अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त रंगणार नाट्य आणि संगीत महोत्सव

    23-Jun-2025   
Total Views |

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त भव्य नाट्य-संगीत सादरीकरणाचे आयोजन दि. २६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता रविंद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे करण्यात आले आहे."

सरफोजीराजे भोसले भरतनाट्य ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटरच्या वतीने हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना, दिग्दर्शन आणि क्युरेशनची जबाबदारी डॉ. संध्या पुरेचा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात अहिल्यादेवींच्या जीवनातील विविध टप्प्यांचे नाट्य-नृत्य-संगीत रूपांतर सादर करण्यात येणार असून, त्यात संहितालेखन विवेक आपटे व सुभाष सैगल, संगीत अजीत परब, नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे आणि निवेदन हरीश भिमानी यांचे आहे.

या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा सांस्कृतिक माध्यमातून गौरव करणे आणि नव्या पिढीसमोर त्यांचे आदर्श नेतृत्व, सामाजिक न्याय, प्रशासन, मंदिर-समाज विकास व स्त्री सक्षमीकरण यांचे मोल समोर आणणे हा आहे. कार्यक्रमात ऐतिहासिक संदर्भांसह नाट्य, संगीत, नृत्य यांचा सुरेख समन्वय असणार आहे. विविध सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, अभ्यासक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.



सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.