गोंदिया: भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेच्या (भटके विमुक्त विकास परिषदेशी संलग्न संस्था) पुढाकाराने आणि महसूल विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत आज तिरोडा तहसील कार्यालयात मांग-गारुडी समाजासाठी विशेष जात प्रमाणपत्र शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकाच दिवशी ६२१ जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले, ही महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या असल्याचे सांगण्यात येते.या कार्यक्रमात गोंदिया जिल्हाधिकारी मा. प्रजित नायर, डॄज मा. पूजा गायकवाड, तहसीलदार मा. ठाकरे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. समाजाचे ६०० ते ७०० बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाचे ज्येष्ठ नेते नथुभाऊ बिसने यांच्या हस्ते जिल्हाधिकार्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.
या शिबिरात ६२१ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असून, आणखी १५० अर्जांवर कार्यवाही सुरू आहे. विशेष म्हणजे, कार्यक्रमानंतर जिल्हाधिकार्यांनी भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेच्या जिल्हा व तालुका कार्यकर्त्यांसोबत वैयक्तिक बैठक घेऊन संवाद साधला, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.सोनझरी समाजाच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात अडचणी समजल्यावर, जिल्हाधिकार्यांनी तात्काळ त्या समाजाच्या प्रतिनिधींना बोलावून चर्चा केली. पुढील आठवड्यात डॄज व तहसीलदारांना सोनझरी समाजाच्या वस्तीत जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले.मांग-गारुडी व सोनझरी समाजाने भटके भटके विमुक्त कल्याणकारी परिषद व शासनाचे आभार मानले.
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.