"संजय राऊत ज्या ज्या ठिकाणी जातात तिथे..."; मंत्री गिरीश महाजनांचा हल्लाबोल
04-Jun-2025
Total Views |
मुंबई : संजय राऊत ज्या ज्या ठिकाणी जातात तिथे भूकंप होतो. ते प्रभारी म्हणून पक्ष संघटन करायला जातात आणि त्याठिकाणी विघटन होते, असा हल्लाबोल मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. उबाठा गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, "संजय राऊतांना नाशिकमध्ये प्रभारीपद दिले आहे आणि तिथे पक्षाला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे ते निराश आणि हताश झाले असून त्यातून असे वक्तव्य करत आहेत. मी ३५ वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता आहे. पक्षाशी एकनिष्ठ असून संघाचा स्वयंसेवक आहे. मी २० ते २५ वर्षे सत्तेच्या विरोधात होतो. त्यावेळी मलासुद्धा अनेक आमिष दाखवण्यात आले. मला सगळा महाराष्ट्र ओळखतो. माझ्यावर एवढे खोटे गुन्हे दाखल झाल्यानंतरही मी एकदाही उद्धवजींना फोन केलेला नाही. तसे असल्यास त्यांनी सांगावे."
"नाशिकमध्ये उबाठा गटात मोठा भूकंप होणारच आहे. आता इथे कुणी राहत नाही हे त्यांना माहिती असल्याने ते एकेकाची हकालपट्टी करत आहेत. तिथे कुणीही राहायला उत्सुक नाही. संजय राऊत ज्या ज्या ठिकाणी जातात तिथे असाच भूकंप होतो, असे मला वाटते. ते प्रभारी म्हणून पक्ष संघटन करायला जातात आणि त्याठिकाणी विघटन होते. लवकरच नाशिकमध्येसुद्धा तेच होणार आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "संजय राऊतांनी आपत्ती विभागात साडेतीनशे फाईल पडून असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांनीच माझ्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे किती फाईल पेंडिंग आहेत ते बघावे. मंत्रिपद स्विकारल्यापासून माझ्याकडे २०९ फाईल्स आल्या होत्या. त्यातील जवळपास १९३ फाईल कधीच्याच मंजूर केल्या आहेत. आता १५ ते १६ फाईल्स असून त्यातील १४ फाईल या दोन ते तीन दिवसांतच माझ्याकडे आलेल्या आहेत. त्यामुळे संजय राऊत काहीतरी वायफळ बोलतात. त्यांच्यावर कुणी काही बोलले की, मग बेछूट आरोप करायचे आणि सनसनाटी परसरवायची, असे ते करतात. त्यामुळे या माणसावर कुणाचाही विश्वास नाही. त्यांच्या मुखपत्रावरही कुणाला विश्वास राहिलेला नाही," अशी टीकाही त्यांनी केली.
संजय राऊतांचे कर्तृत्व काय?
सुधाकर बडगुजर हे राऊतांच्या जवळचे होते. आता त्यांनीच त्यांची हकालपट्टी केली. त्यांचे आपसात मोठे वाद आहेत. केवळ बडगुजरच नाही तर पक्षातील अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि मोठे नेते पक्ष सोडण्याच्या स्थितीत आहेत. अनेकजण नाराज असून वैतागले आहेत. राऊतांच्या त्यांच्या अशा वागण्या बोलण्यामुळे पक्षावर काय परिस्थिती येते हे दिसेल. बोलण्याशिवाय संजय राऊतांचे दुसरे कर्तृत्व काय? फक्त सकाळी बोलणे, वाट्टेल तसे बेताल वक्तव्य करणे याशिवाय त्यांचे कर्तृत्व काय? त्यांचे सामाजिक कार्य काय आहे? संजय राऊत सगळ्यांवर बेछूट आरोप करतात. पण हे करताना आपण काय आहोत? काय करत आहोत हेसुद्धा त्यांनी सांगायला हवे किंवा लोकांना ते दिसले पाहिजे. तेव्हाच लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील," असेही गिरीश महाजन म्हणाले.
राऊतांमुळे पक्षावर ही परिस्थिती!
"शिवसेनेतून ४५ आमदार सोडून गेले तेव्हादेखील हे म्हणजे काही शिवसेना नाही. ज्यांना जायचे त्यांनी जा, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यामुळे त्यांचे सगळे आमदार निघून गेलेत. त्यांच्या या बेताल वागण्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे," अशी टीकाही त्यांनी केली.