अमेरिकेचा पाकिस्तानला दणका! पहलगाम हल्ल्यामागील TRFला दहशतवादी संघटना म्हणून घोषित, भारताकडून निर्णयाचे स्वागत

    18-Jul-2025   
Total Views | 11


वॉशिंग्टन : (The Resistance Front declared as FTO by US)
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पाकिस्तानस्थित दहशतवादी गट 'द रेझिस्टन्स फ्रंट'ला (TRF) दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी ही माहिती दिली. 'टीआरएफ'ला परदेशी दहशतवादी संघटना (FTO) आणि विशेष नियुक्त जागतिक दहशतवादी (SDGT) म्हणून घोषित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे आभार मानले आहे.


टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबाची आघाडी संघटना - परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनेचे वर्णन पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची आघाडी संघटना असे केले आहे. लष्कर-ए-तैयबावर संयुक्त राष्ट्राने यापूर्वीच बंदी घातली आहे. ही संघटना जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याबाबत दोषी आहे. टीआरएफने या वर्षी २२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या दहशतवादी संघटनेचे मुख्यालय पाकिस्तानमध्ये आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे दहशतवादविरोधी प्रयत्नांमध्ये भारतासोबत वॉशिंग्टनचे सहकार्य आणखी मजबूत होईल, असे मंत्री रुबियो म्हणाले.

दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो म्हणाले की, "टीआरएफला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणे हे ट्रम्प प्रशासनाच्या राष्ट्रीय सुरक्षा हितांचे रक्षण करण्यासाठी, दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आणि पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत उभी आहे. या दहशतवादी गटाचा भारतीय सुरक्षा दलांवर होणाऱ्या अनेक हल्ल्यांशीही संबंध आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला हा २००८ मध्ये लष्कर-ए-तैयबाने केलेल्या मुंबईवरील हल्ल्यानंतर भारतातील नागरिकांवर झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता."


भारताकडून अमेरिकेच्या निर्णयाचे स्वागत

भारताने हा निर्णय भारत-अमेरिका दहशतवादविरोधी सहकार्याची मजबूत पुष्टी मानली आहे, ज्यामुळे भारताच्या शून्य सहनशीलता धोरणाला आणखी बळ मिळाले आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचे स्वागत करताना, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एक्सवरील पोस्ट मध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे कौतुक करत दहशतवादविरोधातील अमेरिकेच्या भूमिकेचे स्वागत केले.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121