नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी भारतीय सैन्यदलांना लवकरच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओतर्फे विकसित जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली (क्विक रिअॅक्शन सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम - क्यूआरएसएएम) प्राप्त होणार आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून ३० हजार कोटी रुपयांचा करार लवकरच करण्यात येणार आहे.
संरक्षण मंत्रालय पश्चिम आणि उत्तर सीमेवर तैनात करण्यासाठी क्यूआरएसएएमच्या तीन रेजिमेंट खरेदीच्या प्रस्तावास लवकरच अंतिम रूप देणार आहे. डीआरडीओतर्फे विकसित ही क्षेपणास्त्र प्रणाली अत्यंत गतिमान आहे. त्यामध्ये चालताना लक्ष्य शोधण्याची आणि ट्रॅक करण्याची आणि कमीत कमी वेळेत लक्ष्यावर अचूत हल्ला करण्याची क्षमता आहे. सुमारे ३० किमीच्या पल्ल्यासह ही प्रणाली एमआरएसएएम आणि आकाश सारख्या सैन्यातील विद्यमान प्रणालींना कमी ते मध्यम पल्ल्यात पूरक ठरणार आहे.
चाचण्यांदरम्यान दिवसा आणि रात्रीच्या दोन्ही परिस्थितींमध्ये क्षेपणास्त्र प्रणालीच्या कामगिरीचे विस्तृत मूल्यांकन करण्यात आले आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेची बैठक जूनच्या चौथ्या आठवड्यात आयोजित करण्याचे नियोजन आहे. या बैठकीत क्यूआरएसएएमच्या करारावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.