मुंबई : महाराष्ट्राचे वैभव असणाऱ्या चिंतामण द्वारकानाथ देशमुख अर्थात डॉ. सी.डी. देशमुख यांचे स्मारक आणि त्यांची दाते गावातील छीन्न-विछीन्न झालेली वास्तू उभारावी, अशी विनंती भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात शासनाला केली.
आ. दरेकर म्हणाले की, सी.डी. देशमुख देशाचे अर्थमंत्री, आरबीआयचे पहिले गव्हर्नर राहिलेत. मराठी व महाराष्ट्रासाठी अस्मिता काय असते हे जागतिक स्तरावर त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी त्यावेळी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे स्वाभिमानाने आपला राजीनामा दिला होता. त्यांचे स्मारक महाडला दाते गावात आहे. आपण अनेक स्मारके उभी करतो. सी.डी. देशमुख हेही महाराष्ट्राचे वैभव आहेत. त्यांच्या घराचीही दुरावस्था झाली आहे. छीन्न-विछीन्न अवस्थेत त्यांचे घर आहे. त्यांचे स्मारक, त्यांची वास्तू उभारावी व त्यात सी.डी. देशमुख यांचा मोठेपणा कसा जपला जाईल याबाबतची भूमिका शासनाने घ्यावी, अशी विनंती दरेकर यांनी केली.
यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सी. डी. देशमुख यांच्या स्मारकाबाबत सरकार गंभीर आहे. ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्यासाठी शासन निधीचे नियोजन करेल व त्यांचा उचित सन्मान राखला जाईल असे सकारात्मक उत्तर दिले.