पूर्वकल्पना देऊनही काँग्रेस सरकार बेफिकीर ; बंगळुरु चेंगराचेंगरीपूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकार्याने लिहिलेल्या पत्रात खुलासा
09-Jun-2025
Total Views |
बंगळुरु : ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु’च्या संघाने ‘आयपीएल’ स्पर्धेत मिळवलेल्या विजयाचा उत्सव साजरा करताना एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला. याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने काँग्रेस सरकारला पत्र लिहून गर्दीच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि विधान सौधा येथे साजरा केल्या जाणार्या विजयाच्या उत्सवावर आक्षेप घेतल्याचे समोर आले आहे.
डीसीपी (विधान सौधा सुरक्षा) एम. एन. करिबासवन गौडा यांनी दि. 4 जून रोजी ‘डिपार्टमेंट ऑफ पर्सोनल अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म’च्या सरकारी सचिवांना पत्र लिहून यासंबंधीच्या धोक्यांबद्दल पूर्वकल्पना दिली होती. गौडा यांनी दहा मुद्द्यांच्या आधारे सुरक्षेसह महत्त्वाच्या इमारतींची व्यवस्था लावण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यांना असलेला धोका याबद्दलचा उल्लेख या पत्रात केला होता. “विधान सौधा येथे लाखो क्रिकेट चाहते येण्याची शक्यता आहे.
सुरक्षा कर्मचार्यांची कमतरता असल्याने बंदोबस्त ठेवणे कठीण जाईल,” असे गौडा यांनी ‘डीपीएआर’च्या सचिव जी. सत्यवती यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. तसेच, कार्यक्रमाच्या ठिकाणाची संवेदनशील स्थिती आणि अपुरे सीसीटीव्ही कव्हरेज हेदेखील चिंता आहे. मात्र, इतके स्पष्ट इशारे देऊनही विजयोत्सवाचा कार्यक्रम नियोजित ठिकाणीच घेण्यात आला.
चेंगराचेंगरी होण्याच्या काही तास आधी, सत्यवती यांनी वाढत असलेली गर्दी पाहून चाहत्यांना “विधान सौधा येथे येण्याऐवजी स्टेडियममध्ये जावे,” असे जाहीर आवाहन केले. मात्र, स्टेडियममध्ये उत्सव साजरा करण्यापूर्वी विधान सौधा येथे संघाचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे बंगळुरुमधील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेला कर्नाटकचे काँग्रेस सरकारच जबाबदार असल्याचे दिसून येते.