दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा यांनी नुकतीच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची ‘व्हाईट हाऊस’मध्ये भेट घेतली. त्यावेळी ट्रम्प अचानक सिरिल यांना म्हणाले की, “दक्षिण आफ्रिकेमध्ये हजारो श्वेतवर्णीय शेतकर्यांची हत्या झाली आहे.” यावर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल म्हणाले, “आमच्या देशात गुन्हेगारी वाढली आहे. मात्र, श्वेतवर्णींयांपेक्षा अश्वेतवर्णीयांच्या हत्या जास्त झाल्या आहेत.” काय खरे काय खोटे?
असो. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिकनेर या श्वेतवर्णीय समुदायातील 60 जणांना अमेरिकेचे नागरिकत्व बहाल केले. हे आफ्रिकनेर कोण आहेत? तर ते पश्चिमी युरोपीय लोकांचे वंशज आहेत. हे लोक 17व्या शताब्दीमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थायिक झाले. या समुदायामध्ये 34.8 टक्के डच, 33.7 टक्के जर्मन आणि 13.2 टक्के फ्रेंच आहेत. या सगळ्यांनी मिळून स्वतःचा एक सांस्कृतिक समूह बनवला. मागील काही वर्षांत या समूहातील काही शेतकर्यांच्या हत्या झाल्या. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेतील ‘द इकोनॉमिक फ्रीडम फायटर्स’ या राजकीय पक्षाची नेता जूलियस मलेना हिने जाहीरपणे भाषण केले की, “एका एका श्वेत व्यक्तीला मारा; असे मारा की, त्याला भयंकर वेदना झाल्या पाहिजेत. आपण श्वेतवर्णीय व्यक्तीला मारत नाही, तर श्वेतवर्णीय उच्च भावनेला मारत आहोत.” तिथे सध्या एक गीत अगदी प्रसिद्ध आहे, “मारण्यासाठीच शूट करा; मारा त्या शेतकर्यांना, बोऐर ना.” तिथे डच लोकांना ‘बोऐर’ म्हणतात. या सगळ्याचा परिणाम असा की, श्वेतवर्णीयांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले. या सगळ्याचा संदर्भ देत ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये श्वेतवर्णीयांवर अत्याचार होतो आहे, असे म्हटले. पण, खरे पाहिले तर हे हल्ले दोन्ही बाजूंनी आहेत.
इतिहासाचा मागोवा घेतला तर जाणवते की, पाश्चात्यांनी जगभरातील अनेक देशांवर पारतंत्र्य लादून त्या देशांवर जे अत्याचार केले, तेच या समूहाने दक्षिण आफ्रिकेतील लोकांवर केले. 1950 साली दक्षिण आफ्रिकेमध्ये आफ्रिकनेर समुदायाच्या वर्चस्वाचे सरकार होते. त्यावेळी आफ्रिकनेर नेता हेंड्रिक वर्वर्ड जाहीरपणे म्हणाला, “अश्वेतांना अजिबात शिकवू नये. त्यांचे काम केवळ लाकूड कापणे आणि पाणी भरणे आहे.” पुढे 1994 साली नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेमध्ये सत्तेवर आले, तेव्हा कुठे अश्वेतवर्णीयांना मतदानाचा अधिकार मिळाला. आजही दक्षिण आफ्रिकेतील 70 टक्के शेतजमीन ही श्वेतवर्णीयांची आहे. अर्थात, श्वेत काय अश्वेत काय, कुणीही स्वतःच्या किंवा त्यांच्या बापजाद्यांच्या कष्टाने जमीन किंवा संपत्ती मिळवलेली असली, तर त्याबाबत काहीच म्हणणे नाही. मात्र, इथे 17व्या शतकात दक्षिण आफ्रिकेबाहेरून आलेल्या श्वेतवर्णीयांनी प्रचंड हिंसाचार, अत्याचार करत तेथील अश्वेतवर्णीयांच्या जमिनी लाटल्या.
दुसरीकडे ट्रम्प वर्णभेद वंशभेदाला विरोध करतात. मात्र, त्यांच्या अमेरिकेमध्येही वर्ण आणि वंशभेद आहेच. ‘कोरोना’ काळात अमेरिकेमध्ये जॉर्ज फ्लॉएड या कृष्णवर्णीय व्यक्तीची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. 2019 साली अमेरिकेच्या अधिकृत जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येमध्ये आफ्रिकन-अमेरिकन लोकसंख्या 14 टक्क्यांपेक्षाही कमी होती. पण, ज्या लोकांना पोलिसांनी गोळी झाडून ठार केले, अशांमध्ये आफ्रिकन-अमेरिकन लोकांचे प्रमाण मात्र 23 टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. 2018 सालच्या आकडेवारीनुसार, श्वेत आणि अश्वेत अमेरिकन नागरिक दोघांचेही अमली पदार्थ सेवनासंदर्भात प्रमाण समान होते. मात्र, दर एक लाख आफ्रिकन अमेरिकनांपैकी 750 जणांना ड्रग्जमुळे अटक करण्यात आली, तर एक लाख श्वेतवर्णीय अमेरिकनांपैकी 350 नागरिकांना अटक करण्यात आली. थोडक्यात, अमेरिकेमध्येही अश्वेतवर्णीयांवर अत्याचार घडत असल्याच्या घटना नित्याच्याच आहेत. त्यामुळे ट्रम्प हे वंशभेद आणि वर्णभेद होतो म्हणत श्वेतवर्णीयांसाठी जसे उभे राहिले, तसे त्यांच्याच देशातील अश्वेतवर्णीयांच्या मानवी हक्कांसाठी उभे राहतील का? की त्यांची शाश्वत मानवी मूल्ये केवळ अमेरिकेतील बहुसंख्य श्वेतवर्णीय नागरिक खूश व्हावे यासाठीच आहेत? खरे तर कोणत्याही भेदानुसार माणसावर अत्याचार होणे, संधी नाकारणे, यापेक्षा दुसरे अमानवीय काही नाही!