IPL प्ले ऑफच्या तिकीटासाठी मुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्स भिडणार!
21-May-2025
Total Views | 11
मुबंई : ( IPL playoffs update ) २०२५ आयपीएल हंगामाच्या प्ले ऑफच्या तिकीटासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स भिडणार आहेत. बुधवार, २१ मे रोजीचा हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. हा सामना आयपीएलमधील प्ले ऑफचं तिकीट कुणाला मिळणार हे ठरवणार आहे. प्ले ऑफमधील चौथे स्थान मिळवण्यासाठी मुंबई आणि दिल्ली संघासाठी आजचा सामना संधी आहे. त्यामुळे आता ही मॅच कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
२०२५ आयपीएल हंगामातील मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील हा एक रोमांचक सामना असून प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी हा निर्णायक सामना ठरेल. यापु्र्वी गुजरात, पंजाब आणि आरसीबी या तीन संघांनी आधीच प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे. आता शेवटच्या म्हणजे चौथ्या स्थानासाठी मुंबई आणि दिल्ली यांच्यात स्पर्धा होत आहे.
मुंबई इंडियन्सची सध्याची स्थिती ही १२ सामन्यांत १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्सची स्थिती १२ सामन्यांत १३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. आजचा सामना मुंबईने जिंकला तर मुंबईचे १६ गुण होतील आणि मुंबई आपले प्ले ऑफमधील स्थान निश्चित करेल.
मुंबईत पावसाची शक्यता!
२२ मे रोजी मुंबईत पावसाची शक्यता असून पावसामुळे या सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. हवामान विभागाने पुढचे चार दिवस मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा दिला आहे. मंगळवार संध्याकाळपासून रात्री उशीरापर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस पडला. या मुसळधार पडलेल्या पावसामुळे दिल्ली संघाचे सराव सत्र पूर्ण होऊ शकले नाही.