मछली बिन जल...

    03-Jun-2024   
Total Views |
The Oceans Be Empty of Fish by 2048


२०४८ पर्यंत समुद्रातील सर्वच्या सर्वच मासे संपुष्टात येतील, असा अंदाज काही अहवालांमधून नुकताच मांडण्यात असला, तरी असं काही खरंच घडलं तर काय होईल? ही विधानं ऐकून मासे खवय्यांच्या तर अगदी कंठाशी प्राण आले असतील. पण, हो हे अगदीच होऊ शकतं असं काही संशोधनांमधून सध्या समोर आले आहे.त्यानिमित्ताने अनावश्यकरित्या आणि अतिप्रमाणातील मासेमारी आणि त्याच्या परिणामांवर आज आपण चर्चा करणार आहोत.
 
अतिमासेमारी म्हणजेच ‘ओव्हरफिशींग’ याचाच अर्थ एकाचवेळी गरजेपेक्षा जास्त प्रमाणातील मासेमारीमुळे माशांच्या संख्येवर नियंत्रण राहात नाही. छोट्या माशांसहित प्रजनन क्रियेत असणारे मासेही मच्छीमारांच्या जाळ्यात अडकतात आणि यामुळेच माशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. याचे अनेक गंभीर परिणाम सागरी परिसंस्थेबरोबरच जैवविविधतेतील अनेक घटकांवर होताना दिसतात. ते कसे, ते आपण पुढे पाहूच. पण, त्याआधी अतिमासेमारी जगभरातील कोणत्या देशांमध्ये सर्वाधिक होते त्याचा आढावा घेऊ. ‘प्यू’ या संशोधन संस्थेच्या संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जपान, चीन, अमेरिका, इंडोनेशिया, तैवान आणि दक्षिण कोरिया हे सहा देश प्रशांत महासागरामध्ये सर्वाधिक मासेमारी करणारे देश. त्यांना ‘द पॅसिफीक सिक्स’ असे संबोधलं जाते, तर यामध्ये ‘बिग आय ट्यूना’ या प्रजातीच्या माशांची सर्वाधिक म्हणजे 1 लाख 11 हजार 482 मेट्रिक टन्स इतक्या मोठ्या संख्येने मासेमारी झाली. याचाच अर्थ, 2011 मध्ये या सहा देशांनी जवळजवळ 80 टक्के इतकी अतिमासेमारी केली.


‘स्टॅटिस्टा’ या आणखी एका संकेतस्थळावरून जगभरात चीनमध्ये सर्वाधिक मासेमारीचा उल्लेख आढळतो. त्या खालोखाल इंडोनेशिया, पेरू, रशिया यांचा क्रमांक लागतो, तर या यादीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे. यामागच्या कारणांचा विचार केला, तर अनेक मुद्दे लक्षात येतात. यातील सर्वांत प्रमुख कारण म्हणजे, माशांची बाजारपेठेत वाढलेली मागणी. मासे खाल्ल्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो, मेंदू आणि हृदयासाठी माशांचे सेवन आरोग्यदायी मानले जाते. हे खरे असले तरी माशांच्या निवडीवरही ग्राहकांनी लक्ष द्यायला हवे. छोट्या माशांचा अन्नामध्ये समावेश करणं धोक्याचं नसलं तरी माशांच्या दृष्टीने ते धोक्याचं आहे. कारण, वयाने आणि आकाराने लहान असलेल्या माशांनी त्यांच्या आयुर्मानामध्ये एकदाही प्रजनन केलेले नसते. प्रजनन न झाल्यामुळे अनेक मासे जन्मच घेऊ शकत नाही. त्यामुळेच माशांच्या संख्येवर याचा मोठा परिणाम होतो. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, माशांचा खाण्याव्यतिरिक्त औषधांमध्येही वापर केला जातो. यासाठी मोठ्या प्रमाणावर मासेमारी केल्यामुळे पुन्हा माशांच्या संख्येवर परिणाम होतो.


जागतिक स्तरावरच मासेमारी हा एक मोठा व्यवसाय असून, दरवर्षी 240 अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल त्यात होते. विकसनशील देशांमध्ये 20 कोटी कुटुंबांचा उदरनिर्वाह व अन्नसुरक्षा मासेमारीशी निगडित असून, जगभरात 300 कोटी लोक प्रथिनांसाठी माशांवर अवलंबून आहेत. मासे हे सर्वाधिक प्रमाणात खाल्ले जाणारे मांसाहारी अन्न. भारताच्या 8,129 किमी किनारपट्टीवरील तीन हजार गावांमध्ये एकूण साडेतीन दशलक्ष मच्छीमार आहेत. मात्र, 2048 पर्यंत महासागरातील मासे संपुष्टात येतील, असे ‘जागतिक स्टॅटिस्टिकल’ वेबपोर्टल म्हणते. समुद्रातील वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि अतिमासेमारी हे मत्स्यउत्पादन कमी होण्यास कारणीभूत ठरणारे घटक आहेत.


अतिमासेमारी करताना अनेकदा संकटग्रस्त असलेल्या प्रजाती, धोक्याच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रजाती ही जाळ्यात अडकल्या जातात. या संकटग्रस्त प्रजातींना पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडण्याचे ज्ञान आणि जनजागृती प्रत्येकालाच आहे, असं नाही. त्यामुळे याही प्रजातींना धोका निर्माण होऊन त्याचा परिणाम संपूर्ण सागरी परिसंस्थेवर पडताना दिसतो. शासनाने अनेक देशांमध्ये मासेमारी करताना पाळायचे काही नियम ठरविले आहेत. या नियमांमध्ये ‘स्टॅण्डर्ड साईज’ ही ठरवून दिलेली असते. पण, या नियमांबद्दल मच्छीमारांमध्ये जनजागृतीचा अभाव आढळून येतो, तर काही भागांमध्ये याबद्दल माहिती असूनही त्याबाबत कानाडोळा केला जातो. असे न करता यासंदर्भातील नियम, कायदे आणि शिक्षेची तरतूद अधिक कडक केल्यास माशांचे संवर्धन करणे अधिक सोपे होईल. यामुळेच शाश्वत मासेमारीचा पर्याय स्वीकारत सागरी परिसंस्थेबरोबरच माशांचे संवर्धन करणे गरजेचे.


 
 

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.