मुंबई : मुंबईत सर्रास अनधिकृत हॉटेल्सची बांधकामं सुरु आहेत. या बांधकामांना परवानग्या देणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासन कोणती कारवाई करणार? असा सवाल आज भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान उपस्थित केला.
विधानपरिषद सदस्य राजहंस सिंह यांनी कुर्ला पश्चिम एल वॉर्ड येथे ५० पेक्षा जास्त अनधिकृत हॉटेल्स बांधण्यात आल्याबाबतची लक्षवेधी उपस्थित केली. या लक्षवेधीवरील चर्चेत भाग घेत दरेकर म्हणाले की, राजहंस सिंह यांनी अनधिकृत हॉटेल्सचा महत्वाचा मुद्दा मांडला आहे. मुंबईत हे सर्रास घडतेय. या अनधिकृत बांधकामांना परवानग्या देणाऱ्या जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई कधी होणार? ज्या विभागात अनधिकृत बांधकाम होते तेथील वरिष्ठ पोलीस अधिकारी व प्रभाग अधिकारी यांना निलंबित केले पाहिजे हा कायदा आहे. आतापर्यंत अनधिकृत बांधकामांना जबाबदार असणाऱ्या किती अधिकाऱ्यांवर कारवाई केली? किती जणांना निलंबित केले? असा खडा सवाल दरेकर यांनी केला.
दरेकर यांच्या प्रश्नावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना शासनाने अध्यादेश काढून दिल्या आहेत. हॉटेल्सचा मुद्दा उपस्थित झाला त्या संबंधित सर्व विभागांची कमिटी तयार केली आहे की त्यांनी याचे सर्वेक्षण करावे व त्यांना जबाबदार धरू शकू अशा प्रकारची यंत्रणा लावलेली आहे. तसेच ज्यावेळेस काही घटना झाल्या त्यावेळेस त्याला संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित केलेले आहे. आम्हीही महापालिकेला वारंवार निर्देश देतो की, जे संबंधित अधिकारी व प्रभाग अधिकारी नियमाप्रमाणे प्रभाग अधिकाऱ्याला दोषी धरणे गरजेचे आहे, त्याबाबतची कारवाई करावी.