुण्यातून याचा शुभारंभ झाला असून हॉर्टिकल्चरमध्ये (फलोत्पादन) महाराष्ट्र आघाडीवर असल्यामुळे याचे जास्त केंद्रे महाराष्ट्राला मिळावीत.
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे विशेष योगदान आणि महाराष्ट्रावरील लक्ष यांचीही त्यांनी प्रशंसा केली, ‘ग्राम विकास’ योजनेतून 20 लाख घरे आणि EGS द्वारे ₹4,500 कोटी निधी मिळवण्यात यश आल्याचंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृषी विभागाला अशा हॅकेथॉन राज्यभरात आयोजित करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, देशातील सर्वाधिक 30–32% स्टार्टअप्स कृषी क्षेत्राशी संबंधित असून, त्यातील बहुसंख्य महाराष्ट्रातील आहेत.
त्यांनी हेही नमूद केले की, वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर भाज्या व फळांसाठी क्रॉप कव्हर योजनेसाठी राज्य सरकार सकारात्मक आहे, आणि अशा उपक्रमांमुळे शेतीत नवी दिशा मिळेल.
“ही क्रांती पुढे नेली, तर शेती फायद्याची बनू शकते आणि शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने बदल घडवता येईल,” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
यावेळी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री भरत गोगावले व इतर मान्यवर उपस्थित होते.