आईनस्टाईनने वरील प्रश्न उपस्थित करणारे एक जाहीर पत्र ‘लीग’मार्फत फ्रॉईडला पाठवले. या पत्राला उत्तर पाठवताना फ्रॉईडने लिहिले, ‘युद्ध करणे, हिंसा करणे, विध्वंस करणे, आपल्यासारख्याच असलेल्या दुसर्या माणसाला मारण्याची इच्छा होणे, ही माणसाची एक सहजप्रवृत्ती आहे. तिला लगाम घालता येईल, पण ती नाहीशी करता येणार नाही.’
१९४८ साली राम गबाले यांच्या दिग्दर्शनात एक मराठी चित्रपट आला होता. त्याचे नाव होते ‘वंदे मातरम्’. कथा, पटकथा, संवाद आणि गीते ग. दि. माडगूळकरांची. संगीत सुधीर फडके यांचे, तर नायक आणि नायिका म्हणून चक्क पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे. चित्रपटाची कथा १९४२ सालच्या ‘भारत छोडो आंदोलना’वर आधारित होती.
१९४२ सालचे आंदोलन मुंबईतून सुरु झाले आणि देशभर पसरले. युरोपात दुसरे महायुद्ध ऐन भरात होते. तीच संधी साधून काँग्रेसने हे आंदोलन छेडले होते. पण, ब्रिटिश सरकार मूर्ख नव्हते. त्यांनी झाडून सगळ्या पुढार्यांना उचलून तुरुंगात टाकले आणि गोळीबार, लाठीमार आदि मार्गांचा पाशवी वापर करीत आंदोलन चिरडून टाकले. महाराष्ट्रासह देशभरातले आंदोलन दोन-तीन महिन्यांत थंडावले. अपवाद फक्त सातारा-सांगली जिल्ह्याचा. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, किसन वीर इत्यादी नेत्यांनी ब्रिटिश सरकारला थेट १९४५ सालापर्यंत चांगलेच झुंजवले. अखेरच्या काळात नागनाथ नायकवडी यांनी तर सशस्त्र सैन्य उभे करण्याची जोरदार तयारी केली होती. यावरून तुमच्या लक्षात येईल की, अहिंसा, शांती, वैश्विक प्रेम वगैरे जडजड शब्द वापरणारे नेते तुरुंगात गेल्यावर, जनतेने मिळेल ते शस्त्र हाती घेऊन ब्रिटिश सरकारविरोधात लढाई पुकारली होती. गोळीबारात एकूण १ हजार, ६४ माणसे ठार झाली, असा सरकारी आकडा आहे.
वरील चित्रपटाचे लेखक गदिमा यांच्यावर या आंदोलनाचा प्रचंड प्रभाव होता. नव्हे, ते स्वतःच या आंदोलनात सहभागी होते. वर उल्लेख केलेले सर्व नेते हे गदिमा ऊर्फ अण्णा आणि त्यांचे बंधू व्यंकटेश ऊर्फ तात्या यांचे मित्रच होते. दोघाही माडगूळकर बंधूंच्या आत्मचरित्रपर लेखनात याबद्दल भरपूर उल्लेख आहेत.
फक्त आश्चर्याची गोष्ट अशी की, मिळेल ते शस्त्र हातात घेऊन आंदोलनात उतरलेल्या या लोकांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही स्वतःला शांतिवादी, अहिंसक म्हणवून घेणे पसंत केले. वरील ‘वंदे मातरम्’ चित्रपटात अण्णा माडगूळकरांनी लिहिलेले आणि सुधीर फडक्यांनी स्वतःच संगीतबद्ध करून गायलेले एक विलक्षण ओजस्वी गीत आहे - ‘वेदमंत्रांहून आम्हा वंद्य वंदे मातरम्!’ पहिल्या कडव्यात कवी लिहितो - ‘माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुति, आहुतिंनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम्!’
आता या कडव्यानंतर कवी जणू एकदम सावध झालाय की, अरे आपण तर क्रांतिकारक वीरांची प्रशंसा करतोय. मग म्हणतो - ‘याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले, शस्त्रधारी निष्ठुरांशी तो शांतिवादी झुंजले.’ आता तुम्हीच विचार करा की, याला भाबडेपणा म्हणायचे की, ढोंगीपणा म्हणायचे? शांतिवाद्यांचे सगळे प्रमुख नेते वेगवेगळ्या तुरुंगात चरखा फिरवत होते, सूत कातत होते, कुणी पुस्तके लिहित होते. आणि अनुयायी हिंसक मार्गांनी सरकारला हैराण करत होते. तरी शांतिवादी झुंजले असेच म्हणायचे? या मराठी चित्रपटानंतर सहा वर्षांनी म्हणजे १९५४ साली ‘जागृती’ नावाचा हिंदी चित्रपट आला. त्यातलेच ते प्रसिद्ध गाणे - ‘दे दी हमें आझादी, बिना खड्ग बिना ढाल!’
आज हे सगळे वृत्तांत वाचताना माझ्या तरी मनात चक्क असे विचार येतात की, या शांतिवादी नेत्यांना ‘मास हिप्नॉटिझम’ म्हणजे ‘सामुदायिक मोहिनीविद्या’ अवगत होती की काय? अरे, लोकांनी आपले रक्त शिंपडून आंदोलने लढवली, स्वातंत्र्य मिळवले आणि तुम्ही म्हणता, ‘आमच्या देशाला पूर्णपणे अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळाले.’ गंमत म्हणजे तेच लोक, तीच जनता ही धडधडीत खोटी विधाने करणार्यांना डोक्यावर घेते. हा भाबडेपणा म्हणायचा की सामुदायिक मोहिनी विद्येचा परिणाम?
असो. तर अल्बर्ट आईनस्टाईन हा महान शास्त्रज्ञसुद्धा शांतिवादी होता. ज्याच्या भौतिकशास्त्रातील संशोधनावरून पुढे अण्वस्त्रे बनवण्यात आली आणि त्या अण्वस्त्रांच्या प्रत्यक्ष वापराने लाखो माणसे ठार झाली, तो महान आली भौतिकशास्त्रज्ञ आईनस्टाईन चक्क शांतिवादी होता. आईनस्टाईन हा मूळचा जर्मन ज्यू. त्याचा जन्म १८७९ सालचा. आईनस्टाईन कुटुंबाने पुढे स्वित्झर्लंडमध्ये स्थलांतर केले. १९४१ साली युरोपात पहिले महायुद्ध भडकले. तेव्हा आईनस्टाईन ३५ वर्षांचा होता. १९४१ ते १९१८ या काळात झालेले पहिले महायुद्ध हे आधुनिक मानवजातीच्या तोवरच्या इतिहासातले सर्वाधिक संहारक आणि विध्वंसक युद्ध होते. या विध्वंसामुळे अतिशय अस्वस्थ झालेल्या अनेक नेत्यांमध्ये अमेरिकेचा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन हा प्रमुख होता. जगात यापुढे कधीच युद्ध होऊ नयेत, अशा विचारांतून वुड्रो विल्सनने पुढाकार घेऊन ‘लीग ऑफ नेशन्स’ या संस्थेची स्थापना केली. सध्याच्या ‘युनो’ची ही पूर्वज संस्था होय. जगभरच्या शांतिवादी नेते, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ अशा मंडळींनी ‘लीग ऑफ नेशन्स’च्या व्यासपीठावरुन जागतिक शांततेचा जोरदार पुरस्कार केला. देशादेशांमधले मतभेद युद्धाच्या टोकापर्यंत जाऊ नयेत, म्हणून ही लीग सतत कार्यरत राहिली.
१९३१ साली ‘लीग ऑफ नेशन्स’च्या माध्यमातून अल्बर्ट आईनस्टाईनने एक प्रश्न उपस्थित केला - ‘युद्धाच्या विध्वंसापासून मानवजातीला कायमची मुक्ती देण्याचा काही उपाय आहे का?’ आता हा प्रश्न मूलभूत मानवी प्रवृत्तीशी निगडित आहे. एक माणूस दुसर्या माणसाशी भांडण करतो, एक लोकसमूह दुसर्या लोकसमूहाशी भांडतो, त्याला ठार मारून त्याची संपत्ती लुटू पाहातो, लाला गुलाम बनवून याच्यावर वर्चस्व गाजवू पाहातो. असे का होते? ही प्रवृत्ती नाहीशी होऊन माणूस शांततेने सहजीवन जगू शकणार नाही का?
मानवी मन आणि त्याच्या मूलभूत प्रवृत्ती यांच्याशी निगडित असे हे प्रश्न विचारायला आईनस्टाईनने तितकाच भारी माणूस शोधून काढला. तो म्हणजे सिग्मंड फ्रॉईड. प्रोफेसर फ्रॉईड हासुद्धा मूळचा जर्मन ज्यू. त्याचा जन्म १८५६ सालचा. तो ऑस्ट्रियात व्हिएन्ना (योग्य उच्चार व्हियेना) इथे राहात असे. बहुभाषाकोविद आणि असंख्य क्षेत्रांमध्ये अफाट संशोधन करणारा फ्रॉईड ‘मानसशास्त्र’ या विषयातील ‘सायकोअॅनलिसिस’ सिद्धांतामुळे जगभर प्रसिद्ध झाला. माणसाचे मन विशिष्ट प्रसंगांत विशिष्ट तर्हेनेच का विचार करते आणि त्यानुसारच का कृती करते? याबद्दल फ्रॉईड आयुष्यभर संशोधन, चिंतन आणि अध्यापन करत होता.
कदाचित त्यामुळेच तो अजिबात शांतिवादी वगैरे नव्हता. आईनस्टाईनने वरील प्रश्न उपस्थित करणारे एक जाहीर पत्र ‘लीग’मार्फत फ्रॉईडला पाठवले. या पत्राला उत्तर पाठवताना फ्रॉईडने लिहिले, ‘युद्ध करणे, हिंसा करणे, विध्वंस करणे, आपल्यासारख्याच असलेल्या दुसर्या माणसाला मारण्याची इच्छा होणे, ही माणसाची एक सहजप्रवृत्ती आहे. तिला लगाम घालता येईल, पण ती नाहीशी करता येणार नाही.’
१९३३ साली आईनस्टाईन आणि फ्रॉईड यांच्यातला हा पत्रव्यवहार पुस्तिका रुपात प्रसिद्ध झाला. गंमत म्हणजे, त्याचवर्षी जर्मनीत हिटलर सत्तारूढ झाला. आपल्याला आता जर्मनीत राहाता येणार नाही, हे समजून चुकलेल्या ज्यू आईनस्टाईनने अमेरिकेत आश्रय घेतला. पुढे १९८३ साली हिटलरच्या सैन्याने ऑस्ट्रिया व्यापला. तेव्हा ज्यू फ्रॉईडला व्हिएन्ना सोडून इंग्लंडमध्ये आश्रय घ्यावा लागला. माझ्या मनात येते, १९६२ साली माओचे चिनी सैन्य ‘नेफा’ (आता अरुणाचल प्रदेश)च्या सीमेवरुनच परत गेले म्हणून बरे, त्यांनी जर आसाम आणि बंगाल व्यापला असता, तर तिथले हिंदू शांतिवादी कुठे बरे गेले असते? असो. तर स्वप्नाळू शांतिवादी आईनस्टाईन आणि रोखठोक प्रक्टिकल फ्रॉईड यांचा वरील पत्रव्यवहार ‘व्हाय वॉर’ अशा नावाच्या पुस्तिकेत उपलब्ध आहे.
आता याच नावाचे ताजे पुस्तक रिचर्ड जेम्स ओेव्हेरी या ब्रिटिश लष्करी इतिहासकाराने लिहिले आहे. हे त्याचे 31वे पुस्तक आहे. आधुनिक शिक्षण, मानवी प्रगती, वाढलेले दळणवळण इत्यादींमुळे माणसाचा हिंसक स्वभाव खूपच नियंत्रणात आला आहे, असे हल्लीचे शांतिवादी म्हणत असतात. ओव्हेरी म्हणतो, दुसरे महायुद्ध जेव्हा धडाडून पेटले, तेव्हा सर्वच युद्धमान राष्ट्रांनी आपल्या व्यावसायिक सैन्याच्या जोडीला नवीन भरती केलेले सैन्य मोठ्या संख्येत युद्धात आणले. या नव्या सैनिकांना अगदी माफक प्रशिक्षण दिलेले होते. सर्व देशांचे असे नवे रंगरूट मिळून किमान दहा कोटी माणसे युद्धात उतरली होती आणि ती सर्व आपल्या शत्रूला म्हणजे आपल्यासारख्याच माणसांना बॉम्बने उडवून द्यायला, गोळ्या घालायला किंवा प्रसंगी बायोनेटने भोसकून ठार मारायला अगदी उत्साहाने तयार झालेली होती. महायुद्धानंतरचे शीतयुद्ध हे जागतिक वर्चस्वासाठी चालूच होते. आजची मध्य-पूर्वेतली धुमसती स्थिती, रशिया आणि युक्रेन युद्ध, तैवानच्या प्रश्नावरून अमेरिका आणि चीन यांच्यात सतत वाढणारा तणाव हे सर्व मोठी युद्धे पेटवू शकणारे मुद्दे आहेत. यात सहभागी असणार्यांना युद्धातल्या विध्वंस आणि संहार यांचे भान नाही, असे तर म्हणता येणार नाही. कुणाला धार्मिक वर्चस्व गाजवायचे आहे, तर कुणाला सर्वंकष सत्ता हवी आहे. कुणाला दुसर्याची साधनसंपत्ती हडप करायची आहे, तर कुणाला दुसर्यापासून सुरक्षितता हवी आहे.
तात्पर्य, आईनस्टाईनचा शांतिवाद हा गप्पा मारायला ठीक असला, तरी फ्रॉईडचा रोखठोक व्यवहारवादच खरा होणार आहे. युद्धाला जर खूप प्राचीन असा इतिहास असला, तर त्याला तितकेच लांबलचक भविष्यही असणारच आहे.
लेखक - मल्हार कृष्णा गोखले