मोदीपर्व हा भारताचा सुवर्णकाळ – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ , केवळ शांततेचा पुरस्कार नव्हे तर युद्धखोरांना धडा शिकवण्याचे धोरण

    10-Jun-2025   
Total Views |



नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ११ वर्षांचा कार्यकाळ भारताचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जाईल. या कार्यकाळात पंतप्रधान मोदींनी भारताला जागतिक मान्यता दिली आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगवारी केले आहे. मोदी सरकारला ११ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लखनऊ येथे आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.


देशात २०१४ पर्यंत काँग्रेससह अस्थिर सरकारांवर जनतेचा विश्वास उडाला होता. जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलिन झाली होती. भ्रष्टाचार, लांगुलचालन आणि घराणेशाहीपासून मुक्त असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने देशाला विकसित आणि स्वावलंबी बनवून पुढील २५ वर्षांसाठी कृती आराखडा सादर केला आहे. या ११ वर्षांनी देशाला सामाजिक आणि सांस्कृतिक बाजूने तसेच आर्थिक आघाडीवर, सेवा, सुशासन यासह एक नवीन ओळख दिली आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, गेल्या ११ वर्षात आपण राष्ट्रीय एकता आणि अखंडतेप्रती आपली वचनबद्धता आणि दहशतवादाबद्दल शून्य सहनशीलता पाहिली आहे. हा ११ वर्षांचा कालावधी अशा वेळी पूर्ण होत आहे जेव्हा संपूर्ण जगाने भारताची सामरिक शक्ती पाहिली आहे. भारताची लष्करी शक्ती आता जगात सर्वोत्तम ठरली आहे. जर कोणी भारतावर युद्ध लादले तर त्याचे उत्तर सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरने दिले जाईल. आता भारत हा जगात केवळ शांततेचा पुरस्कार करणारा देश नव्हे तर युद्ध लादल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर देणारा देश आहे, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी नमूद केले आहे.