मुंबई : मुंबईत यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळांसाठी महापालिकेने नवे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार गणेश मंडपासाठी खणलेल्या एका खड्ड्यासाठी थेट १५ हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. हा निर्णयाचे प्रसिद्धपत्रक २७ जुलै रोजी जारी करण्यात आले आहे. दरम्यान, सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिकेच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. मंडळांचे प्रतिनिधींचे म्हणणे आहे की, "हा निर्णय उत्सवावर अन्याय करणारा आहे. त्यांनी हा निर्णय तात्काळ रद्द करावा", अशी मागणीदेखील केली आहे.
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समितीच्या बैठकीत, सर्व मंडळांनी एकत्र येऊन महापालिकेने या निर्णयाचा पुर्नविचार करावा, अशी विनंती केली आहे. समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी हे विधान केले. मंडळांचे म्हणणे आहे की, खड्डे इच्छेनुसार किंवा काळजी न घेतल्याने निर्माण होत नाहीत. खड्ड्यांची संख्या, कारणे स्पष्ट नसल्यास इतका मोठा दंड लावणे चुकीचे आहे.
फेब्रुवारी २०२५ ला पालिकेने एक परिपत्रक जारी केले होते. त्यात मंडप उभारणीदरम्यान रस्त्यावर खड्डे होऊ नयेत, असे नमूद करण्यात आले होते. असे झाल्यास प्रत्येक खड्ड्यासाठी दोन हजार इतका दंड आहे. म्हणजेच, पूर्वीही पालिकेने अशाच कारणावरून दंड ठोठावला आहे. पण यावेळी दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवली आहे असे मंडळांचे म्हणणे आहे. मेट्रो, रेल्वे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था अशा ठिकाणी मंडळांनी गर्दीचे आवश्यक व्यवस्थापन करावे, याविषयी पालिकेने स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे अनेक मंडळांवरील आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे.
हा वाद २०२५ गणेशोत्सवाच्या तयारीदरम्यान निर्माण झाला आहे. उत्सव हा २७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळे नियमांबाबत स्पष्टता मिळणे गरजेचे आहे, अशी मंडळांची मागणी आहे. पालिकेत आणि समितींमध्ये संवाद सुरू आहे. मंडळांना खड्ड्यांशी निगडित नियम स्पष्टपणे समजून घ्यावे, पडताळणी करून संवेदनशीलता दाखवावी. असे पालिकेचे म्हणणे आहे तर जास्त दंड आकारणे हे अन्यायकारक असल्याचे मंडळांचे म्हणणे आहे.