तोतया पोलीस अधिकाऱ्याने घातला ३०० जणांना गंडा! बनावट पोलीस चौकी उभारुन उकळले ५० लाख
10-Jun-2025
Total Views |
पाटणा : बिहारच्या पूर्णिया जिल्हातील एका तोतयाने स्वतः पोलीस अधिकारी असल्याचे सांगून गावातील नागरीकांना होमगार्ड आणि ग्रामरक्षा दलात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
कसबा पोलीस ठाणे हद्दीतील बटौना गावात राहुल कुमार साहने छावणी उभारली होती. इथेच तोतया पोलीस अधिकारी बनून लोकांना लुबाडायचा. तोतया एनसीसी कॅडर असल्याचे सांगत राहुलने लोकांना विश्वासात घेण्यासाठी विविध प्रकारे दिशाभूल केली. राहुलने एका सरकारी शाळेत 'बिहार राज्य दलपती आणि ग्रामरक्षा दल महासंघ'चे बनावट कार्यालय उघडले. या कार्यालयात तो १० ते १५,००० रुपये घेऊन नोकरी देण्याचे आश्वासन देत असे. याच कार्यालयात तो बनावट नियुक्ती पत्रे वाटत असे, त्यांची ओळखपत्रे तयार करुन मेळ्यांमध्ये तसेच अन्य ठिकाणी ड्युटी करायला लावली. यामुळेच राहुलवर पीडितांचा विश्वास बसला. त्याने उभारलेल्या बनावट छावणीचे उद्घाटन हे त्याने मोहिनी पंचायतीच्या प्रमुखांना करायला लावले होते.
जवळपास दोन महिने काम करूनही लोकांना जेव्हा पगार मिळाला नाही, तेव्हा त्यांना राहूलचा संशय आला आणि पोलीस तपासात सर्व सत्य बाहेर आल्यावर त्यांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मोठ्या संख्येने पीडीत राहुल साहच्या घरी पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
पीडितांनी राहुल साहविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परंतु आरोपी राहुल साह सध्या फरार आहे. पोलिस तपासात समोर आलेल्या माहीतीतून असे उघड झाले की, राहुलने ३०० लोकांची ५० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. राहुलने तरुणांना पोलिसांचे बनावट ओळखपत्र, गणवेश, लाठी देऊन वाहने तपासण्यास आणि दारू तस्करांकडून बेकायदेशीर वसुली करण्यास भाग पाडले होते. राहुल या दारू तस्करांकडून लाचही घेत असे. आता पोलीस आरोपी राहूल सहाला अटक करण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.