पंतप्रधान मोदी यांचं सिंगापुर मध्ये जंगी स्वागत !

अॅक्ट-ईस्ट अंतर्गत अत्यंत महत्वपूर्ण दौरा, भारतीय समुदायात उत्तसाहाचं वातावरण.

    04-Sep-2024
Total Views |

pm modi
 
 
 
 
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल ६ वर्षांनी सिंगापुरला भेट दिली. सिंगापुर मध्ये सत्तांतर घडले असून, लॉरेन्स वोंग आता पंतप्रधानपदाची धुरा सांभाळत आहेत. भारताच्या "अॅक्ट-ईस्ट" धोरणाअंतर्गत हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं बोललं जात आहे. या आधी पंतप्रधान मोदी यांनी ब्रुनेईचे पंतप्रधान आणि सुलतान हाजी हसनल बोलकिया यांची भेट घेतली. पंतप्रधान जेव्हा निवासासाठी तिथल्या हॉटेलमध्ये पोहोचले, तेव्हा तेथील स्थानिक भारतीय जनसमुदायाने त्यांचे जंगी स्वागत केले. पंतप्रधानांनी काही जणांना स्वाक्षरी सुद्धा दिली. त्याचसोबत तिथल्या भारतीय महिलांनी पंतप्रधान यांना राखी सुद्धा बांधली. याच दरम्यान तिथल्या लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण संचारल्याचे पाहायला मिळाले. भारतीय समुदायातील लोकांचा उत्साह पाहून पंतप्रधान मोदींनी स्वतः ढोल वाजवला. याच दरम्यान, "गणपती बाप्पा मोरया" असा जयजयकार सुद्धा लोकांनी केला.
पंतप्रधानांची एक झलक पाहण्यासाठी, त्यांच्याशी हस्तांदेलन करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. पंतप्रधान मोदी हे सिंगापुरचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या समवेत उद्योजकांची सुद्धा भेट घेणार आहेत.

सिंगापुर भेटीचा अजेंडा.

सिंगापुर हा आशियाई देशांमधील भारताचा सर्वात मोठा व्यापारातला भागीदार आहे. या भेटी दरम्यान चायना सी, म्यानमार आदी मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. व्यापाराच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला सिंगापुरचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भारतात येणाऱ्या परदेशी गुंतवणुकीचा मोठा भाग सिंगापुर मधून होतो. वैश्विक दृष्ट्या सेमी-कंडक्टर इको सिस्टीम मध्ये सिंगापुरने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या क्षेत्रात सिंगापुरचा २० वर्षांहून अधिक अनुभव आहे.

भारतासाठी सिंगापुरचे महत्व.
सद्यस्थितीत भारताचा जोर "ॲक्ट ईस्ट" या धोरणावर आहे. २०१४च्या आशियाई - भारत शिखर परिषदे पासून या धोरणाची सुरुवात झाली. हिंद महासागरातील वाढत्या सागरी क्षमतेचा सामना करणे आणि दक्षिण चीन समुद्र तसेच, हिंद महासागरात धोरणात्मक भागीदारी निर्माण करणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.
चीन सातत्याने दक्षिण चीन समुद्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो आहे. या मुळे चीन सोबत अनेक देशांचे वाद सातत्याने होत असतात. साऊथ चायना सी च्या काही भागांवर चीन दावा करत असून, सदर भागात परिस्थिती चिघळण्याची चिन्हं वारंवार नजरेस आली आहे. या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला ब्रुनेई आणि सिंगापूरचा दौरा, आणि ॲक्ट ईस्ट धोरण हे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.