
मुंबई : “भारताचे भांडवली बाजारमुल्य सहापटींनी वाढून ११ वर्षांत ७४ लाख कोटी रुपये इतके झाले. भारतावर मोदी सरकारच्या काळात अधिक दृढ झालेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले.”, असे वक्तव्य एनएससीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टीकोनातून भांडवली बाजाराची भूमिका अधोरेखित व्हावी या उद्देशाने विकसित भारताचा मार्ग आणि भांडवली बाजाराचे योगदान या विषयावर दि. ९ जून रोजी नवी दिल्ली येथे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तेव्हा ते बोलत होते. फाऊंडेशन फॉर पब्लिक अवेअरनेस (एफपीएपी) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (एनएसई) यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या चर्चासत्रात आशिषकुमार चौहान, एफपीएपीचे अध्यक्ष डॉ. अनिर्बन गांगुली, उपाध्यक्ष डॉ. विजय चौथाईवाले यांच्यासह विदेश प्रमुख मान्यवरांनी या विषयी आपली महत्वाची मते मांडली.
जागतिक स्तरावर आर्थिक स्थिती बळकट करण्याच्या दृष्टीने विदेशातील जागतिक समुदायाचा देशांतर्गत आर्थिक संस्थांचा संवाद महत्वाचा आहे. भारतीय शेअर बाजार २०४७च्या विकसित भारताच्या वाटचालीसाठी महत्वाचे प्रवेशद्वार ठरणार आहे. भविष्यात एफपीएपीतर्फे याच प्रकारे चर्चासत्रांचे आयोजन करुन भारतीय शेअर बाजाराबद्दलची साक्षरता, समज वाढविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
या चर्चासत्रात भारतातील पायाभूत सुविधा, आर्थिक स्थिती, भांडवली बाजारातील सुधारणांची तसेच जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. दिल्लीतील परराष्ट्र दूतावासातील प्रमुखांनी या चर्चासत्रात सक्रीय सहभाग घेतला. मुक्त आणि अनौपचारिक संवादामुळे भारताच्या आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या परिवर्तनाबद्दलचा दृष्टीकोन स्पष्ट झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
एफपीएपीचे उपाध्यक्ष विजय चौथाईवाले म्हणाले, “एफपीएपीच्या निमित्ताने आम्ही दिल्लीतील उच्चायुक्त आणि अधिकाऱ्यांशी भारताच्या आर्थिक विकासाच्या संदर्भात चर्चा घडवून आणण्याचे काम करत आहोत. यामुळे केवळ जनजागृतीच नव्हे तर भविष्यातील ध्येयधोरणांवरही याचा परिणाम दिसून येईल. आर्थिक विकासाचा मार्ग हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत २०४७ या दृष्टीकोनातूनच विकसित होत आहे.”
“यासाठी भारताच्या राष्ट्रीय शेअर बाजाराची भूमिका महत्वाची ठरणार आहे. एनएसई हे जागतिक गुंतवणूकीच्या दृष्टीने प्रवेशद्वार ठरेल. शिवाय एक महत्वाची फिनटेक संस्था म्हणूनही उदयाला येईल. गेल्या काही वर्षांत संस्थेने तंत्रज्ञान क्षेत्रातही आपला जम बसवल्याची उदाहणे आहेत. अशा प्रकारच्या चर्चासत्रांमुळे जागतिक संधीचे प्रवेशद्वार भारतासाठी खुले होणार आहे.”, असेही ते म्हणाले.
डॉ. आशिषकुमार चौहान म्हणाले, “दिल्लीतील विविध उच्चायुक्तांशी आणि महत्वाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चासत्रांमुळे भांडवली बाजारासाठी हा मैलाचा टप्पा ठरेल, जागतिक गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या नेतृत्वात भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला. अशा प्रकारच्या चर्चासत्रांमुळे विकसित भारत २०४७ या दृष्टकोनात महत्वाचा पैलू ठरणार आहे.”