भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्विकारले तर...; कुणी दिली ऑफर?

    24-Jun-2025
Total Views |


मुंबई :
गेल्या दोन दिवसांपासून उबाठा गटातील जेष्ठ नेते भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान, आता भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्विकारले तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल, असे विधान मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, "भास्कर जाधव नाराज आहेत की, नाही ते मला माहिती नाही. परंतू, त्यांचे काही वक्तव्य मी ऐकले. त्यांनी माझ्यावरसुद्धा टीका केली आहे. त्यांच्या निवृत्तीचीही चर्चा सुरु झाली आहे. टीकाटिपण्णी करणे हा लोकशाहीतील एक भाग आहे. परंतू, भास्कर जाधव हे कोकणातील एक अनुभवी नेते आहेत. त्यांनी अनेक निवडणूका लढवून त्यात ते जिंकले आहेत. त्यामुळे अशा नेत्याने राजकीय निवृत्ती घेणे योग्य नाही, ही माझी भावना आहे," असे ते म्हणाले.

मातोश्रीवरचा राग माझ्यावर!

ते पुढे म्हणाले की, "माझ्यावर टीका करताना त्यांनी त्यांचा मातोश्रीवरचा राग माझ्यावर काढला. ते मातोश्रीवर प्रंचड नाराज आहेत. माझ्यासारख्या जवळच्या मित्रावर त्यांनी ती नाराजी व्यक्त केली. भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्विकारले तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल," असे म्हणत मंत्री उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांना ऑफरच दिल्याचे बोलले जात आहे.