
मुंबई: महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने घाटकोपर येथील मेसर्स खुशी ट्रेडिंग या दुकानाविरोधात एक्सपायरी झालेल्या अन्न उत्पादनांचे मोठ्या प्रमाणात पुनर्पॅकेजिंग व पुनर्विक्री केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
खुशी ट्रेडिंग हे दुकान डी-मार्टच्या आउटलेटमधून या सर्व एक्सपायरी वस्तू खरेदी करत होती व पुन्हा नवीन पुनर्पॅकेजिंग करून पुनर्विक्री करत होती.
सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक : एफडीए
अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम आणि सहआयुक्त मंगेश माने यांच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. मेसर्स खुशी ट्रेडिंगच्या या कथित काळ्या धंद्याची माहिती अधिकार्यांना समजताच, एफडीएच्या बृहन्मुंबई झोन-८ च्या पथकाने दुकानावर अचानक छापा टाकला. या तपासणी दरम्यान, एफडीएच्या अधिकाऱ्यांना असे आढळून आले की, हे दुकान भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या वैध परवान्याशिवाय कार्यरत होती.
याशिवाय हे दुकान अत्यंत अस्वच्छ स्थितीत होते जे की, कायद्याच्या अनुसूची ४ अंतर्गत विहित केलेल्या अनिवार्य स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणारे ठरते. या छाप्यात अधिकाऱ्यांनी अशी कागदपत्रे देखील जप्त केली आहेत जी या गोष्टी सष्ट करतात की हे दुकान डी-मार्टमधून मोठ्या प्रमाणात एक्सपायरी उत्पादने विकत घेउन किरकोळ विक्रीसाठी त्यांची पुनर्पॅकिंग करत होती. एफडीए अधिकाऱ्यांनी ही पद्धत "सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक" आहे असे स्पष्ट केले.
छापा तपासणीनंतर, अधिकाऱ्यांनी आरोपी दुकानाच्या सर्व व्यावसायिक क्रियांना स्थगिती देण्याचे आदेश दिले होते. परंतू २९ मे रोजी झालेल्या अचानक फॉलो-अप तपासणीत असे दिसून आले की, दुकानाने अधिकृत शटडाऊन आदेशाचे उघडपणे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे आपले कामकाज पुन्हा सुरू केले आहे. या घटनेनंतर, अन्न आणि औषध प्रशासनाने घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार दाखल केली आहे.