वसई : वसई - विरार शहरात वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे शहराला अनियमित पाणीपुरवठा होतो, यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रांवर कायमस्वरूपी जनरेटर बसवण्याची मागणी बुधवारी आमदार राजन नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित करून केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत उर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या सूचनेचा विचार करून विभागाला निर्देश देण्यात येतील असे आश्वासन दिले.
वसई – विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात नव्याने उभी राहणारी गृहसंकुले पाहता पाण्याची गरज अधिक प्रमाणात निर्माण होऊ लागली आहे. पावसाळ्यात अनियमित वीजपुरवठ्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रांवर तांत्रिक बिघाड होत असल्याने शहराला कमी दाबाने, तसेच अनियमित पाण्याचा पुरवठा होतो. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात जलसंखटाचा सामना करावा लागतो. एमएमआरडीएच्या पाणीपुरवठा योजनेतील कवडास पंपिंग स्टेशन आणि सुर्यानगर जलशुद्धीकरण केंद्र येथे महावितरणमार्फत वीजपुरवठा होतो, या परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत असल्याने विद्युत तारांवर झाडांच्या फांद्या पडून योजनेचा पाणीपुरवठा वारंवार खंडित होतो. यामुळे प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून याठिकाणी कायमस्वरूपी जनरेटर बसवण्यात यावे अशी मागणी राजन नाईक यांनी केली.