नामुश्की-ए-पाक

    13-Aug-2024   
Total Views |
vibhajan vibhishika din


आज दि. 14 ऑगस्ट. फाळणीच्या अगणित वेदनांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस आपण ‘विभाजन विभिषिका दिन’ म्हणून साजरा करतो, तर दुसरीकडे हा दिवस पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन. तेव्हा, स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने पाकिस्तानची वाटचाल नेमकी कुणीकडे सुरु आहे, त्याची कल्पना यावी.

पाकिस्तानची गुप्तचर संघटना ’आयएसआय’ सध्या त्यांच्या माजी प्रमुखांनी केलेल्या कारनाम्यांमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. ‘आयएसआय’चे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांना गृहनिर्माण घोटाळ्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे, पाकिस्तानी लष्कर हमीदचे ‘कोर्ट मार्शल’ करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पाकिस्तानच्या एखाद्या लेफ्टनंट जनरलवर झालेली कारवाई ही या देशाच्या इतिहासातील बहुधा पहिलीच वेळ. फैज हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान आणि त्यांच्या ‘तेहरिक-ए-इन्साफ’ पक्षाचे निकटवर्तीय मानले जातात. इमरान खान यांना हमीद यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात मुदतवाढ अपेक्षित होती, पण तालिबानशी जवळीक असल्याने तत्कालीन लष्करप्रमुखांच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही. फैज हमीद हे पाकिस्तानी लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल असून ते वेगवेगळ्या कॉर्प्सचे कमांडरही होते. हमीद हे जून 2019 ते नोव्हेंबर 2022 पर्यंत पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’चे महासंचालक होते.

अशा या पाकिस्तानी सैन्य आणि राजकीय वर्तुळातील मोठे प्रस्थ असलेल्या हमीदवर एक-दोन नव्हे, तर बरेच गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 2023 मध्ये ‘टॉप सिटी हाऊसिंग सोसायटी’च्या व्यवस्थापनाने फैज हमीदवर, मालक मोईज खान यांच्या कार्यालयावर आणि घरावर छापे टाकून लाच घेतल्याचा आरोप केला होता. या आरोपांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने गृहनिर्माण संस्थेचे मालक मोईज यांना संरक्षण मंत्रालयाकडे तक्रार करण्यास सांगितले होते. तेव्हा फैज हे चर्चेत आले होते. तसेच ‘अल कादिर ट्रस्ट’ घोटाळा प्रकरणात फैजने पाच अब्ज रुपयांची लाच घेतल्याचेही सांगितले जाते. ‘अल कादिर ट्रस्ट’ घोटाळा तोच आहे, ज्यामध्ये इमरान खान यांना गेल्या वर्षी 9 मे रोजी अटक करण्यात आली होती.

हमीद यांनी निवृत्तीनंतर पाकिस्तानी लष्कराच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला. इतकेच नाही तर त्यांच्यावर ‘आयएसआय’ प्रमुखपदाचा गैरवापर केल्याचा आरोप होता. अफगाणिस्तानच्या नागरी सरकारला असंतुलित करण्यात आणि तालिबानला काबूल ताब्यात घेण्यास मदत केल्याचा आरोपही फैजवर ठेवण्यात आला होता. एखाद्या राष्ट्राच्या निवृत्त लेफ्टनंट जनरलवर इतके आरोप असणे आणि आज त्यांना कोर्ट मार्शलसारख्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणे, ही खरंच त्या राष्ट्रासाठी लज्जास्पद गोष्ट. वास्तविक, ‘कोर्ट मार्शल’ ही न्यायिक प्रक्रिया आहे, ज्यात लष्करी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल लष्करी कर्मचारी असो किंवा अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाते. आरोपीला वकिलाची मदत घेण्याचा अधिकार आहे आणि त्याला आपले म्हणणे मांडण्याची पूर्ण संधीही दिली जाते.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान हे पाकिस्तानी लष्कर आणि ‘आयएसआय’शी एकनिष्ठ होते व आपले पद वाचवण्यात लोभी होते, म्हणून ते यांच्या गैरकृत्यांवर मौन बाळगून होते किंवा राजकीय आवरण देण्याचा प्रयत्न करतात. बलुचिस्तानमध्ये जबरदस्तीने बेपत्ता केल्या जाणार्‍या घटना आणि पाकिस्तानी लष्कराने केलेले अमानुष प्रयोग, बलुचिस्तानमध्ये चीनकडून मिळवलेल्या रासायनिक आणि जैविक शस्त्रांचा वापर करण्यासारखे संपूर्ण अमानुष प्रयोग यांबाबतइमरान खान यांनी कायम मौन बाळगले. अशा परिस्थितीत खान यांनी लष्कराचा शत्रूच पाकिस्तानचा शत्रू असल्याचे गालबोट लावले होते. त्यामुळे इमरान खानला निश्चितच असे विचारावे लागेल की, मग सिंध आणि बलुचिस्तानच्या लोकांवर होणार्‍या या अत्याचारांवर गप्प राहून पाक सैनिकांच्या वेशात रफियांना प्रोत्साहन का देत आहात? आंतरराष्ट्रीय समुदाय आणि मानवाधिकार संस्थांनी पाकिस्तानच्या अशा राक्षसी कृत्यांविरोधात आवाज उठवण्याची, कठोर चौकशी सुरू करण्याची आणि दोषींना जबाबदार धरण्याची वेळ आली आहे.




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक