नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी स्वित्झर्लंडमधील बर्न येथे स्विस उद्योग नेत्यांशी व्यापक चर्चा केली. भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटना (इएफटीए) यांच्यात अलीकडेच स्वाक्षरी झालेल्या व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (टीइपीए) अंतर्गत आर्थिक सहकार्य अधिक दृढ करणे तसेच नव्या संधीचा शोध घेणे आहे, हा चर्चेचा उद्देश होता.
भारतीय आणि स्विस उद्योगांमधील समन्वय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करून, नवोन्मेष, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि शाश्वत उत्पादन यावर विशेष भर देऊन, विविध क्षेत्रातील अनेक प्रमुख स्विस कंपन्यांच्या प्रमुखांची गोयल यांनी भेट घेतली. स्विस कंपन्यांचा भारतातील प्रभाव वाढवण्यासाठी आणि देशाच्या गतिमान आणि वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेचा लाभ घेण्यासाठी गोयल यांनी त्यांना आमंत्रित केले. भारताच्या पारदर्शक नियामक प्रक्रिया, मजबूत बौद्धिक संपदा प्रणाली आणि गुंतवणूक अनुकूल धोरणात्मक चौकटीद्वारे व्यवसायस्नेही वातावरण निर्माण करण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचा गोयल यांनी पुनरुच्चार केला. त्यांनी स्विस उद्योगांना भारताकडे केवळ एक बाजारपेठ म्हणून नव्हे, तर निर्मिती, कौशल्य आणि नवोन्मेषासाठी एक धोरणात्मक केंद्र म्हणून पाहण्याचे आवाहन केले.
उद्योग संवादांव्यतिरिक्त, मंत्री गोयल यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) च्या स्वित्झर्लंड चॅप्टरच्या सदस्यांशीही भेट घेतली. जैवतंत्रज्ञान, अचूक उत्पादन, आरोग्यसेवा, ऑटोमेशन, संरक्षण, सायबरसुरक्षा आणि प्रगत साहित्य यासह विविध क्षेत्रातील स्विस उद्योग नेत्यांनी जागतिक आर्थिक शक्ती आणि नवोन्मेष विकास वाढीच्या गतीबद्दल तसेच भारताने स्वीकारलेल्या मार्गावर दृढ विश्वास व्यक्त केला.