मुंबई : "आपण बऱ्याचदा 'इंडिया दॅट इज भारत' असे म्हणतो. मात्र वैयक्तिक असो वा सार्वजनिक आपल्या संभाषणात, लेखनात, बोलण्यात आपण भारताला 'भारत' असेच म्हणायला हवे. भारत हे एक विशेषनाम आहे, त्याचे भाषांतर करू नये", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. शिक्षासंस्कृती उत्थान न्यासाच्या वतीने अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, केरळ येथे "शिक्षणात भारतीयता" या विषयावर आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात ते बोलत होते.
उपस्थितांना संबोधत सरसंघचालक पुढे म्हणाले, इंग्रजीमध्ये कुणाचे नाव गोपाल असेल, तर ते गोपालच राहते, त्याचे भाषांतर होत नाही. त्याचप्रमाणे भारताला भारतच म्हणावे. असे झाले तरच भारताची स्वतःची ओळख टिकेल आणि तेव्हाच त्याला सन्मान मिळेल. जर आपण आपली ओळख विसरलो, तर आपल्यामध्ये कितीही विशेष गुण असले, तरी आपल्याला कधीच सन्मान मिळणार नाही, सुरक्षा मिळणार नाही. हे एक अटळ सत्य आहे. जर आपल्याला शिक्षणात भारतीयता आणायची असेल, तर प्रथम भारताला ओळखावं लागेल, आपल्या आयडेंटिटीवर विश्वास ठेवावा लागेल. म्हणूनच भारताला जाणून घ्या, भारताला मान्यता द्या आणि भारताचे बना; यातच खरे भारतीयत्व आहे.
व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी शिक्षणाची आवश्यकता यावर भाष्य करत ते म्हणाले, शिक्षण का हवे? कारण ते माणसाच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी आवश्यक आहे. मनुष्याच्या मन, वचन आणि कर्मातून जे व्यक्त होते, तेच खरे शिक्षण आहे. शिक्षण हे आपलं पोट भरायला, आपलं कुटुंब सांभाळायला शिकवतंच, पण भारतातलं शिक्षण माणसाला इतरांसाठी कसं जगावं, हे शिकवतं. शिक्षण म्हणजे केवळ शाळा किंवा महाविद्यालय नव्हे, तर ते घरातील संस्कारांवरही अवलंबून असते. समाजाचीसुद्धा यात महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. म्हणूनच संस्कार फार महत्त्वाचे असतात, कारण संस्कारांमधून आचरण निर्माण होते, आणि आचरणातूनच जीवनाची उन्नती होते.
केरळचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी सांगितले की, विकसित भारताची आपली संकल्पना ही केवळ आर्थिक विकासापुरती मर्यादित नाही, तर ती सर्वांगीण विकासाची गोष्ट आहे आणि त्यात शिक्षणाची फार महत्त्वाची भूमिका आहे. इतक्या वर्षांपासून आपण औपनिवेशिक विचारसरणी घेऊन पुढे चालत होतो. 'राष्ट्रीय शिक्षण धोरण' भारताच्या शिक्षणाला डिकोलनाईज करण्याचा पहिला प्रयत्न आहे. परिवर्तन घडत आहेच, पण आपल्याला विचार करावा लागेल की आपण त्या परिवर्तनाचा भाग आहोत का नाही. आपण स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे, अन्यथा विकसित भारताचे स्वप्न हे केवळ स्वप्नच राहील.
शिक्षा संस्कृति उत्थान न्यासाचे राष्ट्रीय सचिव डॉ. अतुल कोठारी यांनी सांगितले की, भारताला पुन्हा *विश्वगुरु* बनवायचं असेल, तर त्यासाठीचा रोडमॅप शिक्षणाच्या माध्यमातूनच शक्य आहे. 'राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०'ने हे स्पष्ट केले आहे की, हे स्वतंत्र भारताचे पहिले असे धोरण आहे, ज्याचा पाया 'भारतीयता' आहे. कोणत्याही देशाच्या शिक्षण धोरणाचा आधार त्याची संस्कृती आणि विकास असायला हवा.