मिठी नदी सफाई घोटाळ्यात आदित्य ठाकरेंचा हात! ; संजय निरुपम यांचा गंभीर आरोप; डिनो मोरियासह आदित्यची चौकशी करा

    09-Jun-2025
Total Views |


मुंबई : मुंबईत नालेसफाई आणि मिठी नदीतील गाळ उपसण्याच्या कामात ६५ कोटींचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात अभिनेता डिनो मोरिया याची चौकशी केली जात आहे. मात्र, डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांची घनिष्ट मैत्री असून या प्रकरणी आदित्यची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी सोमवार, दि. ९ जून रोजी केली.


मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निरुपम म्हणाले की, गेल्या २० वर्षांत मिठी नदीच्या सफाईसाठी १ हजार २०० कोटींचा खर्च झाला आहे. अजूनही मिठी नदीची पूर्ण सफाई झालेली नाही. या प्रकरणात मोठा घोटाळा झाला असून प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने ‘एसआयटीची नियुक्ती केली आहे. या प्रकरणी पालिकेचे तीन अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन दलाल आणि दोन कंपन्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जात आहे. गेल्या २० वर्षात १८ कंत्राटदारांना मिठी नदी सफाईचे काम दिले होते. २००५ पासून २०२२ पर्यंत महापालिकेत उबाठाची सत्ता होती. त्यांच्या काळात मातोश्रीच्या परवानगीशिवाय कुणालाही मुंबईत कंत्राट मिळायचे नाही हे सर्वांना माहित आहे, असे निरुपम म्हणाले.