‘प्रथमेशा’चा पुजारी...

    14-May-2024
Total Views |
Prathamesh Deulkar

कोकणातल्या आपल्या गावात राहून, आपले छंद जोपासत उत्तुंग झेप घेण्यासाठी प्रयत्न करणार्‍या मूर्तीकार प्रथमेश देऊलकर यांच्याविषयी या लेखातून जाणून घेऊया..

गोष्ट आहे कोकणातल्या भेडशी या गावातल्या एका कलाकाराची. भेडशी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एक गाव. दोडामार्ग तालुक्याची ओळखच मुळात तळकोकणाची सीमा अशीच! आता साधारणपणे कोकण म्हटले की, समोर येतात त्या देवगड हापूसच्या बागा आणि काजूचे उत्पादन करणारा शेतकरी. पण, या कोकणाने विविध क्षेत्रातील, अनेक रत्ने या देशाला दिली. अशी ही कलाकारांचीदेखील कर्मभूमीच म्हणावी लागेल.प्रथमेश देऊलकर हा कलाकार, याच कोकणात भविष्यातील उड्डाणाची तयारी करीत आहे. एका सामान्य मराठी कुटुंबात जन्मलेल्या प्रथमेशचे नावदेखील त्याला पूज्य असणार्‍या भगवंताशी म्हणजेच गणरायाशी जोडलेले. प्रथमेशचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातील शाळेत पूर्ण झाले. प्रथमेशने कलेचा वारसा घेतला, तो आपल्या वडिलांकडून. त्याचे वडील मूर्तिकार, श्रीगणेशाच्या मूर्तीस साकारुन त्यांची विक्री करणे, हा त्यांचा व्यवसाय.
 
गावातल्या गावात हा व्यवसाय सांभाळत असताना, कामातील प्रामाणिकपणा आणि कलेवरचे प्रेम या दोन गोष्टी देऊलकर कुटुंबाने कायम जपल्या. आता गणरायाचे ते मोहक रुपडे कोणाला मोहिनी घालत नाही हो? लहान मुलांसाठी तर गणपती म्हणजे त्यांचा जणू सखाच! परीक्षेपासून मोदकापर्यंत सगळेच ते त्याच्याबरोबर वाटून घेतात की नाही?प्रथमेशदेखील लहानपणीच बाबांच्या कार्यशाळेत रमू लागला. शाळेतल्या शिक्षकांनी मातीची मूर्ती तयार करून आणायला सांगितली, की ती जमेल तशी स्वतः तयार करण्याचा प्रयत्नच प्रथमेशचे भविष्य घडवत होते. त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या बोटांतील जादू हेरली. त्यामुळे लहानपणापासूनच त्याला कलेपासून दूर न ढकलता, जास्तीत जास्त वेळ त्याला छंद जोपासण्याची मुभा आपसूकच मिळाली. साहाजिकच मातीशी खेळण्याचा छंद असलेल्या,प्रथमेशने आपले पुढील शिक्षणदेखील ‘अप्लाईड आर्ट्स’मध्ये सावंतवाडीमध्ये पूर्ण केले. या काळात कलेचे बारकाईने शिक्षण मिळाले आणि घरातील चित्रशाळेमुळे सरावदेखील जोरदार सुरू होता. आता महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर दोन पर्याय प्रथमेशच्या समोर होते. शहराची वाट पकडून एखादी नोकरी करावी अथवा घराचा पारंपरिक व्यवसाय सांभाळावा.
 
प्रथमेश यांनी मोठ्या हिमतीने दुसरा पर्याय निवडला. भेडशी या गावातच राहायचे आणि वडिलांना कामात मदत करायची. हे निश्चित झाल्यावर, मनापासून व्यवसायवाढीचा विचार प्रथमेश करू लागला. त्यासाठी त्याने अनेक मूर्तिकारांशी चर्चा केली. अनेक मूर्तिशाळांना भेटी दिल्या. त्यांच्या तयार होणार्‍या मूर्ती आणि देऊलकरांच्या कारखान्यात होणार्‍या मूर्तींमधील फरक बारकाईने समजून घेतले.शिक्षणाने त्या क्षेत्राचे सखोल ज्ञान मिळाले होतेच. त्यामुळे, सर्वात प्रथम गणपतीच्या मूर्तींच्या त्वचेचा रंग बदलण्याचा निर्णय घेतल्याचे प्रथमेश सांगतात. कोकणात बहुतेक ठिकाणी अभ्रक मिश्रित रंग मूर्तीसाठी वापरले जातात. आमच्याही कारखान्यात हेच रंग वापरले जात असल्याचे प्रथमेश म्हणाले. “अभ्रकामुळे मूर्तीला एक वेगळीच चमक येते. पण, त्यामुळे मूर्तीचा नैसर्गिक बाज कमी होतो, असे लक्षात आले. म्हणून शहरांकडे जेे मानवी त्वचेसारखे रंग मूर्तींसाठी वापरले जातात, तेच रंग वापरण्यास मी सुरुवात केली,” असे प्रथमेश यांनी नमूद केले. त्यांनी केलेल्या या प्रभावशाली बदलाचा सकारात्मक परिणाम त्यांच्या व्यवसायावर दिसू लागला. पूर्वी गणेशोत्सवाला ३५० मूर्तींची होणारी विक्री आज हजाराच्या घरात पोहोचली आहे.
 
“आम्हा कोकणवासीयांची त्या गणरायावर विशेष माया आहे आणि त्या गणरायाचेदेखील आमच्यावर नितांत प्रेम आहे. त्यामुळे आमच्याकडे येणारा प्रत्येकजण, हा आपली मूर्ती कशी असावी, याची एक छबी घेऊनच आमच्याकडे येत असतो. प्रत्येकाच्या हट्टाला न्याय देणे कधीकधी शक्य होत नाही. पण, भक्ताच्या देवाप्रती असणार्‍या प्रेमळ हट्टाचा मान ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही कायमच करीत असतो,” असे प्रथमेश म्हणाले. “दरवर्षी येणारे भक्त ‘यावर्षी वेगळे काय?’ हा प्रश्न घेऊनच आमच्याकडे येतात. त्यामुळे, सतत काहीतरी नवीन शिकावेच लागते,” असेदेखील त्यांनी नमूद केले. त्यामुळेच देऊलकरांच्या मूर्तिशाळेतील मूर्ती आता रत्नआभूषणांनी सजूनच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊ लागल्या आहेत.
 
पर्यावरणाचा समतोल साधणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच प्रथमेश यांनी पर्यावरणपूरक मूर्तिकलादेखील आत्मसात केली आहे. त्यामुळेच कोकणातील मूर्तिकारांच्या हाताला १२ महिने काम मिळावे, या हेतूने प्रथमेश यांनी आपल्या लहानशा मूर्तिशाळेचे रुपांतर आर्ट्स स्टुडिओमध्ये केले. मध्यंतरीच्या काळात त्यांनी फायबरवर काम करून, त्यातून कलाकृती निर्माण करण्याचे कौशल्य आत्मसात केले. त्यामुळे, मंदिरातील सजावट करण्याची कामेदेखील मोठ्या प्रमाणात येऊ लागली. आज त्यांच्या भेडशी येथील ‘गणेश आर्ट्स स्टुडिओ’मध्ये हंगामात २५ ते ३० कामगार कार्यरत असतात. तर, हंगाम नसतानादेखील १०-१२ कामगारांना रोजगार उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या घरातील त्यांचे सर्व भाऊ-बहिणीदेखील हंगामात या कामी मदत करतात. गणेश मूर्तिशाळा ते ‘गणेश आर्ट्स स्टुडिओ’ या यशाचे सर्व श्रेय प्रथमेश आपल्या संपूर्ण कुटुंबालाच देतात. भविष्यात भेडशी गावच्या या स्टुडिओत तयार झालेल्या मूर्तींना शहरात ओळख मिळावी, हेच त्यांचे स्वप्न आहे. प्रथमेश यांच्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत‘च्या अनेकानेक शुभेच्छा!

 
कौस्तुभ वीरकर