डोंबिवली, डोंबिवलीत कॉग्रेस आणि मनसे ला खिंडार पडले असून विधानसभा निवडणूकीत सगळ्य़ात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपात अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणूकीचे बिगुल वाजयला सुरूवात झाली असून भाजपात जोरदार इनकमिंग सुरू झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. कॉग्रेस, मनसे यांच्यासह विविध मंडळातील कार्यकर्ते, शेकडो नागरिकांसह त्यांनी रविवारी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रवेश करण्यात आला आहे.
कॉग्रेस ब्लॉक अध्यक्ष शशिकांत (गणेश) चौधरी, महिला ब्लॉक अध्यक्ष गिता चौधरी, बाळा सावंत, मनसेचे सुभाष कदम, विजय शिंदे, तसेच डोंबिवली पश्चिमेतील मनिष मोरे, राजेश नाना भोईर, अनेक महिला मंडळ, सामाजिक मंडळे, समाजसेवक आणि सहकारी यांनी प्रवेश केल्याची माहिती भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली.
दरम्यान भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले, येत्या 22 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस असून या निमित्ताने संपूर्ण राज्यात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून डोंबिवलीत दोन ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे असे ही त्यांनी सांगितले.
तर डोंबिवली मंडल अध्यक्ष पवन पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपा परिवार कटिबध्द असून हे विविध पक्षांतील कार्यकत्यांनी पटवून देण्यात यश येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा परिवारामध्ये मोठय़ा प्रमाणात प्रवेश होत आहेत. याचाच एक भाग म्हणून रविवारी 20 जुलै 2025 रोजी शेकडो कार्यकर्ते भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा परिवारात सामील झाले आहेत असे पाटील यांनी सांगितले.
यावेळी भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, डोंबिवली मंडल अध्यक्ष पवन पाटील, मंडल अध्यक्षा प्रिया जोशी, मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, समीर चिटणीस आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.