राज्यात ई-कॅबिनेटचा शुभारंभ! कागद विरहित प्रणालीद्वारे राज्य कारभार सुलभ होणार

    24-Jun-2025
Total Views |


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, २४ जून रोजी ई-कॅबिनेटचा शुभारंभ करण्यात आला. 'ई-मंत्रिमंडळ : कागद विरहित भविष्यासाठी एक पाऊल' या उपक्रमांतर्गत मंत्रालयात पहिलीच ई-मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत मंत्र्यांना आयपॅडचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. दि. २ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ई-कॅबिनेट प्रणाली राज्यात लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. यामुळे प्रशासकीय कामकाज अधिक वेगवान, कागदविरहित आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित होणार आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत आणि डिजिटल इंडिया अभियानाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने प्रशासन अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी ‘ई-मंत्रिमंडळ’ उपक्रमाची सुरूवात केली आहे. या उपक्रमामुळे शासन आणि नागरिक यांच्यातील दुरावा कमी होऊन डिजिटल माध्यमातून सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवता येणार आहे. ‘ई-मंत्रिमंडळ’ प्रणालीद्वारे मंत्रिमंडळ बैठकीचे नियोजन, संदर्भ शोध, निर्णयांची अंमलबजावणी आणि परीक्षण एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुलभतेने करता येईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.