मुंबई : राज्यभरात सध्या उबाठा गटाचे जेष्ठ नेते भास्कर जाधव हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, यावरून राजकारण तापले असताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक खोचक सवाल करत उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांना डिवचले आहे.
२०१९ मध्ये मला मंत्रिपद मिळायला हवे होते, पण ते मिळाले नाही, अशी खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली होती. तसेच आठ आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावा, असे वाटते, असे म्हणत त्यांनी राजकीय निवृत्तीचे संकेतही दिले. त्यामुळे भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यावरून आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
संदीप देशपांडे म्हणाले की, "महाराष्ट्राच्या मनातलं ओळखणाऱ्यांनी भास्कर जाधव यांच्या मनातलं ओळखलं का? जे लोक महाराष्ट्राच्या मनातले ओळखतात त्यांनी भास्कर जाधव यांच्या मनात काय आहे ते ओळखले का?" असा सवाल त्यांनी केला.
...तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार!
ते पुढे म्हणाले की, "पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांवर तीन भाषांची सक्ती करण्यात येऊ नये, असे राज्यातील सर्व भाषातज्ञ किंवा शिक्षणतज्ञांनी वारंवार सांगितले आहे. त्यांच्यावर आधीच अभ्यासाचा बोजा असून आपण अजून तो बोजा किती वाढवणार आहोत? त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सरकारने प्रामाणिकपणे विचार करावा. संपूर्ण देशात कुठेही तीन भाषांची सक्ती नाही. मग महाराष्ट्रातच ही सक्ती का? जोपर्यंत हिंदी भाषेची सक्ती मागे घेत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहणार आहे," असेही संदीप देशपांडे यांनी सांगितले.