हवामान क्षेत्राची आवड म्हणून अभ्यास करत जनसेवा म्हणून हवामानाचे अंदाज २४ तास वर्तवणार्या ऋषिकेश आग्रे यांच्याविषयी...
भारत आणि मान्सून यांचे नाते हे केवळ हवामानापुरते मर्यादित नाही, तर ते आपल्या संस्कृतीचे, शेतीचे आणि अर्थव्यवस्थेचे हृदय आहे. मान्सून वेळेवर आला, तर शेती बहरते आणि जनतेच्या चेहर्यावर हास्य उमटते. पण, जर त्यात काही चुकले तर दुष्काळ, महागाई आणि निराशा दारात उभी ठाकते. त्यामुळे पावसाच्या थेंबांचा वेध घेणे हे एक कौशल्यच ठरते आणि हेच कौशल्य एका तरुणाने आपल्या अभ्यासातून सिद्ध केले आहे. तर ही गोष्ट आहे मूळचा लातूरकर; पण सध्या वास्तव्यास पुण्यात असलेल्या ऋषिकेश आग्रे यांची. ऋषिकेश यांचा जन्म लातूरचा. त्यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षणही लातूरमध्येच पूर्ण झाले. आईवडील आणि एक लहान भाऊ असे ऋषिकेश यांचे चौकोनी कुटुंब. ऋषिकेश यांची आई गृहिणी आहे.
इयत्ता दहावीमध्ये ऋषिकेश यांना ९५ टक्के गुण मिळाले. त्यावेळी लातूर पॅर्टन महाराष्ट्रभर गाजत होता. ज्यावेळी ऋषिकेश दहावी झाले, तेव्हा लातूरमध्ये ९० टक्क्यांच्यावर गुण मिळाल्यास अभियांत्रिकीसाठीच प्रवेश घेण्याचा एक ट्रेंड होता. मात्र, त्याकाळी ऋषिकेश यांनी थोडा वेगळा मार्ग चोखंदळताना वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेतला. पुढे वडिलांच्या बदलीमुळे त्यांना बारावीच्या महत्त्वाच्या वर्षी पुणे येथे स्थलांतरित व्हावे लागले. ऋषिकेश यांची बारावीची परीक्षा झाली, त्याचवर्षी देशामध्ये लॉकडाऊन सुरू झाला होता. मात्र, दहावीच्या आधीपासूनच विधी शाखेचे शिक्षण घेण्याचे ऋषिकेश यांनी निश्चित केले होते. ठरवल्यानुसार, बारावीच्या निकालानंतर विधी शाखेच्या प्रवेश परीक्षेसाठीची पूर्वतयारी ऋषिकेश यांनी सुरू केली. त्याकाळात फावल्यावेळात मरगळ दूर करण्यासाठी ऋषिकेश यांनी हवामानाचा सखोल अभ्यास केला.
हवामान आणि ऋषिकेश यांचे नाते जुळण्यास कारण ठरला परदेशातील एक भारत आणि पाकिस्तान सामना. भारत-पाकिस्तानच्या त्या आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये ९० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज तेथील वेधशाळेने वर्तवला होता. मात्र, त्यादिवशी पाऊस न पडता पूर्णवेळ ऊन सामन्यात होते. या घटनेमुळे त्यादिवशी नेमके काय बदल झाले? याबाबत ऋषिकेश यांची उत्सुकता वाढीस लागली. त्यामुळे त्यांनी संबंधित देशातील सर्व हवामानाची माहिती देणारी संकेतस्थळे तपासून सत्य जाणून घेतले. त्यानंतर ऋषिकेश यांनी पहिल्यांदाच त्या स्पर्धेदरम्यान हवामान अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली. ती स्पर्धा संपेपर्यंत भारतामध्ये मान्सून आला होता. त्यामुळे लगेचच ऋषिकेश यांनी भारतातील पावसाचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली. सुरुवातील असणारे यश अत्यल्पच होते. मात्र, ऋषिकेश यांनी जिद्द न सोडता सातत्याने कौशल्य विकासावर भर दिला. हे हवामानाचे अंदाज वर्तवण्यासाठी त्यांनी त्यांच्या समाजमाध्यमांचा वापर करण्याचे ठरवले. सुरुवातीच्या काळात ऋषिकेश यांनी फक्त पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड भागातील पावसाचा अंदाज वर्तवला. दरम्यानच्या काळात विधी शाखेच्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि ऋषिकेश यांना चर्चगेट येथील शासकीय विधी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला. आजपर्यंत मुंबई फक्त वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाणीवरच पाहिल्याने ऋषिकेश यांना मुंबई अनुभवण्याची उत्सुकता होतीच. पुढे मुंबईतील वास्तव्यादरम्यानच त्यांना मुंबईचा इतिहास आणि भूगोलही समजला.
२०२१ सालापासून त्यांनी मुंबईतील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला फक्त ‘इन्स्टाग्राम’ या समाजमाध्यमावरचा ऋषिकेश यांचा प्रवास आता तत्कालीन ‘ट्विटर’पर्यंत पोहोचला. ऋषिकेश यांनी ‘ट्विटर’वर ‘मुंबई रेन्स’ नावाने पावसाचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या या खात्याला १८ जणांनी फॉलो केले होते, आज त्याची संख्या ९२ हजारांच्या घरात आहे. २०२२-२०२३ असे दोन दोन पावसाळे ऋषिकेश यांनी मुंबईत अंदाज वर्तवले. याकाळात त्यांनी स्वतःच्या ज्ञानातदेखील अमूल्य भर घातली.
मात्र, या दोन वर्षांपर्यंत ऋषिकेश हे फक्त पावसाचा अंदाज सांगत असत. मात्र, त्यानंतर त्यांनी हळूहळू उष्णतेची लाट आणि थंडीची लाटही सांगण्यास सुरुवात केली. २०२३ साली त्यांनी २०२४ सालच्या जानेवारीमध्ये थंडी वाढेल, असा अंदाज वर्तवला. यामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली. मात्र, ऋषिकेश यांचा अंदाज खरा निघाला. मात्र, या घटनेमधून असे अंदाज वर्तवण्यासाठी काही प्रमाणपत्राची आवश्यकता असते, हे ऋषिकेश यांना समजले. त्यामुळे त्यांनी ‘हॅवर्ड विद्यापीठा’चा हवामानासंदर्भातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमही पूर्ण केला. त्यानंतर आजपर्यंत ऋषिकेश सातत्याने हवामानाचा अंदाज वर्तवतात. त्यांच्या अंदाजामध्ये ९५ टक्क्यांपेक्षा अधिक अचूकता असून त्यांच्या अंदाजाचा मुंबईकरांना मोठाच लाभ मिळतो आहे.
सातत्याने नवनवीन गोष्टी शिकत कौशल्य विकास करण्याचा स्वभाव ऋषिकेश यांच्या यशाचा कारक आहे. सध्या ऋषिकेश यांनी दिवसातले २४ तास हवामानाच अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या विश्लेषणासाठी ते भारतीय हवामान विभागाने सार्वजनिक केलेल्या माहितीचाच वापर करतात. सुरुवातीला ऋषिकेश यांचे परदेशातील माहितीवर अवलंबित्व अधिक असे. मात्र, "भारतीय हवामान खात्याची माहिती परिपूर्ण असल्याने आता त्याची गरज भासत नाही,” असे ऋषिकेश म्हणतात. हवामानाचा अंदाज ही ऋषिकेश यांची आवड असून ते आवड म्हणूनच त्याला जोपासत आहेत. या क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा त्यांचा सध्यातरी मानस नाही. फक्त सामान्यांच्या मदतीसाठी ऋषिकेश समाजमाध्यमांवर अंदाज वर्तवणे सुरू ठेवणार आहेत. मात्र, देशाला फारच आवश्यकता असेल, तेव्हा मात्र कधीही सेवेसाठी तत्पर असल्याचेही त्यांनी सांगितले. फक्त आवड म्हणून एका नवीन क्षेत्राचे ज्ञान घेत, त्यात पूर्ण कौशल्य आत्मसात करून जनसेवा करणार्या ऋषिकेश यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!