देशात इंडी आघाडीचीच सत्ता येणार – काँग्रेसचा दावा

    15-May-2024
Total Views |
Mallikarjun Kharge On Indi Aghadi

नवी दिल्ली:
लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यानंतर इंडी आघाडीची स्थिती अतिशय भक्कम असून ४ जून नंतर देशात इंडी आघाडीचीच सत्ता य़ेईल, असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी व्यक्त केला आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत लखनौमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी खर्गे म्हणाले, आतापर्यंत चार टप्प्यात निवडणुका झाल्या आहेत. त्यामध्ये इंडी आघाडी खूप पुढे आहे.
 
जनतेने यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना निरोप देण्याचे ठरवले आहे. ही निवडणूक विचारधारेची लढाई आहे. एका बाजूला ते लोक आहेत जे धर्माचा वापर करून काही श्रीमंतांसाठी लढत आहेत आणि दुसऱ्या बाजूला ते लोक आहेत जे देशातील गरीब आणि तरुणांसाठी लढत आहेत. हा लढा आरक्षण आणि संविधान वाचवण्याचा लढा असल्याचे ते म्हणाले.
 
उत्तर प्रदेशात इंडी आघाडी ८० पैकी ७९ जागांवर विजय मिळवेल, असा दावा सपाप्रमुख अखिलेश यादव यांनी केला. ते पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर श्रद्धा असलेल्या आणि त्यांनी बनवलेली राज्यघटना वाचवण्याची इच्छा असलेल्या बहुजन समाजातील लोकांनी आपली मते वाया घालवू नयेत. त्यांनी बसपाला मत देण्याऐवजी इंडी आघाडीला मदत करावी, जेणेकरून लोकशाही मजबूत होईल; असेही यादव म्हणाले.