बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा! आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाचा निर्णय

    02-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली : (Former Bangladesh PM Sheikh Hasina)
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बुधवारी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) न्यायालयाच्या अवमान प्रकरणात सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 'द ढाका ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती मोहम्मद गोलम मोर्तुझा मोझुमदार यांच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण-१ च्या तीन सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला.हसीना यांची शिक्षा त्याच्या अटकेच्या किंवा आत्मसमर्पणाच्या दिवसापासून लागू होणार आहे.

ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, याच प्रकरणात न्यायाधिकरणाने गायबंधा येथील गोविंदगंज येथील शकील अकंद बुलबुल यांनाही दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. बुलबुल हे ढाक्यातील एक राजकीय व्यक्ती असून ते अवामी लीगच्या विद्यार्थी संघटने बांगलादेश छात्र लीग (बीसीएल) शी संबंधित होते.

शेख हसीना यांच्याविरुद्धचा अवमान खटला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शकील अकंद बुलबुल यांच्याशी झालेल्या कथित फोन कॉलशी जोडला गेला होता. कथित ऑडिओमध्ये, हसीना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका आवाजात असे म्हटले होते की, "माझ्याविरुद्ध २२७ खटले दाखल झाले आहेत, म्हणून मला २२७ लोकांना मारण्याचा परवाना मिळाला आहे."

वृत्तानुसार, सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की, हे विधान न्यायालयाचा अवमान करणारे आहे, कारण त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेला धोका निर्माण झाला होता आणि देशातील मोठ्या उठावाशी संबंधित सुरू असलेल्या खटल्यांमध्ये सहभागी असलेल्या लोकांना, आंदोलकांना धमकावण्याचा प्रयत्न झाला होता.

जवळजवळ एक वर्षापूर्वी देश सोडून पलायन केल्यानंतर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना एखाद्या प्रकरणात शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच वेळ आहे. बांगलादेशमध्ये देशव्यापी निदर्शने आणि अवामी लीग सरकार पडल्यानंतर शेख हसीना ऑगस्ट २०२४ मध्ये भारतात आल्या. तेव्हापासून त्या नवी दिल्ली येथे राहत आहेत.






अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\