वेदांचे पर्यावरणपूरक व्यापक विचार

    05-Jun-2024
Total Views |
Vedas and Environment Sustainability


सर्व प्रकारचे प्रदूषण... मग ते पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश या पंचमहाभूतांच्या संदर्भातील असो की नद्या, वनस्पती, पशु-पक्षी आदींच्या बाबतीतले, यांचे संरक्षण कसे करावे आणि वाढत्या प्रदूषणामुळे सबंध जीवसृष्टीला कसे वाचवावे, याबाबतीत वेदांचे चिंतन हे फारच मौलिक स्वरूपाचे आहे. कालच साजरा झालेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वेदांचे पर्यावरणपूरक व्यापक विचार मांडणारे हे चिंतन...

 
निकामे निकामे न: पर्जन्यो वर्षतु
फलवत्यो न ओषधय: पच्यन्तां
योगक्षेमो न: कल्पताम्। (यजु.२२/२२)
 
अनादी काळापासून वेदांनी सबंध प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी जो उपदेश दिला आहे, तो निश्चितच बहुमूल्य स्वरूपाचा मानला जातो. मानवी जीवनाच्या ऐहिक व आध्यात्मिक सुखासाठी अनवरतपणे प्रवाहित होणारी परमेश्वराची ही अपौरुषेय अमृतवाणी ‘विश्व-जीवहिताय, सर्वलोकमंगलाय!’ अशीच आहे. सद्ययुगात गरज आहे, ती वेदातील मंत्रांचा वैज्ञानिक विशुद्धार्थ ग्रहण करण्याची! कारण, यामुळे वेदांप्रती असलेली पूर्वाग्रहदूषित भावना नाहीशी होऊन विवेकार्थ जागृत होण्यास व भूमंडळावर उद्भवणार्‍या समस्यांच्या निराकरण करण्यास मदत मिळेल. समस्या कालच्या असोत की आजच्या अथवा भविष्यातील, तसेच त्यांचे विषय व स्वरूप देखील कोणतेही असो, त्यांचे मूलभूत समाधान हे वेदविज्ञानात दडलेले आहे. कारण, वेदांचे तत्वज्ञान हे सार्वकालिक, सार्वभौमिक व सार्वजनिक स्वरूपाचे आहे. सद्यपरिस्थितीत सारे विश्व विविध गंभीर समस्यांनी वेढलेले असल्याने त्यावर उपाय म्हणून विशुद्ध वैदिक विचार फारच प्रासंगिक ठरतात.
आजकाल सर्वात मोठा प्रश्न भेडसावतोय तो पर्यावरणाचा! बुद्धिमान समजल्या जाणार्‍या माणसाने आज आपल्या भौतिक सुखासाठी निसर्गाला वेठीस धरले आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर प्रदूषणाचा भस्मासुर मानवाचे जगणे असह्य करु पाहतोय. याला जबाबदार कोण? तर माणसाची स्वार्थी व दुष्ट प्रवृत्ती! सर्व प्रकारचे प्रदूषण... मग ते पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश या पंचमहाभूतांच्या संदर्भातील असो की नद्या, वनस्पती, पशु-पक्षी आदींच्या बाबतीतले, यांचे संरक्षण कसे करावे आणि वाढत्या प्रदूषणामुळे सबंध जीवसृष्टीला कसे वाचवावे, याबाबतीत वेदांचे चिंतन हे फारच मौलिक स्वरूपाचे आहे. चारही वेदसंहितातील विविध सूक्तांमध्ये सृष्टी तत्वांचे रक्षण व संवर्धन करण्याचा उपदेश मिळतो. आप: सूक्तात पाणी हे मानवी जीवनाचे अविभाज्य घटक असून, त्याचे रक्षण करण्याचा संकेत दिला आहे. जल हे सर्व प्रकारच्या रोगांसाठी अमृतत्वाचे कार्य करते. ’आपो भवन्तु पीतये!’ अर्थात, आम्हां सर्वांच्या पालन-पोषणासाठी दिव्य स्वरूपाचे पाणी उपयुक्त ठरो, अशी कामना यजुर्वेदात आहे. इतकेच काय तर ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाला स्वतःचे दूध पाजविते, त्याचप्रमाणे मातृरुप पाणी हे आम्हां सर्वांना मधुर रसाने तृप्त करो, असा भाव अथर्ववेदात आढळतो.
 ऋग्वेदात देखील ’यूयं हि ष्ठा भिषजो मातृतमा!’असे व्यक्त करीत जलास हे औषध व सर्वश्रेष्ठ माता मानले आहे. याचेच कारण आहे की, निसर्गोपचार किंवा आयुर्वेदशास्त्रात उष्ण, शीतल, कोमट अशा पाण्याचा प्रयोग करीत रुग्णांवर चिकित्सा केली जाते.पाण्याबरोबरच पृथ्वी तत्वाविषयीचा वेदांचा दृष्टिकोन फारच विशाल आहे. प्राणी, पक्षी व वनस्पतींना आधार मिळतो, तो भूमीद्वारेच! म्हणूनच सर्वप्रथम वेदाने भूमीला ‘माता’ म्हणून संबोधले आहे. ‘माता भूमि: पुत्रोऽहं पृथिव्या:।’ म्हणजेच भूमी ही माझी माता आहे आणि मी तिचा पुत्र आहे. आई आणि मुलाचे हे दृढ नातेसंबंध सतत विकसित होत राहण्याकरिता विविध ठिकाणी मांगलिक कामना करण्यात आले आहेत. यासाठीच अथर्ववेदातील पृथ्वी (भूमी) सूक्त हे सर्वाधिक महत्त्वाचे मानले जाते. यात आलेले एकूण ६३ मंत्र हे स्वदेशभक्तीबरोबरच पृथ्वीच्या उपकारांचे वर्णन करणारे आहेत. यातील २६व्या व ४२व्या मंत्रांमध्ये ‘पृथिव्या अकरं नमः व भूम्यै नमोऽस्तु!’ अशा शब्दांत भूमिमातेला नमस्कार केला आहे. यावरूनच ’वंदे मातरम्’ची संकल्पना उदयास येते.

पर्यावरणाच्या दृष्टीने पृथ्वी ‘विश्वंभरा’ (सर्वांचे भरण-पोषण करणारी), ‘वसुधानी’ (विविध प्रकारच्या धन-धान्यांना सांभाळणारी), प्रतिष्ठा (सर्व प्रकारच्या वस्तू व पदार्थांचा आधार असलेली), ‘हिरण्यवक्षा’ (आपल्या वक्षस्थळी सोने-चांदी इत्यादी धातूंना धारण करणारी), ‘जगतो निवेशनी’ (जड व चेतन जगता लाल चे स्थान असलेली) या विविध विशेषणांनी परिपूर्ण असलेली ही भूमी आम्हां सर्वांना धन-ऐश्वर्याने परिपूर्ण करो, अशी कामना करण्यात आली आहे. तसेच ही भूमिमाता ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत या सर्व ऋतूंमध्ये आमच्या कामना पूर्ण करणारी ठरो, अशी प्रार्थना देखील व्यक्त होते. या भूमीमातेच्या कुशीत राहत, आम्ही ही तिची लेकरे शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरामय होत सर्व प्रकारच्या आजारांना परतून लावणारे ठरोत. यजुर्वेदात (३६/१७) आलेल्या शांतिपाठात द्युलोक, अंतरिक्ष, पृथ्वी, जल, औषधी, वनस्पती आणि जगातील इतर दिव्य तत्वे शांतिदायक व समन्वित भाव बाळगणारे ठरोत आणि तीच शांतता माझ्यामध्ये देखील समाविष्ट हो, अशीच कल्पना करण्यात आली आहे. ऋग्वेदातील पहिल्या मंडळातील मधुसूक्तात दिवस-रात्र, औषधी, वनस्पती, नद्या, समुद्र तसेच मातीची धूळ या सर्व बाबी सर्व प्राणी समूहासाठी मधुमय म्हणजेच गोड असोत, असा भाव व्यक्त होतो.
वैदिक शांतिप्रकरणात बहुतांश मंत्र हे यजुर्वेदातून आले आहेत. त्यात वायू सुव्यवस्थित वाहत राहो, सूर्याचा दाह जीवसृष्टीसाठी तापदायक न ठरता सुखकारक ठरो, पर्वतांच्या रांगा सुस्थिर राहत सर्वांसाठी अनुकूल बनोत. पृथ्वी ही अन्नधान्याने परिपूर्ण होत सर्वांकरिता आनंददायक ठरो. चारही दिशा व उपदिशा या आम्हां सर्वांसाठी मित्रांप्रमाणे सुख देत राहोत. यांसह निसर्गातील सर्वच तत्वे विश्व समूहासाठी शांती कारक बनोत. याशिवाय वनराई, शेती, पशु-पक्षी, इतर जीवजंतू या सर्वांबाबतही वेदांमध्ये मंगल कामना दृष्टीस पडते. वृक्षारोपण करून त्यांचे मुलांप्रमाणे संगोपन करावे. घरांचे बांधकाम करताना दारासमोर किंवा घराच्या मागील भागात दुर्वांचे उद्यान असावे, ज्यांमध्ये विविध सुगंधित व रंगीबेरंगी फुलांनी युक्त अशा लतावेली असाव्यात. तसेच वायू प्रदूषण टाळण्यासाठी विविध सुगंधित द्रव्यांनी वेळोवेळी वैज्ञानिक पद्धतीने यज्ञ करावेत. त्यामुळे सारा परिसर सुगंधित होऊन सर्वांना उत्तम आरोग्य लाभेल. अशा प्रकारे प्राचीन वैदिक वाङ्मयात पर्यावरणाच्या रक्षणाचा सर्वव्यापक, उच्च व उदात्तभाव सद्यव्यवस्थेत जगातील प्रत्येक मानवाने आत्मसात केल्यास निश्चितच पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन होण्यास मदत मिळेल.
प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य