पर्यटन की दहशतपेरणी?

    11-Jun-2024   
Total Views | 47
Umarkot and Nagarparkar
 
भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या भुकेकंगाल होण्याच्या अवस्थेत जाऊन पोहोचली आहे. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी पाकिस्तानला कधी चीनपुढे, तर कधी ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ (आयएमएफ) पुढे गुडघे टेकावे लागतात. या स्थितीतून निघण्यासाठी काही पाकिस्तानी नेत्यांच्या नापीक डोक्यातून सुपीक योजनाही पुढे येत आहेत. अशीच एक योजना सिंध प्रांताचे पर्यटनमंत्री झुल्फिकार अली शाह यांच्या डोक्यात आली.
 
2019 मध्ये भारतातील शीख धर्मीयांना कर्तारपूर येथील दरबार साहेब गुरूद्वाराला भेट देण्यासाठी दोन्ही देशांनी कर्तारपूर कॉरिडोर सुरू करण्याची घोषणा केली होती. भारतीय सीमेपासून अवघ्या चार-साडेचार किमी अंतरावर असलेल्या कर्तारपूरमध्ये शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव यांचे देहावसान झाले होते. त्यांनी आपल्या आयुष्याची शेवटची 18 वर्षे कर्तारपूरमध्ये व्यतीत केली होती. पाकिस्तानसाठी हा कर्तारपूर कॉरिडोर हा फक्त धार्मिक पर्यटनाला चालना देण्याचा विषय नव्हता. या कॉरिडोरद्वारे पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इमरान खान यांना स्वतःची आणि पाकिस्तानची धार्मिक सहिष्णू असल्याची ब्रॅण्डिंग करायची होती. इमरान खान त्यावेळी या दोन्ही गोष्टींत यशस्वी झाले. आता तशाच प्रकारे भारतातील हिंदू आणि जैन धर्मीयांना पाकिस्तानमध्ये धार्मिक पर्यटनासाठी आकर्षित करण्याची योजना पाकिस्तान आखताना दिसत आहे.पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे पर्यटनमंत्री झुल्फिकार अली शाह यांनी प्रस्ताव दिला आहे की, पाकिस्तानमधील उमरकोट आणि नगरपारकर हे दोन कॉरिडोर सुरू केले जाऊ शकतात.

यामुळे मोठ्या संख्येने भारतातील हिंदू आणि जैन भाविक पाकिस्तानात धार्मिक पर्यटनासाठी येतील. पाकिस्तानच्या उमरकोटमध्ये शिवमंदिर आहे. हे मंदिर दोन हजार वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. हे मंदिर आजघडीला सिंधमधील ज्ञात सर्वात प्राचीन हिंदू मंदिर आहे, तर नगरपारकरमध्ये अनेक जैन मंदिरे आहेत. धार्मिक पर्यटकांच्या सोयीसाठी शाह यांनी भारताकडे सख्खर किंवा लरकाना येथे साप्ताहिक उड्डाणे सुरू करण्याचा प्रस्तावही ठेवला. एकूणच काय, तर पाकिस्तानच्या सिंध प्रांताची भारतीयांना धार्मिक पर्यटनास आकर्षित करण्यासाठी जोरदार तयारी केली. यामध्ये गैर काहीही नाही. पाकिस्तानमध्ये हिंदू, जैन धर्मीयांची पवित्र आणि प्राचीन मंदिरे आहेत. यामध्ये परमहंसजी महाराज समाधी (खैबर-पख्तुनख्वा), बलुचिस्तानच्या लासबेला जिल्ह्यातील हिंगोल राष्ट्रीय उद्यानातील हिंगलाज माता मंदिर यांच्यासारखी पवित्र धार्मिक स्थळे पाकिस्तानमध्ये आहेत. त्यामुळे हिंदूंनी पाकिस्तानमध्ये जाऊन आपल्या धार्मिक स्थळांना भेट देण्यात काहीही गैर नाही. पण, महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, पाकिस्तानला आताच या मंदिरांची आठवण आली?

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समुदायाची किती दुरवस्था आहे, हे सांगण्यासाठी कोणत्याही पाश्चिमात्य संस्थेच्या अहवालाची गरज नाही. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांवर कधी ईशनिंदेच्या आरोपाखाली, तर कधी दुसर्‍या कारणाने सतत अत्याचार होत असतात. ज्या उमरकोटमध्ये कोरिडॉर सुरू करण्याची गोष्ट पाकिस्तान करत आहे, तो जिल्हा पाकिस्तानमधील एकमेव हिंदू बहुसंख्य जिल्हा आहे. उमरकोटमध्ये 52 टक्के हिंदू राहतात. पण, उमरकोटमधील एकही लोकप्रतिनिधी हा हिंदू धर्माचा नाही. या जिल्ह्यातील सरकारी नोकर्‍यांपासूनही हिंदूंना दूर ठेवले जाते. ज्या कर्तारपूर कॉरिडोरला सुरू करून पाकिस्तानने आपली धार्मिक सहिष्णुता दाखवण्याचा प्रयत्न केला, तेथे पाकिस्तान दरबार साहेब गुरूद्वारा दर्शनासाठी येणार्‍यांकडून 20 डॉलर शुल्क घेते. गोष्ट फक्त पैशांचीच नाही, कर्तारपूर कॉरिडोरच्या जवळच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र असल्याची माहिती तपासयंत्रणांना मिळालेली आहे. कर्तारपूर कॉरिडोरच्या आडून पाकिस्तान भारतात अशांतता पसरवण्याचे काम करू शकतो, अशी शंका याआधी वर्तवण्यात आली आहे. शोकांतिका म्हणजे, पाकिस्तान आपल्या देशात हिंदू आणि जैन धर्मीयांना धार्मिक पर्यटनासाठी एकीकडे पायघड्या टाकत असताना, जम्मू-काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी हिंदू भाविकांच्या बसला लक्ष्य करत दहा निष्पाप लोकांचा बळी घेतला. त्यामुळे पाकच्या भूलथापांना बळी न पडता, आपण त्यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत. तेव्हाच खर्‍या अर्थाने आपले धर्मकार्य पूर्ण होईल!



श्रेयश खरात

वाणिज्य शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC), अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यासक. इतिहास, अर्थकारण, राजकारण आणि क्रिकेट इत्यादी विषयांची आवड.
अग्रलेख
जरुर वाचा
पराभूत सैन्याचे

पराभूत सैन्याचे 'फिल्डमार्शल'; आधी हकालपट्टीची चर्चा, आता लष्कराच्या सर्वोच्च पदावर बढती

ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करत पाकिस्तानला योग्य धडा शिकवला. या दरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची पाक सरकारने हकालपट्टी केल्याची चर्चा रंगली. त्यांच्याजागी जनरल शमशाद मिर्झा यांची नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा रंगली. असीम मुनीर यांच्यावर वैयक्तिक अजेंडा राबवल्याचा आरोप असल्याने असे करण्यात आल्याची माहिती होती. मात्र आता पाक सरकारने त्यांची फिल्डमार्शल पदावर बढती देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात ..

सैफुल्लाहनंतर पाकिस्तानात आणखी एका दहशतवाद्यावर अज्ञातांकडून हल्ला!

सैफुल्लाहनंतर पाकिस्तानात आणखी एका दहशतवाद्यावर अज्ञातांकडून हल्ला!

(Lashkar-e-Taiba co-founder Amir Hamza) दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा सह-संस्थापक दहशतवादी आमिर हमजावर लाहोरमध्ये अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यात हमजा गंभीर जखमी झाला आहे. यानंतर त्याला उपचारांसाठी पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' राबवून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अशातच आता अज्ञातांच्या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आमिर हमजा जखमी झाल्याची बातमी समोर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121