अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नुकतेच ज्याच्या गळ्यात अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे बहुमानाचे पदक घातले, तो आर्थिक दहशतवादी जॉर्ज सोरोस एकेकाळी २०१५च्या आसपास अमेरिका आणि युरोपला उद्ध्वस्त करण्याची योजना आखत असल्याचा आरोप ‘एक्स’ आणि ‘टेस्ला’चे सर्वोसर्वा एलॉन मस्क यांनी केला आहे. जॉर्ज सोरोसने त्याच्या चेल्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतःच्यासंकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या लेखाचा आधार घेत, मस्क यांनी ही टीका केली आहे. या लेखामध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांच्या लोंढ्यांना युरोप आणि अमेरिकेमध्ये कायमस्वरुपी नागरिकत्व कसे मिळवून देता येईल, यासाठी आवश्यक अशा सहा मार्गदर्शक पायर्या सोरोसने त्यांच्या चेल्यांसाठी सूचविल्या होत्या.
यामध्ये युरोप आणि अमेरिकेमध्ये येणार्या लोंढ्यांसाठी साधारणपणे सामान्य आश्रय धोरणाची निर्मिती करण्याचे सोरोस यांनी सूचविले होते. तसेच, या बेकायदेशीर स्थलांतरितांना स्वीकारताना, एकाच देशावर भार वाढू नये, यासाठी स्थालांतरितांचे लोंढे संपूर्ण युरोप महासंघातील सर्व देशांत समान विभागले जातील, याची काळजी घेण्याच्या सूचनादेखील त्या सहा कलमी कार्यक्रमांमध्ये होत्या. तसेच, प्रत्येक वर्षी अमेरिका आणि युरोपने वर्षाकाठी दहा लाख बेकायदेशीर स्थलांतरितांचा स्वीकार करावा आणि जगण्यासाठी या बेकायदेशीर स्थलांतरितांना १५ हजार पाऊंड किंवा १६ हजार, ८०० अमेरिकन डॉलर्स यांचे अनुदान देण्याबाबतदेखील सूचना केल्या होत्या.
अर्थात, येनकेन प्रकारे स्थलांतरितांना युरोप-अमेरिकेमध्ये घुसवल्यानंतर, तेथील सरकारवर आपल्या चेल्यांच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर करून या स्थलांतरितांना नागरिकत्व मिळवून देण्याचा विडाच सोरोसने उचलला असल्याचे समोर आले आहे. याव्यतिरिक्त सोरोसने युरोपीय महासंघाला तुर्की, लेबेनॉन आणि जॉर्डनला आर्थिक सहकार्य करण्याच्यादेखील सूचना केल्या होत्या. या आर्थिक मदतीच्या माध्यमातून वरील देश त्यांच्या देशातील चार लाखांहून अधिक स्थलांतरितांसाठी सहकार्य करू शकतील. त्यानंतर या युरोपीय देशांनी ग्रीस अथवा इटलीमार्गे या बेकायदेशीर स्थलांतरितांना स्वतःच्या देशात येऊ देण्यासाठी, एका सुरक्षित राखीव मार्गाची निर्मिती करण्याचेदेखील सोरोसने सूचविले होते. या सगळ्याचा होणारा खर्च भागवण्यासाठी स्वयंसेवी संस्था, चर्च किंवा काही उद्योगपतींच्या माध्यमातून निधी उभा करावा, असेही सोरोसची कल्पना होती. यावरूनच, सोरोस या आर्थिक दहशतवाद्याने युरोपमधील देश आणि अमेरिकेला उद्ध्वस्त करण्याचा विडाच उचललेला दिसून येतो.
सोरोसचे सारेच तत्वज्ञान एकाच गृहितकावर आधारित आहे. ते म्हणजे, या जगात कशालाच सीमा नसाव्या, सारे काही मोकळे, बंधनमुक्त असावे. समाजापासून देशांच्या सीमांपर्यंत सगळेच सगळ्यांसाठी खुले असावे, असा सोरोसचा मुक्तछंद विचार. हाती असलेल्या गडगंज आर्थिक ताकदीवर जागतिक पातळीवर असाच विचार करणारा समाज आणि सगळ्या देशांतील सरकारे असावी, यासाठी सोरोस कायमच प्रयत्नशील. त्यासाठीच त्याने स्वतःच्या स्वयंसेवी संस्थेचे नावही ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ असेच ठेवले आहे. सोरोस हे नाव जरी आज चर्चेमध्ये आले असले, तरी जागतिक राजकारणाच्या मंचावरचा तो जुनाच खेळाडू आहे.
याच सोरोसच्या मुक्त विश्वाच्या संकल्पनांच्या नादी लागून युरोपीय देशांनी असंख्य बेकायदेशीर स्थलांतरितांना जवळ केले. त्याचे दुष्परिणाम आज युरोपातील नागरिकांना सहन करावे लागत आहेत. या स्थलांतरित नागरिकांना आश्रय दिल्यानंतर त्यांच्या बेबंदशाहीला आळा घालताना युरोपातील सुरक्षा यंत्रणांची दमछाक झाली आहे. सातत्याने या बेकादेशीर स्थलांतरितांना नागरिकत्व दिल्याने युरोपमध्ये सांस्कृतिक आणि राजकीय बदलदेखील झपाट्याने होताना दिसून येत आहे. आजमितीला ख्रिश्चनबहुल लंडनचा महापौर हा पाकिस्तानी आहे. मुक्त विश्व व्यवस्थेच्या नावाखाली जगातील प्रत्येक देशातील सांस्कृतिक विविधतेची राखरांगोळी करण्याचे उद्योगच सोरोस उघडपणे करत आहे.
प्रत्येक देशाची संस्कृती ही त्या भागातील लोकांच्या जीवनशैलीशी निगडित असते. त्यात, अवाजवी स्थलांतरणामुळे सांस्कृतिक र्हास तर होतोच, शिवाय टोकाचा वांशिक संघर्षदेखील त्या त्या देशाची घडी विस्कटायला हातभार लावतो. या संघर्षाचा धोका संपूर्ण मानवतेलाच आहे. म्हणूनच प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क सोरोसला ‘मानवतेचा शत्रू’ म्हणतात, ते योग्यच म्हणावे लागेल.
कौस्तुभ वीरकर