किल्ले रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा

    09-Jun-2025
Total Views |

Shivarajyabhishek ceremony at Raigad Fort  
 
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवशक 352 या तिथीनुसार साजरा केला जाणारा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सोमवार, दि. 9 जून रोजी किल्ले रायगडावर साजरा होणार आहे. हा सोहळा आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांतून हजारोंच्या संख्येने शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत.
 
राज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वदिनी शिरकाई देवीच्या पूजनापासून या सोहळ्याला सुरुवात झाला असून शिवभक्तीच्या जागरात संपूर्ण रायगड दुमदुमून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ‘शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती’, ‘दुर्गराज रायगड व कोकणकडा मित्र मंडळ’, रायगड यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 
‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट विशेष ट्रेन’चा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
 
भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने ऐतिहासिक-सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी ’छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन’ या एका विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. ही यात्रा भारत गौरव ट्रेनअंतर्गत आज सोमवार, दि. 9 जूनपासून सुरू होत आहे. याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. ते या पहिल्या ट्रेनला सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हिरवा झेंडा दाखवतील.
 
या 5 दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांनी अनुभव घेता येणार आहे.