डोंबिवलीत देखील निटच्या विद्यार्थ्यांना निकालाचा फटका, यंत्रणेच्या बोगस कारभारावर व्यक्त केली नाराजी

    11-Jun-2024
Total Views |
 
नीट निकाल
 
डोंबिवली :  नीट परिक्षेच्या निकालानंतरच्या प्रक्रियेला तूर्तास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. वैद्यकीय प्रवेशपूर्व परिक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. वैद्यकीय प्रवेशपूर्व परिक्षा अर्थात नीट परिक्षेचा निकाल हा वादग्रस्त ठरला आहे. या निकालाविरोधात देशभरातील जवळपास वीस हजार विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. या निकालाबाबत विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आता आम्ही नेमके करायचे काय असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही निकालानंतरच्या प्रक्रियेला तूर्तास स्थगिती देण्याच्या प्रक्रियेला नकार दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
 
विद्यार्थी धनश्री भुरके- मला नीटच्या परिक्षेत 623 मार्क्‍स आले आहेत. मागच्या वर्षीच्या परिक्षेप्रमाणे हा स्कोअर आणि रॅकिंग 16 हजारपर्यत यायला हवा होता. पण यंदाच्या वर्षीची परिस्थिती पाहता माझा रॅक दूरवर फेकला गेला आहे. या मार्क्‍सवर महाराष्ट्रातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळणे पक्के होते. पण आता झालेल्या गोंधळामुळे ते शक्य नाही. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्याचे स्वप्न आमच्यासह आमच्या पालकांचे ही भंगले आहे. आम्ही तीन वर्ष प्रचंड मेहनत घेतली आहे. मेहनत घेऊन ही आम्हाला शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. खाजगी महाविद्यालयात जाण्यासाठी आमच्या पालकांनी कोटयावधी रुपये आणण्याचे कोठून असा सवाल ही विद्यार्थ्यांनी यावेळी केला.
 
विद्यार्थी क्रिश गाला म्हणाला, मला 641 मार्क्‍स मिळाले आहेत. एका वर्षात रकींग खूप वाढली आहे. विद्यार्थ्यांचे मार्क्‍स खूप वाढले आहेत. पेपर फुटले आहेत असा आरोप होत आहेत. मला ते खरचं आहे असे वाटते. यावर न्यायालयाने एखादी समिती नेमून योग्य ती चौकशी करून विद्यार्थ्याना दिलासा द्यावा असे त्यांनी सांगितले. शिक्षक गणेश देसाई म्हणाले, नीट परिक्षा 2016 पासून होत आहे. पण नीट परिक्षेच्या आयोजनात 2024 मध्ये मोठय़ा प्रमाणात गोंधळ झाला आहे.
 
600 च्या पुढे 80 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहेत. नीट परिक्षेची 2023-24 ची काठिण्य पातळी सारखीच असताना यंदा आयोजनाच्या बाबत तक्रार येत आहे. सध्या विद्यार्थी चिंतेत आहेत. मेडिकल नीट परिक्षेचे योग्य पध्दतीने आयोजन करावे अन्यथा ढिसाळ कारभारचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसू शकतो . न्यायालयाच्या निर्णयानंतर हा विषय असून चिघळू शकतो, असे त्यांनी सांगितले. दरम्यान न्यायालयाचा निकाल आल्यानंतर विद्यार्थ्यांची अधिकच चिंता वाढली.‌ आता आमच्या भविष्याचे काय होणार असा प्रश्न त्यांच्या पुढे उभा आहे.