उबाठा गटाला पुण्यात धक्का! बडा नेता अजितदादांच्या गळाला; लवकरच पक्षप्रवेश होणार
24-Jun-2025
Total Views | 41
पुणे : उबाठा गटातील पुण्यातील नेते महादेव बाबर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. मंगळवार, २४ जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबद्दल एका वृत्तवाहिनीशी बोलताना महादेव बाबर म्हणाले की, "उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा महाराष्ट्रातील झंझावात असून पुणे जिल्ह्यातील विकासावर त्यांचे लक्ष आहे. माझ्या मतदारसंघात विकास व्हावा हा हेतून डोळ्यासमोर ठेवून मी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. माझ्यासोबत निलेश मगर, योगेश ससाणे हेसुद्धा प्रवेश करणार आहेत. शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यावर मी नाराज नाही. पुणे जिल्ह्याच्या विकास व्हावा, या उद्देशाने मी अजितदादांच्या पक्षात जात आहे," असे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूकीनंतर उबाठा गटाला चांगलीच गळती लागली आहे. रोजच कुठला तरी नेता त्यांना सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या तोंडावर उबाठा गटाला अनेक धक्के बसत असून त्यातच आता महादेव बाबर यांच्या जाण्याने पुण्यात पक्षाला खिंडार पडले आहे.